Independence Day: ‘वो सुबह कभी तो आएगी’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 05:07 AM2020-08-15T05:07:15+5:302020-08-15T05:08:35+5:30
फैज अहमद फैज यांची प्रसिद्ध कविता ‘स्वातंत्र्याची पहाट’ ७३ वर्षांनंतरही आपले स्वातंत्र्याचे मूल्य जोखण्याचा संदेश देत असते.
- योगेंद्र यादव, अध्यक्ष, स्वराज इंडिया
फैज अहमद फैज यांची प्रसिद्ध कविता ‘स्वातंत्र्याची पहाट’ ७३ वर्षांनंतरही आपले स्वातंत्र्याचे मूल्य जोखण्याचा संदेश देत असते. ब्रिटिश राजवट संपल्यानंतर ते म्हणाले होते,
‘ये दाग-दाग उजाला
यह शब गजीदा सहर
वो इंतजार था जिसका
ये वो सहर तो नहीं’
तेव्हा तर नाही पण आज तरी ती पहाट उगवली आहे जिची आम्हाला प्रतीक्षा होती? १५ आॅगस्ट रोजी ब्रिटिश राजवट गेली आणि देश स्वतंत्र झाला. परंतु जे लोक स्वातंत्र्याच्या या औपचारिक आनंदोत्सवात आनंदी होऊ शकणार नाहीत त्यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी या ९ प्रश्नांवर विचारमंथन अवश्य करावे.
१. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर शेकडो किलोमीटर पायपीट करणाऱ्या कामगारांचे दृश्य भारतातच का बघायला मिळाले? स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिकांचे हे चित्र होते का?
२. मोठ्या भटक्या समाजाला असूचित करुन ७० वर्षे झाली तरी आजही हा समाज तिरस्कार, उपेक्षा, हिंसाचार आणि शोषणाच्या दंशातून मुक्त झाला आहे काय?
३. ज्या तीन लाखावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्यापैकी कुणाच्या तरी घरी जा, त्यांच्या विधवा किंवा मुलांना विचारा, ‘स्वातंत्र्य म्हणजे काय?’ धाडस असेल तर भारत सरकारने कृषीबाबत जे तीन नवे अध्यादेश काढले ते वाचा आणि विचारा, खरेच शेतकरी स्वतंत्र झाला ?
४. लैंगिक हिंसाचाराला बळी ठरलेल्या आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याची हिंमत नसलेल्या त्या लाखो महिलांना विचारा स्वातंत्र्याचा अर्थ. महिलाच स्वतंत्र नाही मग देश कसा स्वतंत्र ?
५. दलित वस्तीत भेट देवून पहा त्यांचा मानसिक छळ होतोय की नाही? याला स्वातंत्र्य म्हणायचे काय?
६. या देशात सर्व धर्माच्या लोकांना समान स्वातंत्र्य आहे का?
७. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या जीवनाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची समान संधी उपलब्ध आहे काय? की ज्याच्या खिशात जेवढे जास्त पैसे तो तेवढा स्वतंत्र?
८. नव्या शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने मातृभाषेवर झालेल्या चर्चेचेच बघा ना! इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी भारतीय भाषांमध्ये शिक्षणाच्या विचाराने पसरलेली दहशत बघा. इंग्रज तर निघून गेले पण इंग्रजीची गुलामीे संपली आहे काय?
९. गेल्या काही वर्षात जेवढे मठ आणि बाबा आले ते बघता हे विचारायलाच हवे की आम्ही आपले आराध्य, आपल्या आत्म्याशी समरस होण्यास तरी स्वतंत्र आहोत काय?
१५ आॅगस्टचा हा दिवस केवळ भूतकाळातील स्वातंत्र्य संग्रामाच्या धुसर आठवणी ताज्या करण्याचाच दिवस नाही. देशात एका नव्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा हा प्रारंभ असला पाहिजे. तरच आम्ही सर्व मिळून साहिर लुधियानवींचे ते स्वप्न साकार करु शकू, ‘वो सुबह कभी तोे आएगी... ’