भारत ही दंतकथांचा प्रसार करणारी महाशक्ती

By admin | Published: January 16, 2015 12:40 AM2015-01-16T00:40:00+5:302015-01-16T00:40:00+5:30

साधारणत: चालू शतकाच्या प्रारंभी भारताने संगणकाच्या क्षेत्रात जी काही प्रगती केली ती पाहून, आता भारत जगाच्या पाठीवरील सर्वाधिक मोठा ज्ञान संपन्न देश होईल,

India is a great power distributing fables | भारत ही दंतकथांचा प्रसार करणारी महाशक्ती

भारत ही दंतकथांचा प्रसार करणारी महाशक्ती

Next

रामचन्द्र गुहा - 

साधारणत: चालू शतकाच्या प्रारंभी भारताने संगणकाच्या क्षेत्रात जी काही प्रगती केली ती पाहून, आता भारत जगाच्या पाठीवरील सर्वाधिक मोठा ज्ञान संपन्न देश होईल, अशी चर्चा देशात आणि देशाबाहेरही सुरू झालीे. न्यूयॉर्क टाइम्सच्या थॉमस फ्रिडमन याने सुमारे दहा वर्षांपूर्वी असं लिहून ठेवलं होतं की, जो देश जगाला केवळ साप-नाग पाळणारा, अत्यंत दरिद्री लोकांचा आणि मदर टेरेसा यांचा म्हणून ज्ञात होता, त्या देशाने आपले रूपडे आता पालटले आहे. तेच सूत्र पुढे हाती धरून भारतातील वर्तमानपत्रांनी आणि नियकालिकांनी, भारत आता जगातील एक सर्वात मोठी आणि क्रमांक एकची शक्ती होईल, असे मानायला सुरुवात केली. चीनने केवळ श्रमशक्तीच्या जोरावर प्रगती साध्य केली, पण भारत जी शाश्वत स्वरूपाची आहे, अशा बुद्धिचातुर्याच्या जोरावर प्रगती करून मोकळा झाला आहे.
बंगळुरूत वास्तव्याला असताना, मी ही सारी चर्चा मोठ्या उत्सुकतेने आणि काहीसे चकित होऊन ऐकत होतो. त्याबाबत मी काहीसा साशंकही होतो. कारण आजही बंगळुरात अत्यंत सुसज्ज आणि अद्ययावत असे एकही ग्रंथालय नाही. येथील विद्यापीठाने मूलभूत स्वरूपाचे असे एकही संशोधन केलेले नाही. जी स्थिती बंगळुरू विद्यापीठाची तीच थोड्याफार फरकाने देशातील अन्य विद्यापीठांचीही आहे. त्यात नाही म्हणायला काही अपवाद सांगता येतील. खुद्द बंगळुरूत इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स आणि नॅशनल सेंटर आॅफ बायोलॉजिकल सायन्सेस यासारख्या संस्था आहेत. मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फण्डामेंटल रिसर्च, हैदराबादेत सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मोलेक्युलर बायोलॉजी तर दिल्लीत दिल्ली युनिव्हर्सिटी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ यासारख्या काही संस्था बऱ्यापैकी काम करीत आहेत. पण तरीही देशाची एकूण व्याप्ती लक्षात घेता, हे काम काहीच नाही आणि म्हणून भारत जगाच्या पाठीवरील, एक प्रज्ञावंत महाशक्ती बनत असल्याचा दावा करणे अपरिपक्वतेचे आणि अतार्किक आहे.
माझ्या मुळातल्याच शंकेखोर स्वभावाला अलीकडेच मुंबईत पार पडलेल्या इंडियन सायन्स कॉँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाचे वृत्तांत वाचल्यानंतर बळकटीच मिळाली. प्रथमच या काँग्रे्रसमध्ये प्राचीन भारतातील विज्ञान हा विषय चर्चेला घेतला गेला. ही तशी स्वागतार्ह बाबच म्हणायची. विशेषत: औषधोपचार आणि गणित या दोन विषयांमध्ये आपल्या पूर्वजांनी खरोखरीच चांगली कामगिरी करून दाखविली होती. परंतु दुर्दैवाने मुंबईच्या अधिवेशनामध्ये जे निबंध सादर केले आणि जे विषय मांडले गेले, ते केवळ पुराणकाळातील दंतकथा आणि अवाजवी व अवास्तव, दावे यांच्यावर आधारित होते. त्यापैकी एका प्रबंधाने तर अगस्ती आणि भारद्वाज या ऋषींनी केवळ नाकासमोर चालणारेच नव्हे, तर सर्व दिशांना वळू शकणारे विमान शोधून काढले होते, असा दावा केला. विशेष म्हणजे ही विमाने चालविणाऱ्या वैमानिकांचा पोशाख जंतू सुरक्षित, जल सुरक्षित आणि धक्का सुरक्षित असल्याचेही आवर्जून सांगितले गेले.
अलीकडेच मुंबईत एका अद्ययावत रुग्णालयाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेशाचा दाखला देऊन आपल्या देशात प्राचीनकाळी प्लॅस्टिक सर्जरी अस्तित्वात असल्याचा दावा केला होता. अर्थात त्यांच्या या भाषणातील काही भाग विनोदाच्या अंगाने जाणारा होता.
मुंबईतील कॉँग्रेसच्या अधिवेशनाचा वृत्तांत वाचल्यानंतर, इंडियन कौन्सिल आॅफ हिस्टॉरिकल रिसर्च या संस्थेचे नवे चेअरमन वाय. सुदर्शन राव यांची एक मुलाखत माझ्या वाचण्यात आली. या मुलाखतीत प्रोफेसर राव यांनी इतिहास संशोधनाची जी प्रचलित पद्धत आहे, तीच मोडीत काढली आहे. उत्खननात सापडणारी हस्तलिखिते, शिलालेख आणि वस्तू यांच्या आधारे इतिहासाचा मागोवा घेण्याची पद्धत पूर्णपणे पाश्चिमात्य आणि म्हणूनच त्याज्य असल्याचे सांगून, राव यांनी केवळ वेदांमधून जे सांगितले गेले आहे, तेच प्रमाण मानून त्याच्याच आधारे इतिहासाचा मागोवा घेतला पाहिजे, असे प्रतिपादन केले आहे. याच राव याची ‘आयसीएचआर’च्या अध्यक्षपदी निवड
झाली तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. प्रा.राव यांनी एकही संशोधनपर निबंध वा प्रबंध सादर केलेला
नाही वा तो कुठे प्रसिद्धही झालेला नाही, असा
त्यांच्यावर आक्षेप आहे. पण, याच मुलाखतीमध्ये त्यांनी स्वत:ला एक विशेष प्रकारचे इतिहासतज्ज्ञ
म्हणून संबोधून घेतले आहे. कारण त्यांचा आदर्श दुसरे, तिसरे कोणी नसून साक्षात रामायणकार वाल्मीकीच आहेत!
महात्मा गांधी यांनी एका ठिकाणी असे म्हणून ठेवले आहे की, महाभारताकडे एक इतिहास म्हणून न पाहता एक रूपक म्हणूनच पाहिले पाहिजे. भारतातील बव्हंशी लोकही महाभारताकडे एक अत्यंत सूक्ष्मदर्शी महाकाव्य, उत्कृष्ट रूपक आणि नीतीची शिकवण देणारा ग्रंथ म्हणूनच पाहतात. यापैकी कोणीही महाभारताकडे इतिहास या अर्थाने पाहत नाही. परंतु प्रा.राव यांच्या मते, मात्र महाभारतात जे जे काही नमूद करून ठेवले आहे ते ते त्या काळामध्ये प्रत्यक्षात घडूनच गेले आहे. परिणामी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये आपण महाभारताला भारताच्या इतिहासाचे एक प्रमुख स्थान म्हणून दर्जा मिळवून देणार आहोत, असा आशावादही ते बाळगून आहेत व मुलाखतीत त्यांनी तो प्रकटही करून ठेवला आहे.
माझ्या मते, नजीकच्या भविष्यकाळात तरी भारत देश जगातील एक वैज्ञानिक महासत्ता बनू शकत नाही. पण दंतकथा पसरविणारी जगातील एक महाशक्ती म्हणून भारत निश्चितच उदयास आला आहे व त्यावर आपण समाधान मानून घेऊ शकतो.
(इतिहासकार आणि स्तंभलेखक)

Web Title: India is a great power distributing fables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.