सेल्फीद्वारे मृत्यूमध्ये भारत आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 03:02 AM2018-10-26T03:02:15+5:302018-10-26T03:02:21+5:30

आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. एकविसाव्या शतकात संगणक व मोबाइल क्रांतीने जीवन पद्धतीचे सर्व संदर्भ बदलले आहेत.

India leads the way in self-mortality | सेल्फीद्वारे मृत्यूमध्ये भारत आघाडीवर

सेल्फीद्वारे मृत्यूमध्ये भारत आघाडीवर

Next

- डॉ. दीपक शिकारपूर 
आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. एकविसाव्या शतकात संगणक व मोबाइल क्रांतीने जीवन पद्धतीचे सर्व संदर्भ बदलले आहेत. प्रत्येक वस्तू, उपकरण हे ‘स्मार्ट’ असणे आज चैन नसून गरज होत चालली आहे़ सध्या नव्या पिढीच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे आणि या फोनवर चांगले फोटो काढणे सोपे असल्याने स्मार्ट तरुणांना पदोपदी फोटो काढण्याचे वेड जडलेले आहे. स्मार्टफोनमध्ये असलेल्या सेल्फीच्या सोयीमुळे स्वत:चाच फोटो काढणे सोयीचे झाले आहे. हा अतिरेक काही जणांच्या बाबतीत व्यसानकडे झुकू लागला आहे. संगणक व इतर उपकरणे आपले जीवन सुसह्य करण्यासाठी निर्माण केली आहेत. पण दुर्दैवाने अनेक त्याच्या अधीन झाले आहेत. सेल्फीचे भूत आजकाल प्रत्येकाच्याच डोक्यावर चढलेले आहे. स्मार्टफोन मिळताच जो तो सेल्फी काढत फिरत आहे. सेल्फीचा अतिरेक हा मूर्खपणा नक्कीच आहे़ हा मानसिक आजारपण असू शकतो़
अनेक तरुण (मुले /मुली) अगदी कपडे बदलले की त्या बदलाची सेल्फी काढतात. क्षणोक्षणी सेल्फी काढण्याचे प्रकार नित्य आढळत आहेत. त्यांच्या हातात फोन आहे आणि सेल्फी त्यांची त्यांनाच काढायची आह़े़ त्यामुळे त्यांना ती काढण्यास कोणी अटकाव करू शकत नाही. परंतु त्यासाठीसुद्धा काही तारतम्य पाळले पाहिजे की नाही? आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यात काय अर्थ आहे?
सध्या लहान मुले, अबालवृद्ध आणि समस्त युवा वर्गाला पर्यटनस्थळी गेल्यावर तेथील ठिकाणाची छबी, दृश्य टिपण्याची नवी क्रेझ रूढ झाली आहे. आपापल्या मोबाइलद्वारे (सेल्फी) काढण्याची क्रेझ रूढ झाली आहे. फाजील आत्मविश्वास, अतिउत्साह, स्टंटगिरी करत अनेक जण अत्यंत धोकादायक ठिकाणी जाऊन मोबाइलद्वारे सेल्फी काढतात. गड, किल्ले, उंच डोंगर, सुळके, खोल दर्या, धबधबे, कडेकपारी, गुहा, वेगवान जलप्रवाह, खोल जलाशये अशा विविध ठिकाणी पर्यटनाला गेल्यावर तेथील परिसरातील धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याची क्रेझ केवळ युवकांमध्येच नाही, तर सर्वांमध्ये वाढल्याचे वास्तव आहे. धोकादायक ठिकाणाच्या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका मुलाने सापाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला़ हत्तीबरोबर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एक तरुण हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला. सेल्फी म्हणजे असे काय आहे की ज्याच्यासाठी आपल्या प्राणाचीही पर्वा करू नये? ती प्राणाच्या पलीकडे आहे का? दुर्दैवाने आपला देश ह्या प्रकारच्या सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये आघाडीवर आहे़ कमी वयात हातात येणारा पैसा. त्याच्या विनियोगाकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत आहे. शाळा, महाविद्यालये इथेही संगणक, स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक व्हावे. नागरिक शास्त्र विषयात याचा समावेश व्हायची हीच वेळ आहे.
कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते. मोबाइल तंत्रज्ञानाचेपण असेच आहे. गरज असेल तरच ते वापरा. वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, बाह्यक्रिया, योगा, फिरणे, संगीत असे अनेक पर्याय आहेत. मोबाइल न वापरायची सवयपण झाली पाहिजे. माझा एक मित्र रविवारी मोबाइल, नेट अजिबात वापरत नाही. स्वत:वर बंधन व शिस्त या बाबतीतही आवश्यक आहे. माफक प्रमाणात हवे तेव्हाच जर आपण हे तंत्रज्ञान वापरले तर त्याचे अनेक फायदेही आहेत़
(संगणक साक्षरता प्रसारक)

Web Title: India leads the way in self-mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.