चीनशी मुकाबला करण्यासाठी रशिया व अमेरिका यांची मैत्री व विश्वास वाढविणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:34 AM2019-09-17T05:34:05+5:302019-09-17T05:34:23+5:30

आताची युद्धे युद्धभूमीवर लढविली जात नाहीत. ज्या देशांनी अण्वस्त्रे विकसित केली ते देश आता त्यांचे पारंपरिक सैन्य व शस्त्रे कमी करण्याच्या मार्गालाही लागली आहेत.

india need to increase friendship Russia and US because of China | चीनशी मुकाबला करण्यासाठी रशिया व अमेरिका यांची मैत्री व विश्वास वाढविणे आवश्यक

चीनशी मुकाबला करण्यासाठी रशिया व अमेरिका यांची मैत्री व विश्वास वाढविणे आवश्यक

googlenewsNext

आताची युद्धे युद्धभूमीवर लढविली जात नाहीत. ज्या देशांनी अण्वस्त्रे विकसित केली ते देश आता त्यांचे पारंपरिक सैन्य व शस्त्रे कमी करण्याच्या मार्गालाही लागली आहेत. चीन व रशिया यांनी त्याचा आरंभही केला आहे. ‘पारंपरिक शस्त्रांनिशी लढताना आम्हाला एखादेवेळी मात खावी लागेल, परंतु कोणतेही राष्ट्र युद्धातील पराभव सहजासहजी सहन करीत नाही. पाकिस्तानही तो तसा करणार नाही,’ असे सांगून त्याचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, ‘आमच्या शस्त्रागारात शक्तिशाली अण्वस्त्रे आहेत आणि ती वाहून नेणारी बलशाली क्षेपणास्त्रेही आहेत. वेळ आली तर आम्ही त्याचा उपयोग करणारच नाही असे नाही. मात्र, तसे झाल्यास आशियाच्या या दक्षिण क्षेत्रात अणुयुद्धाचा भडका उडेल व तो साऱ्यांसाठीच हानिकारक ठरेल,’ अशी धमकीवजा पुस्तीही त्यांनी आपल्या वक्तव्यात जोडली. भारताशी आजवर झालेली पारंपरिक शस्त्रांची सगळी युद्धे पाकिस्तानने गमावली आहेत. १९६५ चे शास्त्रीजींच्या नेतृत्वातील युद्ध वा इंदिरा गांधींच्या नेतृत्वात झालेले बांगलादेशचे युद्ध तो देश हरला आहे. मात्र, भारतात वाजपेयी सरकारने देशात पाच अणुबॉम्बचा स्फोट पोखरणच्या क्षेत्रात केला. त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानच्या नवाज शरीफांनी लागलीच सहा अणुबॉम्बचे स्फोट त्यांच्या क्षेत्रात घडविले. भारताने अग्नी-१, २ अशी क्षेपणास्त्रांची मालिका यशस्वी केली तर पाकिस्तानेही शाहीन १, २ ची क्षेपणास्त्रांची मालिका तयार केली. आताचा इम्रान खान यांचा स्फोट काश्मीरचा आहे.


भारत सरकारने आपल्या घटनेतील ३७ वे कलम ३५-अ सह रद्द करून काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केले आहे. परिणामी, याची स्वायत्तता जाऊन त्यावर केंद्राची सत्ता आली आहे. इम्रान खान यांच्या मते हा भारताने पाकिस्तानचा व सगळ्या मुस्लीम देशांचा केलेला अधिक्षेप आहे. वास्तविक जे झाले तो भारताचा अंतर्गत प्रश्न असून त्याच्याशी आम्हाला काही घेणे-देणे नाही असे जगातील अनेक देशांनी जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही हा प्रश्न भारत व पाकिस्तान यांनी चर्चा करून सोडवावा असे म्हटले आहे. अपवाद आहे तो फक्त अमेरिकेच्या ट्रम्प यांचा. त्यांना अधूनमधून काश्मीर प्रश्नाबाबत मध्यस्थी करण्याची उबळ येते. पण, काही काळातच ती थांबते. चीनची भूमिका मात्र अजून संशयास्पद आहे. तो देश लेह-लडाखच्या प्रदेशावर हक्क सांगणारा आहे. शिवाय अक्साई चीनवरही आपलाच अधिकार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्या प्रदेशातून त्याने ७५० मैल लांबीची एक सडकही जगाला थांगपत्ता न लागू देता बांधून काढली आहे. शिवाय चीनचे शस्त्रबळ भारताहून दहा पटींनी मोठे आहे. पाकिस्तान आणि चीन यांचे संबंध मैत्रीचे आहेत. त्यामुळे इम्रान खान यांच्या वक्तव्यामागे चीनचे पाठबळ नसेलच, असे म्हणता येणार नाही. भारताने नवी क्षेपणास्त्रे बांधली आहेत. अण्वस्त्रांचीही निर्मिती केली आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी दिलेल्या धमकीचे सूतोवाच सहजगत्या डावलता येणार नाही. त्यासाठी आपल्याही बाजूने आपण सावध व सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचवेळी चीनच्या हालचालींवरही आपली करडी नजर राहणे आवश्यक आहे. नीता या भारतातील बाराहोती या उत्तर प्रदेशातील गावानजीक असलेल्या खिंडीवर चीनने त्याचा हक्क सांगितला असून तिला त्याने तंजुमला हे नाव दिले आहे. शिवाय बाराहोतीचे नावही बदलून त्याने त्याचा उल्लेख वू झू असा केला आहे.

इम्रानची धमकी आणि चीनचे हे पवित्रे काळजी करावी असे आहेत. डोकलामच्या क्षेत्रात भारतीय सैन्य चिनी सैन्याच्या समोर प्रत्यक्ष उभेही झाले आहे. चीन हा कोणतेही कारण न देता वा पूर्वसूचनेवाचून हल्ला करणारा देश आहे व त्याचा अनुभव आपण १९६२ मध्ये घेतला आहे. त्यामुळे हा काळ केवळ अण्वस्त्रे बनविण्याचा नसून बलशाली देश आपल्या बाजूने आणण्याचा आहे. त्यासाठी रशिया व अमेरिका यांची मैत्री व विश्वास वाढविणे गरजेचे आहे. दोन्ही आघाड्यांवर युद्ध लढविण्याची भाषा आपले सेनाधिकारी बोलतात. मात्र त्यातले गांभीर्यही जोखून पाहावे असे आहे. काश्मीरचा प्रश्न आपल्या मते सुटला व निकालात निघाला आहे. पाकिस्तानला मात्र तो जिवंत ठेवायचा आहे. त्याचे सारे राजकारणच त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे यापुढच्या काळात पाकिस्तान व चीन यांच्याएवढीच आपल्याही मित्र राष्ट्रांची काळजी घेणे भारताला गरजेचे आहे. तशी ती घेतली जाईल व देश शांततेत राहील असाच आशावाद आपण बाळगला पाहिजे.

Web Title: india need to increase friendship Russia and US because of China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.