India-Pakistan War 1971: ‘‘रावलपिंडी के हरामजादोने हमे मरवा दिया !’’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 06:09 AM2021-12-03T06:09:21+5:302021-12-03T06:10:06+5:30

India-Pakistan War 1971: १९७१ : बांगलादेश युद्धाच्या आठवणी, ३ डिसेंबर १९७१ रोजी भारताने बांगलादेशच्या मुक्ती संग्रामात उडी घेतली, त्या घटनेला आज ५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने...

India-Pakistan War 1971: "Rawalpindi bastards killed us!" | India-Pakistan War 1971: ‘‘रावलपिंडी के हरामजादोने हमे मरवा दिया !’’

India-Pakistan War 1971: ‘‘रावलपिंडी के हरामजादोने हमे मरवा दिया !’’

Next

- दिवाकर देशपांडे
(ज्येष्ठ पत्रकार)
जगाच्या युद्ध इतिहासातील १९७१ चं बांगलादेश युद्ध एक अद्वितीय युद्ध म्हणावं लागेल. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच या युद्धात हवाई सैनिकांचं सर्वात मोठं पॅराड्रॉपिंग करण्यात करण्यात आलं.  एक बटालियन म्हणजे ८०० सैनिकांना हवाई छत्रीच्या साह्याने युद्ध क्षेत्रात उतरवले. या युद्धाचं ध्येय ढाका ही पूर्व पाकिस्तानची राजधानी ताब्यात घेऊन तेथे बांगलादेश या नव्या देशाचं नवं सरकार स्थापन करणं हे होतं. पूर्व पाकिस्तानच्या तिन्ही बाजूला असलेल्या भारतीय भू प्रदेशातून भारतीय सेनेनं ढाक्याच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली. त्रिपुराकडून येणाऱ्या भारतीय सैन्याची वाट पाकिस्तानी सैन्याच्या काही तुकड्यांनी अडवल्याने ढाक्याकडे कूच करण्यात अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा दूर करायचा असेल तर,  ८०० सैनिकांची एक तुकडी युद्ध साहित्यासह शत्रूच्या पिछाडीला उतरवणं आवश्यक होतं... ढाक्याच्या वायव्येस ८५ किलोमीटरवर असलेल्या टंगेल या ठिकाणाची निवड करण्यात आली. हवाई  सैनिक नेमके कुठे उतरवायचे,  युद्ध साहित्य कुठे उतरवून  कसं गोळा करायचं व पाक सैनिकांवर कसा हल्ला करायचा आदी गोष्टी ठरविण्याची कामगिरी ५० पॅराब्रिगेडचे सिग्नल ऑफिसर कॅप्टन पी. के. घोष यांच्यावर सोपविण्यात आली. त्यासाठी त्यांनी जवळपास दोन महिने आधीच शत्रू प्रदेशात घुसून सैनिक उतरविण्याची जागा निश्चित केली होती.

११ डिसेंबर या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यापासून टंगेल जिल्ह्याच्या पुंगली ब्रिज या ठिकाणी सैनिक उतरविण्यास सुरुवात झाली. भारतीय हवाईदलाची पन्नास सैनिक व मालवाहक विमानं कोलकात्याजवळील डमडम व कलाईकोंडा या विमानतळावरून उडाली व संध्याकाळी पाचनंतरच्या संधीप्रकाशात त्यांनी टंगेलच्या पुंगलीब्रिज भागावर येऊन हवाई छत्रीच्या साह्याने सैनिक उतरविण्यास  सुरुवात केली. त्यानंतर मालवाहक विमानांनी अवजड युद्ध सामग्री म्हणजे शस्त्रास्त्रे, वाहने, दारूगोळा, खाद्यपदार्थ ही सर्व सामग्री संध्याकाळपर्यंत यशस्वीरीत्या  उतरविण्यात आली.  हवाईमार्गाने उतरलेल्या तुकडीकडे उत्तरेकडून मैमनसिंगहून दक्षिणेकडे ढाक्याच्या रक्षणासाठी येणाऱ्या पाकिस्तानच्या ९३ व्या ब्रिगेडचा मार्ग अडवणं हे हे मुख्य काम होतं. पुंगली ब्रिज परिसरात त्याच रात्री भारतीय व पाक सैनिकांत जोरदार धुमश्चक्री झाली. उत्तरेकडून पहिली मराठा बटालियन व दक्षिणेकडून भारतीय दुसऱ्या पॅरा बटालियन यांच्या माऱ्यात पाकिस्तानी ब्रिगेड सापडली व तिचा धुव्वा उडाला.

छत्रीधारी सैनिक उतरविण्याची दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी घटना आहे, त्यानंतर आजतागायत कुणीही असा प्रयत्न केलेला नाही. हा एक धाडसी व अनोखा प्रयत्न भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलेला आहे. टंगेलची लढाई जिंकून १३ डिसेंबरला ढाक्यात प्रवेश करणारं मराठा व पॅरा बटालियन हे पहिलं भारतीय लष्करी पथक होतं. याच काळात अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका बंगालच्या उपसागराच्या दिशेने निघाली होती आणि संयुक्त राष्ट्रसंघात युद्ध बंदीचा प्रस्ताव येऊ घातला होता, त्यामुळे दोन-तीन दिवसांत ढाका ताब्यात घेऊन पाकिस्तानी सैनिकांना शरण आणणं भाग होतं. १४ डिसेंबरला पूर्व पाकिस्तानच्या गव्हर्नरनी  सैनिक अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याची माहिती भारतीय गुप्तचरांना आधीच कळली होती. लष्कर प्रमुखांनी ही बैठक होत असलेल्या गव्हर्न्मेंट हाऊसवर हवाई दलाला अशा प्रकारे बॉम्बफेक करण्यास सांगितले की, त्यात इमारतीचेही नुकसान झाले नाही पाहिजे आणि आतली एकही व्यक्ती ठार नाही झाली पाहिजे. हवाई दलाच्या बॉम्बफेकी विमानांनी ही अचाट कामगिरी करून दाखवली.. त्याचा गव्हर्नर व लष्करी अधिकाऱ्यांनी असा धसका घेतला की, आपण हे युद्ध जिंकणं शक्य नाही, याची त्यांना खात्री पटली. त्यातच आदल्या रात्री टंगेलजवळ भारताचे एक ब्रिगेड हवाई छत्रीधारी सैनिक उतरल्याची बातमी त्यांना रेडिओवरून कळली होती. ही बातमी भारत सरकारच्या प्रसिद्धी विभागाने प्रसारित केली होती व छत्रीधारी सैनिक उतरविण्याच्या सरावाचं एक छायाचित्रही प्रसिद्धीसाठी दिलं होतं. त्या छायाचित्राचा पूर्व पाकिस्तानातील पाक लष्करावर एवढा मानसिक परिणाम झाला की, ‘‘आता आपण मेलो’’ असंच त्यांना वाटलं... 

मराठा व पॅरा बटालियनचे अधिकारी मेजर निर्भय शर्मा  पूर्व पाकिस्तानातील पाक लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एएके नियाझी यांना भेटायला गेले... मेजर शर्मा म्हणतात,‘‘ जनरल नियाझी यांना मी भेटलो तेव्हा मला धक्काच बसला... त्यांची दाढी वाढली होती... अंगावरचा गणवेश चुरगळला होता व ते हताश होऊन शून्यात दृष्टी लावून बसले होते !’’मेजर शर्मा यांनी त्यांना शरणागतीची तयारी करण्यास सांगितल्यावर ते चिडून म्हणाले, ‘‘रावलपिंडी के हरामजादोने हमे मरवा दिया !’’ - यानंतरचा इतिहास सर्वांना माहीतच आहे...

Web Title: India-Pakistan War 1971: "Rawalpindi bastards killed us!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.