अमेरिका, इस्त्रायल, ब्रिटनकडून शिकावे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 10:44 AM2021-09-14T10:44:27+5:302021-09-14T10:45:26+5:30
हे तीनही देश सध्या कोरोनाची ‘टाइमलाइन’ आणि लसीकरणात भारताच्या पुढे आहेत ! त्यांच्या अनुभवातून आपण शिकावेत असे बरेच धडे आहेत!
डॉ. संग्राम पाटील
अमेरिका, इस्त्राएल व ब्रिटन हे तिन्ही देश कोरोनाच्या टाइमलाइनवर आणि लसीकरणात देखील भारताच्या पुढे आहेत. आज त्यांना येणारे अनुभव भारतासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अमेरिकेत तिसरी लाट सुूरू असून इथल्या कमी लसीकरण झालेल्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये आहे, ती परिस्थिती भारतातील संभाव्य तिसऱ्या लाटेत अनुभवास येऊ शकते. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले असताना तिसरी लाट येऊन गेलीय. अशी परिस्थिती आपल्याकडे भविष्यात साधारणतः २०२२ मध्ये येईल आणि इस्त्राएलमध्ये डेल्टाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले असताना रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्या वाढतेय, तिसरा डोस (बूस्टर) युद्धपातळीवर दिला जातोय.
अमेरिकेत सध्या काय सुरू आहे?
अमेरिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खूप लोक गमावले. दुसरी लाट ओसरते तोवर डेल्टा व्हेरियंट आज अमेरिकेत पुन्हा संक्रमण वाढवत आहे. अमेरिकेत ५२.२ टक्के लोकांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन झालेत आणि ६१.५ टक्के लोकांना एक डोस मिळालाय. हे प्रमाण ब्रिटन, इस्त्राईल या देशांपेक्षा कमी असले तरी उर्वरित जगाच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. अमेरिकेने मुलांचेदेखील लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले आहे. लसीकरणाला कमी प्रतिसाद असलेल्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये तिसऱ्या लाटेत डेल्टामुळे मोठ्या प्रमाणावर संक्रमण होताना दिसते आहे. गंभीर कोविड होणाऱ्यांमध्ये आणि मृत्युंमध्ये लसीकरण न झालेल्यांचे प्रमाण लस घेतलेल्यांपेक्षा खूपच जास्त आहे. मुलांमध्येही संक्रमण वाढल्यामुळे पेडियाट्रिक हॉस्पिटल्सवर ताण आलाय.
ब्रिटनमध्ये सध्या काय सुरू आहे?
ब्रिटनमध्ये पहिल्या लाटेत प्रचंड जीवितहानी झाली (४१,००० मृत्यू). दुसरी लाट प्रामुख्याने ब्रिटिश अल्फा व्हेरियंटच्या (B1.1.7) प्रसारामुळे झाली. या लाटेत ब्रिटिश आरोग्य सेवेवर प्रचंड ताण आला आणि लोकही मोठ्या प्रमाणावर दगावले. लसीकरणाच्या अगदी सुरुवातीपासून एक डोस मिळालेल्या लोकांनादेखील चांगले संरक्षण मिळू लागल्याने मृत्यूचे प्रमाण लसीकरण झालेल्यांमध्ये बऱ्यापैकी कमी झाले. यावर्षी जून-जुलैमध्ये डेल्टा व्हायरसमुळे तिसरी लाट आली, तेव्हा ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले होते. दुसऱ्या लाटेच्या काळात मुलांच्या शाळा आणि कॉलेजेस् उघडली. २०२१ मधील काही आठवडे सोडल्यास शाळा पूर्णपणे सुरु राहिल्या आहेत. ब्रिटिश यंत्रणांचा निष्कर्ष असा, की शाळेतून मुलांना किंवा शिक्षकांना जास्तीचा धोका होत नाही. त्यामुळे शाळा बंद ठेवून महामारीच्या नियंत्रणात खूप असा फायदा नाही. उलट शाळा बंद ठेवून होणारी हानी अधिक घातक आहे. ब्रिटनमध्ये तिसरी लाट सध्या ओसरते आहे. दररोज दवाखान्यात भरती होणारे आणि कोविडमुळे मरणारे लोक दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी प्रमाणात आहेत. लसीकरण होऊनही ब्रिटनमध्ये डेल्टाच्या लाटेत लोक संक्रमित झाले, पण गंभीर आजार किंवा मरणाचे प्रमाण लसीकरणामुळे खूप कमी झाले.
इस्त्रायलमध्ये सध्या काय सुरु आहे?
मागच्या वर्षी एप्रिल-मेमध्ये आलेली पहिली लाट आटोक्यात आणून इस्त्रायलने जगापुढे एक आदर्श ठेवला होता. जुलै २०२० मधली दुसरी लाटही इस्त्रायलने उत्तम मॅनेज केली. डिसेंबर २० ते मार्च २१ यादरम्यानच्या तिसऱ्या लाटेत दिवसाला ८-१० हजार पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दररोज ५०-७० रुग्ण कोविडनी दगावले. याच काळात इस्त्रायलने जगात सर्वांत जलद लसीकरण केले. जून महिन्यापासून इस्त्रायलमध्ये निर्बंध उठवण्यात आले.
जुलैपासून मात्र डेल्टा व्हेरियंटमुळे चौथी लाट सुरू झालीय आणि ती वाढत जाऊन आज ८-९ हजार केसेसची दररोज नोंद होतेय. दिवसाला २०-२५ लोक कोरोनाने जीव गमावताहेत. या देशात एकूण लोकसंख्येच्या साधारण ६० टक्के लोकांनी लस घेतली आहे. तरी चौथी लाट का आली? कारण इस्त्रायलने संपूर्ण लसीकरण किंवा हर्ड इम्युनिटी येण्याआधी जूनमध्ये मास्क आणि नियम पूर्ण शिथिल केले. जुलैपासून डेल्टामुळे संक्रमण वाढायला लागले. म्हणजे ६० टक्के समाजाचे लसीकरण डेल्टा व्हायरसला थांबविण्यासाठी पुरेसे नाही. ३० जुलैपासून इस्त्रायलमध्ये तिसरा डोस देण्याचे काम सुरू झाले. बूस्टर डोस घेतलेल्या ६० वर्षांवरील लोकांमध्ये संक्रमण बरेच कमी दिसून येतेय आणि या गटात मृत्यूदेखील मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत.
भारतात काय होणे अपेक्षित आहे?
पहिल्या लाटेदरम्यान मोठी जीवितहानी आपल्याकडे झाली. ह्या वर्षाच्या सुरुवातीला डेल्टा व्हायरसच्या उपस्थितीत मोठमोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांच्या आयोजनामुळे आपण भयंकर दुसरी लाट अनुभवली, जी अजूनही काही राज्यांमध्ये सुरूच आहे. काही राज्यांमध्ये आता तिसऱ्या लाटेची चाहुल लागलीय. आपला लसीकरणाचा एकूण आकडा मोठा दिसत असला तरी टक्केवारीत आपण बरेच मागे आहोत आणि लसीकरण न झालेले लोक मोकळे फिरत असल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता वाढलेली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला वरील तिन्ही देशांमधले अनुभव ध्यानात घेऊन काही तातडीच्या उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपल्याला काय तयारी करावी लागेल?
१. आकड्यांशिवाय लढाई नको! - प्रत्यक्ष रुग्णसंख्या तंतोतंत न नोंदविल्यास आपल्यासमोरील समस्येचं खरं स्वरूप आणि आवाका किती मोठा आहे, हे आपल्याला कळणारच नाही. देशाच्या वेगवेगळ्या भागात अँटिबॉडी सिरो सर्व्हे, विषाणूचे नियमित जिनोमिक सर्व्हे, टेस्टिंगचे नियोजन यात तत्परता ठेवावी लागेल. तंतोतंत डेटा कलेक्शनशिवाय सर्व प्लानिंग आणि योजनांची अंमलबजावणी फोल ठरेल.
२. निवडणुकांप्रमाणे नियोजन - ज्याप्रमाणे प्रस्थापित राजकीय पक्ष निवडणुकीत प्रत्येक बुथसाठी सूक्ष्म नियोजन करतात तसेच नियोजन कोरोनाविरुद्ध आवश्यक आहे. यात लसींचा पुरवठा, रुग्णांना उपचार, कोरोना योद्ध्यांना आवश्यक सामग्री, कोरोना काळात सामान्य माणसाला जगणं शक्य व्हावं, यासाठी आवश्यक ती प्रशासकीय आणि शासकीय तयारी युद्धपातळीवर करावी लागेल. इतर देशांना आलेला अनुभव आणि या आधीच्या लाटांमध्ये आपल्या देशाने घेतलेला स्वानुभव यातून धडा घेणे हाच उपाय आहे!