अमेरिकेच्या धमकीला भारताने मुळीच जुमानू नये
By विजय दर्डा | Published: July 2, 2018 05:05 AM2018-07-02T05:05:43+5:302018-07-02T05:06:14+5:30
हा सुंदर शेर आहे मिर्झा गालिबचा. त्याचा अर्थ आहे - एकदा मनात ठाम निश्चय केला की, काशी व काशान यांच्यातील अंतर केवळ अर्ध्या पावलाचे होते. काशान हे इराणमधील एक सुंदर शहर आहे.
जनूनत गरबे नफ्से-खुद तमाम अस्त/ ज़े-काशी पा-बे काशान नीम गाम अस्त!
हा सुंदर शेर आहे मिर्झा गालिबचा. त्याचा अर्थ आहे - एकदा मनात ठाम निश्चय केला की, काशी व काशान यांच्यातील अंतर केवळ अर्ध्या पावलाचे होते. काशान हे इराणमधील एक सुंदर शहर आहे. सन २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इराणच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांना हा शेर ऐकविला होता व याचेही स्मरण दिले होते की, गुजरातमध्ये २००१ मध्ये विनाशकारी भूकंप झाला तेव्हा मदतीसाठी सर्वप्रथम धावून आलेल्या देशांमध्ये इराण होता.
भारत आणि इराण यांचे कित्येक शतकांपासून मित्रत्वाचे संबंध आहेत, हे निर्विवाद. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस राजवटीत ही मैत्री बहरली. मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर ही मैत्री आणखी वाढविली. गालिबच्या भाषेत सांगायचे तर काशी व काशान यांच्यातील अंतर कमी होत आहे. दोन्ही देशांमध्ये उत्तम सहकार्य आहे व भारताची पेट्रोलियमची बरीचशी गरज इराणकडून भागविली जाते. पण यात आता मोठी अडचण उभी राहिली आहे. इराण व अमेरिका यांच्यातील संबंध सध्या खूप खराब आहेत. अमेरिकेने इराणशी पूर्वी केलेल्या करारातून अंग काढून घेतले आहे. इराणला अद्दल घडवावी, असे अमेरिकेस वाटते. त्यासाठी इराणशी व्यापारी व व्यावसायिक संबंध ठेवणाºया सर्व देशांना अमेरिका धमकावत आहे. अमेरिकेने अशी धमकी भारतासही दिली आहे.
अमेरिकेच्या धमकीपुढे भारत झुकणार का, हा प्रश्न आहे. भारताने अजिबात झुकता कामा नये, असे मला वाटते. कारण इराणच्या बाबतीत अमेरिकेला साथ देणे म्हणजे भारताने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे ठरेल. इराणने जेव्हा गरज होती तेव्हा आपल्याला साथ दिलेली आहे. इराण आपल्याला खनिज तेल पुरवितो, एवढेच नव्हे तर चाबहार बंदराच्या रूपाने त्याने भारताला बहुमोल भेट दिली आहे. आशिया खंडाच्या या भागात दबदबा निर्माण करण्यासाठी चाबहार बंदर आपल्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. परदेशातील भारताचे हे पहिले बंदर आहे व पुढील १० वर्षे ते भारताकडेच राहणार आहे. चाबहार बंदराच्या माध्यमातून थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचणे भारताला सुगम झाले आहे. या बंदरातून भारताने अफगाणिस्तानला गहू पाठवायला सुरुवात केली आहे. पूर्वी अफगाणिस्तानला रस्ता मार्गाने पाकिस्तानमधून जावे लागे. चाबहार बंदर भारताच्या केवळ आर्थिक फायद्याचेच नाही. वेळ पडली तर ्त्याचा लष्करी वापरही करता येईल. याखेरीज इराणच्या जाहेदान शहरापर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याचे भारताच्या मदतीने सुरु असलेले कामही लवकरच पूर्ण होईल. जाहेदान शहर अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या सीमेवर आहे. ही रेल्वे पूर्ण झाली की, पाकिस्तानला अफगाणिस्तान सीमेवरूनही घेरणे आपल्याला शक्य होईल.
आपण जगाचा नकाशा पाहिला तर लक्षात येईल की, भारताला मध्य आशिया, रशिया व पूर्व युरोपात जाण्यासाठी इराण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच की, ज्या देशाशी आपले एवढे हितसंबंध जोडलेले आहेत व ज्या देशाने आपल्याविषयी नेहमीच सकारात्मक धोरण ठेवले आहे त्या इराणची साथ अमेरिका धमकी देते म्हणून आपण कशी सोडून चालेल? भारताने इराणकडून तेल खरेदी करू नये, यासाठी अमेरिका जरूर दबाव आणेल. इराणमध्ये काम करणाºया व इराणशी संबंध ठेवणाºया आंतरराष्ट्रीय कंपन्यांवरही अमेरिका प्रतिबंध लागू करेल. तसे झाले तर चाबहार बंदर व जाहेदान रेल्वेमार्गाच्या कामात त्या हात आखडता घेतील. त्यासाठी भारताने तयार असायला हवे. आंतरराष्ट्रीय निर्बंध झेलण्याचा अनुभव भारताकडे आहे. पोखरणमध्ये भारताने अणुस्फोट केला तेव्हा अमेरिकेनेच नव्हे तर इतरही अनेक देशांनी भारतावर निर्बंध लादले होते. पण त्याने आपले काहीच बिघडले नाही.
इराणच्या बाबतीत भारताला खूप सावधपणे पावले टाकावी लागतील. सध्याच्या परिस्थितीत भारताने अमेरिकेची धमकी झुगारून आपल्या हितानुरूप राजनैतिक व्यूहरचना केली तर इराण आपल्याविषयी अधिक सहृदय होईल. भारताला स्वस्त दराने नैसर्गिक वायू देण्यावरही इराण विचार करत आहे. युरिया उत्पादनासाठी २.९५ डॉलर प्रति दशलक्ष बीटीयू या दराने नैसर्गिक वायू देण्याचा प्रस्ताव इराणने याआधीच दिला आहे. भारताला हा दर आणखी कमी करून हवा आहे. या परीक्षेच्या घडीला भारताने इराणसोबत ठाम राहण्याचा मार्ग काढला तर नक्कीच व्यापार-व्यवसाय वाढेल व दोन्ही देश एकत्रितपणे एक ताकद म्हणून उभे राहू शकतील. इराणमधून नैसर्गिक वायू आणण्यासाठी तेथून एक पाईपलाईन टाकावी, असा भारताचा प्रयत्न आहे. ते शक्य झाले तर त्याच पाईपलाईनने तुर्कमेनिस्तान व ओमान हे देशही भारताला नैसर्गिक वायू पाठवू शकतील. या पाईपलाईनला इराणची सहमती आहे. इराणला भारताने साथ दिली नाही तर तो चीनकडे झुकू शकेल, हेही लक्षात घ्यायला हवे. इराणला वश करण्याचा चीनचा फार दिवसांपासून प्रयत्न आहे. इराणमध्ये कोळसा, रेल्वे, जहाजवाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला अपार वाव आहे. इराण भारताच्या हातून गेले तर चिनी कंपन्यांचे फावेल. म्हणूनच भारताने ठामपणे अमेरिकेच्या विरोधात उभे राहावे, असे मला वाटते. आमच्या हिताची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत, त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार अमेरिकेस नाही, हे आपण जगाला दाखवून द्यायला हवे!
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची १६ जुलै रोजी फिनलँडमध्ये हेलसिंकी येथे भेट ठरली, ही चांगली बातमी आहे. चांगले अशासाठी की हे दोन बलाढ्य देश आहेत व त्यांचे आपसातील संबंध कसे आहेत, याचा परिणाम जगातील इतर देशांवरही होत असतो. हे दोन्ही देश वैर विसरून अधिक चांगले जग तयार करण्यास मदत करतील, अशी आशा करू या.