वाचनीय लेख - हातून निसटलेल्या सुवर्णसंधीची दुखरी हुरहुर
By विजय दर्डा | Published: November 20, 2023 06:23 AM2023-11-20T06:23:40+5:302023-11-20T06:24:25+5:30
खेळाच्या मैदानावर कुणी एक संघ जिंकतो, दुसरा हरतो! परंतु खेळापेक्षाही महत्त्वाची खिलाडूवृत्ती! दोन्ही संघांचे मोकळ्या मनाने अभिनंदन!!
डाॅ. विजय दर्डा
भारतीय संघाचा अजेय संकल्प होता आणि १४० कोटी भारतीय क्रिकेटचा विश्वचषक उंचावला जाण्याच्या विजयी क्षणाकडे डोळे लावून बसले होते. म्हणून तर प्रत्येकाच्या जिव्हारी लागलेला भारतीय संघाचा पराभव पचवणे कठीण जात आहे! - पण अंतिम सत्य तेच आहे, हेही खरेच! या स्पर्धेच्या प्रारंभापासून सगळे खेळाडू उत्तम खेळत होते. एकामागून एक विजय मिळवत अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर अपेक्षाभंगाचा इतका मोठा झटका? एक सोनेरी संधी हातातून निसटल्याची ही वेदनादायी कहाणी भारतीयांच्या जीवाला चटका लावून गेली, हे खरेच!
भारतीय संघ प्रजासत्ताक भारताचे प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच तर भारतीयांसाठी क्रिकेट हा राष्ट्रीय धर्म होय! कोणताही खेळ असो, हार-जीत अपरिहार्यच! जिंकतो त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही; आणि जो हरतो तो उदास नक्कीच होतो; परंतु खरेतर पराभवसुद्धा जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. हरण्यातूनच जिंकण्याची ईर्षा उत्पन्न होते! मैदानावरच्या हार-जीतपेक्षा खिलाडूवृत्ती आणि त्यातले रिवाजी संकेत जास्त महत्त्वाचे असतात. यादृष्टीने दोन्ही संघ अभिनंदनास पात्र आहेत. उपांत्य सामन्याच्या शेवटी कोहलीने न्यूझीलंडचा कप्तान विल्यमसन याला मिठी मारली होती, ती आठवते?
मला इंग्लंडच्या संघाचीही आठवण येते आहे. भारताची उणीदुणी काढण्यात त्या संघाने कोणतीही कसर ठेवली नव्हती. एकीकडे सभ्य लोकांचा खेळ म्हणायचे आणि दुसरीकडे उणीदुणी काढायची? पण कोणत्याही दडपणाखाली न येता भारताने क्रिकेटच्या जन्मदात्याला हे दाखवून दिले की कधीकाळी तुम्ही आमच्यावर राज्य करत होतात, आज आम्ही तुमच्यावर करतो आहोत. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तो मैदानावरल्या श्रेष्ठत्वामुळे. भारताबद्दल बोलायचे तर या टप्प्यावर पोहोचण्याच्या मागे परिश्रम, आत्मविश्वास, प्रशिक्षण, समर्पण आणि जिंकण्याची अदम्य इच्छाशक्ती होती. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात- मग तो खेळ असो, व्यापार, व्यवसाय किंवा तंत्रज्ञान, वा राजकारण असो प्रत्येक ठिकाणी - हे गुण आवश्यक आहेत. ऑलिम्पिकपासून आशियाडपर्यंतच्या मैदानात छोटे छोटे देश पदकांच्या तालिकेत वरचे स्थान पटकावतात तर ते त्यांच्या समर्पणभावाचे फळ असते.
या देशात क्रिकेटचा खेळ धर्माच्या रूपात परिवर्तित होताना मी पाहिले आहे. तेंडुलकरला ‘क्रिकेटचा भगवान’ होताना पाहिले. महाराजा रणजितसिंह यांच्यापासून सी. के. नायडू, मुश्ताक अली, गावस्कर, सौरभ गांगुली आणि अगदी धोनीपर्यंतचा वारसा आपल्या समोर आहे. नाव तरी कोणाकोणाचे घ्यायचे? आपल्याकडे चांगल्या खेळाडूंची उणीव कधीच नव्हती. उणीव होती ती साधनसामग्रीची. काश्मीर घाटीतल्या छोट्या छोट्या गावांपासून देशातल्या वेगवेगळ्या भागातली मुले क्रिकेट खेळण्याची सामग्री नसताना हा खेळ खेळताना मी पाहिले आहे. शाळेपासून महाविद्यालयापर्यंत क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी, यष्टीरक्षण याचे गुरू म्हणजे प्रशिक्षक उपलब्ध करून दिले गेले तर भारतीय क्रिकेट कोणत्या टप्प्यावर जाऊन पोहोचेल, याचा विचार करा! भारताचे क्रिकेट नियामक मंडळ २ अब्ज २५ कोटी डॉलर्सची संपत्ती बाळगून जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट नियामक मंडळ झाले आहे. सरकार आणि क्रिकेट मंडळाला वाटले तर गावागावापर्यंत आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
दुसऱ्या खेळांच्या बाबतीतही आपल्याकडे ऐतिहासिक वारसा आहे. यवतमाळ हनुमान आखाड्याचा मी आज अध्यक्ष आहे, तिथले काही तरुण खेळाडू तत्कालीन अध्यक्ष काणे साहेबांच्या बरोबर ऑलिम्पिकमध्ये मलखांबाचे प्रदर्शन करण्यासाठी गेले होते. त्यांच्या थक्क करणाऱ्या कसरती पाहून हिटलरसुद्धा अचंबित झाला होता. त्याने या खेळाडूंची प्रशंसा केली होती. अशा प्रकारे क्रिकेटखेरीज अन्य दुसऱ्या खेळातही भारताला शिखर गाठायचे असेल तर खासगी क्षेत्राला त्यात संपूर्ण क्षमतेने सहकार्य द्यावे लागेल. त्यासाठी आवश्यक करसवलती दिल्या गेल्या, तर खासगी क्षेत्र नक्कीच पुढाकार घेईल. एखाद्या मुलात कोणत्या खेळाला अनुकूल क्षमता आहे हे लहानपणीच समजेल अशी व्यवस्था प्रत्येक शाळेत केली गेली तर त्या मुलांच्या योग्यतेला अनुरूप प्रशिक्षण दिले जाईल. खेळाच्या संघटनांशी कित्येक राजकीय नेत्यांचा संबंध आहे आणि त्यांनी त्या संघटना मजबूत केल्या आहेत; परंतु त्यातल्या काही नेत्यांनी त्या संघटनांना आपली जहागिरी करून टाकली आहे. जो पात्र खेळाडू असेल त्याच्या बाबतीत कुठलेही राजकारण होता कामा नये. साधनसुविधा पुरेशा असल्या पाहिजेत. कोणत्याही पी. टी. उषाला बूट नसताना धावण्याची वेळ येऊ नये. कुठल्या मेरी कोमला आर्थिक अडचण नसावी आणि कोण्या अंजली भागवतला नेमबाजीत भाग घेण्यासाठी धडपड करावी न लागावी. आज आपण मोहम्मद शमीचे गुणगान करतो आहोत. केलेही पाहिजे; परंतु हेही लक्षात ठेवले पाहिजे की, भविष्यात कुठल्याही शमीला प्रशिक्षणासाठी या शहरातून त्या शहरात जावे लागू नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की मुलांना खेळासाठी मैदाने उपलब्ध असली पाहिजेत. शाळा उघडण्याची परवानगी देतानाच हे पाहावे लागेल की शाळेकडे खेळासाठी मैदान आहे की नाही. मैदानांवर कब्जा करणे मोठा गुन्हा घोषित करावा लागेल. आई-वडिलांनीही हे पाहिले पाहिजे की मुले मैदानावर खेळायला जातील. मुलांना अभ्यासामध्ये इतके दडपून टाकले गेले आहे की खेळाच्या प्रशिक्षणाकडे हल्ली कोणाचे लक्षच नसते. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तरच ही परिस्थिती सुधारू शकते.
(लेखक लोकमत समूह आणि एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)
vijaydarda@lokmat.com