भारतीय गायींचेच दूध गुणकारी

By admin | Published: May 23, 2017 07:26 AM2017-05-23T07:26:11+5:302017-05-23T07:26:31+5:30

सध्या सोशल मीडियामध्ये देशी गाई , संकरित गायी व विदेशी गायींवरती खूप चर्चा चालू आहे

Indian cows have high quality milk | भारतीय गायींचेच दूध गुणकारी

भारतीय गायींचेच दूध गुणकारी

Next
>सध्या सोशल मीडियामध्ये देशी गाई , संकरित गायी व विदेशी गायींवरती खूप चर्चा चालू आहे. ए-१ दूध आरोग्यास घातक असल्याचे आढळून आल्याने आपण पितो ते दूध कोणते? हाही प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. 
भारतामध्ये सुमारे ३७ प्रकारच्या विविध गायींच्या जाती आहेत. उपलब्ध चारा पाणी व विविध वातावरणामध्ये वर्षानुवर्षे सदर जाती स्थिरावल्या आहेत. गायींचे वर्र्गीकरण त्यांच्या उपयुक्तेनुसार केल्यास काही गायी दुधासाठी (उदा. साहिवाल, रेड सिंधी, गीर, राठी) प्रसिध्द आहेत. देवणी, गवळाऊ, लाल कंधारी या गायी दूध व शेतीकामासाठी, तर खिल्लार,हल्लीकार, डांगी, कृष्णापेली इत्यादी गायी फक्त शेतीसाठी प्रसिध्द आहेत. 
आपल्या संस्कृतीमध्ये देशी गाईला मातेचे स्थान आहे. पूर्र्वी घरासमोर किती गायी आहेत यावरून श्रीमंती समजली जात होती. आपण दुग्ध उत्पादनात जगात आघाडीवर आहोत. परंतु प्रती जनावर उत्पादन अत्यंत कमी आहे. दुधाची वाढती मागणी लक्षात घेता १९७० च्या नंतर भारतामध्ये संकरित गायींची पैदास मोठ्या प्रमाणात केली गेली. त्याचबरोबर आपण आपल्या देशात दुधासाठी प्रसिध्द असलेल्या सहिवाल, गीर, रेड सिंधी इत्यादी गायींच्या जातीकडे दुर्लक्ष झाले. झपाट्याने देशी गायींची संख्या कमी झाली व संकरित गायींची संख्या वाढण्यास चालना मिळाली. ज्या वेळेस आपण गायीचे संकरिकरण करत होतो, त्यावेळेस ब्राझील व इतर देशांनी भारतीय गायी आयात करुन गीर , सहिवाल, ओंंगल इत्यादी जातीवर संशोधन करुन दूध व मांस उत्पादनासाठी विविध जाती तयार केल्या. तसेच ब्राझील देशाने गीर गायीमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी उल्लेखनीय काम केले. भारतीय गायींमध्ये दूध देण्याची क्षमता किती आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिले. 
देशी व विदेशी गायींमधील मुख्य फरक म्हणजे भारतीय गायीला वशिंड असते. तर विदेशी गायींना वशिंड नसते (वशिंड म्हणजे मानेच्या वर असणारा उंचवटा). भारतीय गायीचे दूध ए-२ प्रोलिन प्रथिनयुक्त असते. प्रोलिन हे प्रथिन आरोग्यास चांगले असते. तर विदेशी गायीचे दूध ए १ हिस्टीडीन प्रथिनयुक्त असते. हिस्टिडिन या प्रथिनामुळे डायबेटिस, कॅन्सर किंवा लहान मुलांत वजन वाढण्याचे आजार होतात, असे विदेशातील काही संशोधनात आढळले आहे. विदेशात ए-१ व ए-२ दुधावरती अभ्यास केला गेला आहे. न्युझिलंडमध्ये झालेल्या अभ्यासात ए-१ दुधात असलेल्या प्रोटीनमुळे अनेक रोग होतात, असे आढळून आले आहे. ‘डेविल इन द मिल्क’ या पुस्तकातही ए १ दूध आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. भारतात देशी व विदेशी गाईचे संशोधन करण्यात आले. त्यामध्ये जर्र्सी एचएफ गायीच्या दुधामध्ये ए १ हिस्टीडीन प्रथिन आढळले तर भारतीय देशी गाईमध्ये प्रोलिन प्रथिन आढळले आहे. परंतु भारतामधील काही जर्सी व एच एफ गायींमध्येसुध्दा काही प्रमाणात ए २ प्रोटीन आढळले आहे. तसेच भारतामध्ये ए १ दुधामुळे कोणते रोग होतात़, याबाबत अद्याप तसा निष्कर्ष निघालेला नाही. देशी गायीमध्ये ९८ ते ९९ टक्के ए-२ प्रकारचे प्रोटिन आढळते. जर्सी गायीमध्ये ए-२ प्रोटिन ४ ते ५ टक्केच आढाळते.
बाहेरच्या देशात ए-२ दूध ब्रॅण्ड म्हणून विकले जात आहे. आपल्याकडे तेवढी जागरुकता अद्याप आलेली नाही. 
भारतातील कोणत्याही जातीच्या गायी वातावरणातील बदलात चांगल्या प्रकारे तग धरत आहेत. तसे संकरित गायीमध्ये आढळून येत नाही. देशी गायींपासून मिळणाऱ्या गोमूत्र, शेण यापासून गोअर्क, गोवऱ्या, शेतीसाठी जिवामृत, सेंद्रिय खत, गांडूळ खत इत्यादी विविध पदार्थ तयार करुन जमिनीचे आरोग्य सुधारणा करण्याचे कार्यक्रम सुरु आहेत. ज्याप्रमाणे देशी गायींचे ए २ दूध विविध गुणांसाठी प्रसिध्द आहे, त्याचप्रमाणे गायी म्हणजे फक्त दूध न पाहता त्यापासून मिळणारे विविध उपपदार्थ याचा वापर आपल्या आरोग्यासाठी व जमिनीच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. हे शेतकरी बांधवाना जाणवू लागले आहे. त्यामुळे देशीपासून मिळणारे उत्पादन हे एकप्रकारचे अमृत आहे. देशी गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर अनेक शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी होतो. त्यामुळे दिवसेंदिवस त्याचे महत्व वाढत आहे. सरकारही त्यासाठी प्रयत्न करत आहे. शहरांमध्ये देशी गायीचे दूध ८० ते १०० रुपये लीटरप्रमाणे व तूप अडीच ते तीन हजार रुपये किलोप्रमाणे विकले जाऊ लागले आहे. बदलत्या वातावरणामध्ये फक्त देशी गायीच तग धरु शकतात. त्यांना चारा कमी लागलो. औषधे व आरोग्यासाठी कमी खर्च येतो. त्यामुळे एकंदरीत विचार करता भारतीय शेतकरी पुन्हा देशी गायींकडे वळू लागला आहे. तसेच ए २ दुधाचे आरोग्याच्या दृष्टीने लोकांना महत्व पटू लागले आहे. ए-२ दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. ती मागणी पुरविण्यासाठी देशी गायींचे संवर्धन ही काळाची गरज आहे. सध्या भारतामध्ये असलेल्या देशी गायींपैकी फक्त ३० टक्के गायी शुध्द जातीच्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे विविध भागामध्ये असलेल्या देशी गायींचे संवर्धन होणे खूप महत्वाचे आहे. 
- प्रा.सोमनाथ माने, सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे

Web Title: Indian cows have high quality milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.