भारतीय राष्ट्रवाद हाच एकमेव मार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 05:21 AM2020-02-26T05:21:37+5:302020-02-26T05:24:23+5:30

आपला देश महासत्ता तर होईलच; पण तो लोकशाही संविधानाच्या मार्गाने! स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मार्गाने! मात्र त्यासाठी आपल्याला झगडावे लागणार आहे.

Indian nationalism is the only way | भारतीय राष्ट्रवाद हाच एकमेव मार्ग!

भारतीय राष्ट्रवाद हाच एकमेव मार्ग!

googlenewsNext

- डॉ. रविनंद होवाळ, प्रवर्तक, शोषणमुक्त भारत अभियान

मागील काही दिवसांत राम मंदिराच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल व त्यानंतर राम मंदिर उभारणीस आलेली गती, पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल व त्यामुळे वंचित बहुजनांमध्ये पसरलेली अस्वस्थता यांसारख्या गोष्टींमुळे आपल्याकडील सामाजिक वातावरण घुसळून निघालेले आहे. अशातच नॅशनॅलिझम अर्थात राष्ट्रवाद शब्द नाझीवादातून आलेला असल्यामुळे त्याचा वापर टाळा, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रांची, बिहार येथून केल्याचे प्रसिद्ध झालेले आहे. मूलतत्ववादी विचारांमुळे देशात सध्या असंतोषाचे वातावरण आहे. आमची संघटना स्वत:च्या फायद्यासाठी नाही, तर जागतिक पातळीवर भारत अग्रणी व्हावा, यासाठी झटत आहे. भारताला महाशक्ती बनलेच पाहिजे, अशा आशयाची मतेही त्यांनी व्यक्त केलेली आहेत. या पार्श्वभूमीवर भारत अग्रणी व्हावा आणि भारताने महासत्ता बनावे याबाबत देशात दुमत नसले, तरी इतर काही मुद्द्यांबाबत मात्र मतमतांतरे होणे अत्यंत साहजिक आहे.

ज्या हिंदुत्ववादाचामोहन भागवत व त्यांचे सहकारी मागील अनेक वर्षांपासून आक्रमकपणे पुरस्कार करत आहेत, तो वाद भारतातील असंतोषाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेला आहे. मूलतत्त्ववादी विचारांमुळे देशात सध्या असंतोषाचे वातावरण आहे हे भागवतांचे म्हणणे खरे तर आहेच; पण जितके ते खरे आहे, तितकेच ते आश्चर्यजनक आहे व सुखदही आहे! ते सुखद यासाठी आहे, की त्यांचा मूलतत्त्ववादाला विरोध आहे, असा अर्थ त्यातून ध्वनित होत आहे. साहजिकच विरोधकांनी जोपासलेल्या मूलतत्त्ववादाबरोबरच स्वपक्षीयांनी जोपासलेल्या मूलतत्त्ववादालाही त्यांचा विरोध असेल, असे मानायला इथे जागा आहे असे वाटते.



या देशातून मूलतत्त्ववाद नाहीसा झाला, तर देशातील असंतोष कमी होईल यात मुळीच शंका नाही; मात्र मूलतत्त्ववादाबरोबरच देशातली वाढलेली किंवा हाताबाहेर गेलेली बेरोजगारी, आर्थिक विषमता, जातीय व धार्मिक वर्चस्ववाद, हम करे सो कायदा ही प्रवृत्ती यांसारख्या गोष्टी नाहीशा झाल्या, तर देशातील असंतोष अधिक मोठ्या प्रमाणात नष्ट होण्याची शक्यता आहे.

देशातील काही प्रश्न असे आहेत, की ज्यामुळे एका समूहात संतोष, तर दुसऱ्या समूहात असंतोष आहे. अशा प्रश्नांचा निकाल यापुढील काळात आपण कसा लावतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे. ६ डिसेंबर रोजी म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी बाबरी मशीद पाडली जाणे, २६ नोव्हेंबर म्हणजे संविधानदिनी मुंबईवर हल्ला होणे यांतून देशात दूरपर्यंत एक संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या संशयाचे निराकरण कोण आणि कसे करणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी प्रमुख मुद्दा बनवलेल्या अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा अनेक हिंदूंना मोठा आनंद आज झालेला असला, तरी ज्यांची मशीद पाडली गेली, तो मुस्लीम समाज व विद्यादानरूपी धर्मद्रोहाचा आरोप ठेवून ज्याची हत्या रामायणातील रामाकरवी केली गेली, त्या ब्राह्मणेतर शंबुकाचा समर्थक बहुजन समाज यांच्यातील असंतोषाचे आपण काय करणार, हाही प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.



हिंदुत्वामुळेच देशातील लोक एकमेकांशी जोडलेले राहतील, असे भागवत यांना वाटते. मात्र, अनेक लोकांचे याबाबतचे आकलन फार मोठ्या प्रमाणात वेगळे आहे. हिंदुत्वातील जातीय गुणामुळे देशात आजवर मोठ्या प्रमाणात लोकविग्रह झालेला आहे. या विचारसरणीने मूठभर लोकांना वर्चस्व आणि सोयीसवलती प्रदान करून उर्वरित बहुसंख्य भारतीय समाजाला केवळ जन्माच्या आधारे दुय्यम ठरवलेले आहे. भारतीय संविधानातील आरक्षण, कायद्यापुढे समानता, कायद्याचे समान संरक्षण इ. गोष्टींमुळे त्या जखमेवर थोडीफार खपली चढली होती; मात्र आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचारातून ती खपली पुन्हा एकदा ओरबाडली गेलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातही देशात जेव्हा सामाजिक व धार्मिक अत्याचारांचा कहर झालेला होता, तेव्हा स्वातंत्र्य म्हटले की पूर्व काळात सोसलेला अवमान, शोषण आणि छळ आठवून आमच्या अंगावर काटा येतो, अशा आशयाचे विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. आज त्याच गोष्टींची आठवण होऊन हिंदुत्व म्हटले की करोडो भारतीयांच्या अंगावर जणू काटा येत आहे. हा काटा धर्मद्वेषातून आलेला नसून, हिंदुत्वाने केलेल्या अवमानांच्या व उपेक्षेच्या स्मृतींतून तो येत आहे हे हिंदुत्ववाद्यांनी लक्षात घेतले पाहिजे. जोवर ते हे लक्षात घेत नाहीत, तोवर भारतीय राष्ट्राची ताकद एकवटू शकत नाही व भारत हा महासत्ता बनूही शकत नाही. हिंदुत्वाची ही भयकारक बाजू लक्षात न घेता भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदुत्वाचे घोडे आजवर पुढे दामटले आहे. हे काम त्यांना देशहिताचे वाटत असले, तरी इतर असंख्य लोकांना तो देशद्रोह वाटत आहे, हे त्यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही.



भारतीय राष्ट्रवाद जोपासताना आपल्याला काही पथ्ये जरूर पाळावी लागणार आहेत. आपल्या संविधानाने धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान इ. कारणांमुळे कोणाबाबतही कोणताही भेदभाव न करण्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे. आपला देश महासत्ता तर होईलच; पण तो लोकशाही संविधानाच्या मार्गाने! स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मार्गाने! मात्र त्यासाठी आपल्याला झगडावे लागणार आहे.

Web Title: Indian nationalism is the only way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.