अमेरिकन कौतुकामागचे भारतीय वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 03:30 AM2021-01-20T03:30:10+5:302021-01-20T07:12:01+5:30

आज अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेणारे ज्यो बायडेन यांच्या टीममध्ये वीस अमेरिकन भारतीय आहेत! त्यांचे कौतुक करताना ‘वास्तव’ही पाहिले पाहिजे!

The Indian reality of American admiration | अमेरिकन कौतुकामागचे भारतीय वास्तव

अमेरिकन कौतुकामागचे भारतीय वास्तव

googlenewsNext

रोहन चौधरी, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक -

अमेरिकन निवडणुकीचे सामान्य भारतीयांना सर्वांत जास्त कुतूहल असते ते म्हणजे  तिथल्या राजकीय प्रक्रियेत असलेल्या स्थानिक भारतीयांच्या सहभागाविषयी. अमेरिकन निवडणुकीतच नव्हेतर, अमेरिकन समाजातही भारतीय समुदाय निर्णायक नसला तरी प्रभावशाली आहे. त्याचे प्रतिबिंब अमेरिकन उद्योगजगतात, शिक्षण क्षेत्रात आणि राजकीय प्रक्रियेत दिसून येते. उदाहरणार्थ अमेरिकेच्या ‘ॲपल’ या कंपनीत प्रत्येकी चार इंजिनीअरपैकी एक भारतीय आहे. उपराष्ट्रपतिपदी  म्हणून आज पदग्रहण करणाऱ्या कमला हॅरिस या  भारतीय वंशाच्या आहेत. आज- २० जानेवारीला बायडेन आणि कमला हॅरिस जेव्हा अमेरिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेतील तेव्हा त्यांच्या दिमतीला वीस अमेरिकन भारतीय असतील. यामध्ये नीरा तंडेन, विवेक मूर्ती, रोहिणी कोसोग्लू, अली झैदी, भारत राममूर्ती, वेदान्त पटेल, विनय रेड्डी आणि गौतम राघवन यांच्यासारखे दिग्गज त्यांचे सहकारी म्हणून काम करतील. यावरून अमेरिकेतील भारतीयांच्या यशाचा आलेख आणि अमेरिकन समाजातील योगदान समजून येते. भारतीय वंशाच्या या डोळे दीपवून टाकणाऱ्या यशामागे अपयशाचा, उदासीनतेचा आणि द्वेषाचा एक चेहरा आहे. त्याची दखल घेणे गरजेचे आहे. 

१९०१ साली दादाभाई नौरोजी यांनी आपल्या ‘भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी’ या पुस्तकात आर्थिक निःसारणाचा सिद्धान्त मांडला होता. भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहत होता आणि त्यामुळे भारतात गरिबी कशी वाढत होती याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. दादाभाई नौरोजींच्या या सिद्धान्ताची आठवण होण्याचे कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या सिद्धान्तात भारतीय संपत्ती ब्रिटनमध्ये जात असल्याविषयी शंका व्यक्त केली होती, २१व्या शतकात संपत्तीची जागा मनुष्यबळाने घेतली आहे आणि ब्रिटनची जागा अमेरिकेने. जागतिक राजकारणात सत्तेचे परिमाण बदलत चाललेले आहे. एकेकाळी लष्करी बळ म्हणजे सर्वोच्च असणाऱ्या जागतिक राजकारणात ‘मनुष्यबळ’ ही सर्वांत महत्त्वाची ताकद बनली आहे. जो देश या मनुष्यबळाला संधी देईल, त्यांच्या कौशल्याचा देशाच्या बांधणीसाठी उपयोग करेल तोच देश जागतिक राजकारणात अधिपत्य गाजवेल इतके महत्त्व मनुष्यबळाला प्राप्त झाले आहे. चीनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये दोष असले तरीही त्यांनी त्यांच्या मनुष्यबळाला मोठ्या प्रमाणात संधी दिली.  त्याचेच यश म्हणून चीनला इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य होते. अमेरिकादेखील या बाबतीत आदर्श असून जगभरच्या प्रतिभेला अमेरिकन समाजाने आकर्षित केले आहे. जागतिक राजकारणात या दोन बड्या राष्ट्रांच्यात जो संघर्ष चालू आहे तो या मनुष्यबळाच्या ताकदीवर. 

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे. २०५० पर्यंत तो कदाचित अव्वल स्थानावर पोहोचेल. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या जगात चलन आणि मनुष्य यांचा मुक्त वावर अपेक्षित असला तरी तो कोठून कोठे होतो आणि का होतो याची पडताळणी करणे आवश्यक असते. गेल्या शतकातील कल पाहता तो आशियाकडून पाश्चिमात्य देशांकडे, भारताकडून अमेरिकेकडे होत आला आहे. 

भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लोकशाहीप्रधान असूनदेखील स्थलांतराचा कल हा अमेरिकेकडे का झुकलेला आहे, या प्रश्नाचे उत्तर आर्थिक विषमता, राजकीय उदासीनता आणि सामाजिक संघर्षात आहे. भारतातील राजकीय व्यवस्था ही लोकशाहीप्रधान असली तरी समाजमन मात्र कप्पेबंद आहे. ओबामांच्या रूपाने कृष्णवर्णीय व्यक्ती आठ वर्षे अमेरिकेची धुरा सांभाळते, भारतात हे घडणे तसे कठीणच!  गेल्या दहा वर्षांतले राजकीय नेतृत्व हे एकतर घराणेशाहीतून पुढे आले आहे अथवा जातीय अस्मितेतून. सामान्य माणसाला ना राजकारणात जागा आहे ना अर्थकारणात. उत्तर प्रदेश किंवा बिहार येथील स्थलांतरितांवर होणारे हल्ले  हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील भीषण वास्तव आहे. त्यामुळे इथल्या मध्यमवर्गीय युवकाला भारतापेक्षा अमेरिका जवळची वाटते. भारतीय उद्योगजगतदेखील याला अपवाद नाही.

या जगतासमोर मक्तेदारीचे प्रमुख आव्हान आहे. मूठभर उद्योगसमूहांकडे  भांडवलाचे केंद्रीकरण झाले आहे. स्टार्ट अपसारख्या योजना प्रशासनाच्या कागदावर आणि युवक आणि युवतींच्या मनातच अडकून पडल्या आहेत. तिकडे अमेरिकेमध्ये मात्र फेसबुक, अमेझॉन, ॲपल, गूगल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्या असोत किंवा मार्क झुकेरबर्ग, जेफ बेझोस, अथवा स्टीव्ह जॉब्ज यांसारखे उद्योजक; त्यांची निर्मिती ही राष्ट्रीय पातळीवरील स्वदेशी, आत्मनिर्भरतेची भाषा ही स्थानिक पातळीवर जातीयतेची भाषा बनते. भारतीय उच्चवर्गीयांत असणारा हा जातीयतेचा पगडा हेच  देशबांधणीसमोरचे प्रमुख आव्हान आहे. अमेरिकेसारख्या देशात वास्तव्य केल्यानंतर तरी उच्चवर्णीयांची ही मानसिकता बदलेल अशी अपेक्षा होती. परंतु सिस्को या अमेरिकन कंपनीत अल्पसमुदायातील सहकाऱ्याला उच्चवर्णीय सहकाऱ्यांकडून पगार आणि बढती निव्वळ अल्पसमुदायातील असल्यामुळे नाकारण्यात आली हे भारतातील भीषण सामाजिक वास्तव अमेरिकेतदेखील दिसून आले. भारतात जागतिकीकरणाचा लाभ ज्या शहराला सर्वाधिक झाला त्या पुणे शहराच्या महापौर जेव्हा ब्राह्मणांना आरक्षणामुळे परदेशात जावे लागते, असे विधान करतात तेव्हा वास्तविक त्या भारतातील उच्चवर्णीयांची संकुचित जातीयता दाखवून देत असतात.

इथल्या राजकीय व्यवस्थेवर संताप व्यक्त करणारा भारतीय अमेरिकेत स्थलांतरित झाला. भारत-अमेरिका संबंध सुधारण्यात या समुदायाने निर्णायक भूमिका बजावली. परंतु त्याच्या सामाजिक मानसिकतेचा विकास झाला नाही हे खेदाने नमूद करावे लागेल. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात मोतीलाल नेहरू, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी लोकांनीदेखील परदेशात बहुतांश काळ व्यतीत केला होता. पाश्चिमात्य संस्कृतीचा भारतीय संस्कृतीवर होणाऱ्या परिणामांची चिकित्सा केली होती. त्यातील काही गोष्टी भारतीयांच्या मनात रुजवल्या. अशा प्रकारचे प्रयत्न प्रभावशाली अमेरिकन भारतीयांंकडून झाले नाहीत. अमेरिकेतील भारतीयांचा कौतुकसोहळा पार पडताना हे विदारक वास्तव नजरेआड करून चालणार नाही.
rohanvyankatesh@gmail.com

Web Title: The Indian reality of American admiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.