भारतीय दर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 04:07 AM2017-05-18T04:07:10+5:302017-05-18T04:07:10+5:30
प्राचीन काळापासून भारतात दार्शनिक विचारांची परंपरा अखंडपणे वाहत आलेली असून, वेगवेगळ्या कालखंडात अनेक नवनवीन विचारांचे प्रवाह येऊन
- डॉ. रामचंद्र देखणे
प्राचीन काळापासून भारतात दार्शनिक विचारांची परंपरा अखंडपणे वाहत आलेली असून, वेगवेगळ्या कालखंडात अनेक नवनवीन विचारांचे प्रवाह येऊन मिळाले आणि दर्शने उदयास आली. भारतीय तत्त्वज्ञानातील षड्दर्शने ही संकल्पना आपण नेहमीच वापरतो. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग्य, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही सहा दर्शने प्रसिद्ध आहेत. यांनाच (षड्दर्शने किंवा सहा शास्त्रे) असे म्हणतात.
याशिवाय भारतीय तत्त्वज्ञानाने चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शनही तितक्याच आदराने स्वीकारले आहे. भारतीय तत्त्वज्ञानात वेद आणि उपनिषदे यांचा वाटा फार मोठा आहे. तत्त्वज्ञानाचे विविध मतप्रवाह आपापल्या विचारांचा मागोवा घेत अवतरले आणि विविध मतप्रणालीतून हे तत्त्वज्ञान अधिक विकसित झाले. काही तत्त्वे ही मूलस्वरूपी व सर्वांनी मान्य केलेली असली तरी त्यात विविधता व समृद्धी पहायला मिळते.
जीवनाची विशालता, व्यापकता, खोली, संकीर्णता व अमेयता त्यामुळे लक्षात येते व जीवनसंज्ञा किती अमर्याद आणि अनंत आहे याची जाणीव होते. अशा या असीम, अनंत, विविधांगी व संकीर्ण अस्तित्वाचा बुद्धिवादी व सुसंगत रितीने अर्थ लावण्याचे जे अनेक प्रयत्न झाले तेच तत्त्वज्ञानाचे विविध दृष्टिकोन किंवा प्रणाली यांनाच दर्शने असे म्हटले गेले.
ज्याच्या योगाने यथार्थतत्त्व पाहिले आणि जाणले जाते ते शास्त्र म्हणजे दर्शन होय. दर्शन हे शास्त्र आहे. आणि दर्शन ही अनुभूती आहे. मानवी जीवनात लौकिक आणि पारलौकिक तत्त्वांची अनुभूती येते आणि त्यातून यथार्थ ज्ञान होते. त्या अर्थाने ‘तत्त्वज्ञानसाधनं शास्त्रम्’ तत्त्वाचे ज्ञान होण्याला साधक असे शास्त्र म्हणजे दर्शन होय.
सर्व दर्शने ही आत्मज्ञानासाठीच प्रवृत्त झालेली आहेत. ‘आत्मानं विद्धी’ म्हणजे आत्म्याला जाणणे हेच दर्शनाचे खरे प्रयोजन आहे. आत्म्याचे ज्ञान व्हायला हवे असेल तर सर्व अनात्म पदार्थापासून आत्म्याला वेगळे करणे आवश्यक ठरते. त्यालाच आत्मानात्वविवेक असे म्हणतात. भारतीय दर्शनांनी बुद्धिवादाचा अवलंब करून हा आत्मानात्मविवेक देणारी दृष्टी दिली.
विश्व, परमात्मा, लोकजीवन या सर्वांकडे पाहण्याची दृष्टी देणारे शास्त्र दर्शनांनी उभे राहिले. युक्ती, तर्क आणि ज्ञानी पुरुषांची अपरोक्ष अनुभूती यांच्या आधारावर सर्व दर्शनांची उभारणी झालेली आहे.
उपनिषदे आणि त्यातील सिद्धांताची चिंतने विविधांगाने होऊ लागली आणि त्यातूनच दर्शनांची सूत्रे निर्माण झाली आणि ही सूत्रे त्या त्या दर्शनांचे मूळ रूप मांडू लागली. ही सारी दर्शने कोणत्यातरी अज्ञेयाला उभे करून विवेचन करत नाहीत तर ज्ञेयाला जीवनसृष्टीत आणून मानवी जीवनाला आनंदाचा मार्ग दाखविण्यासाठी दर्शने सिद्ध झाली. आणि अध्यात्मशास्त्र सूत्रात मांडले गेले.