चिनी ड्रॅगनच्या ‘व्यापारी’ विळख्यात भारताची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 09:04 AM2021-12-28T09:04:50+5:302021-12-28T09:05:25+5:30

२०२१ मध्ये नोव्हेंबरपर्यंत भारताची चीनला निर्यात दोन लाख कोटी रुपयांची,  पण चीनकडून आयात मात्र तब्बल सहा लाख ६० हजार कोटी रुपयांची!

India's dilemma over Chinese dragon's 'merchant' | चिनी ड्रॅगनच्या ‘व्यापारी’ विळख्यात भारताची कोंडी

चिनी ड्रॅगनच्या ‘व्यापारी’ विळख्यात भारताची कोंडी

Next

- राही भिडे
(ज्येष्ठ पत्रकार)

चीननेभारताच्या हद्दीत डोकलाम, लडाख आणि अरुणाचल प्रदेशात केलेल्या कुरघोड्यांमुळे तणाव आहे. दोन्ही देशांत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही तोडगा दृष्टिपथात नाही, तरीही दोन्ही देशांतील व्यापारांत मात्र वाढ झाली आहे.  भारतचीनमधील द्वीपक्षीय व्यापार विक्रमी शंभर अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. २०१९-२०चा विचार करता या शंभर  अब्ज डॉलर्सपैकी भारताने चीनकडून तब्बल ६५.२ अब्ज डॉलर्सची आयात केली आहे, तर या काळातील भारताची चीनला निर्यात ही केवळ १६.६ अब्ज डॉलर्स आहे.  
या दोन देशांमधील व्यापार हा चीनच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झुकला असून, भारत आता चीनची व्यापारी वसाहत बनतोय की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

गेल्या वर्षी भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील सीमेवर मोठ्या प्रमाणात तणाव वाढला. त्यावर भारतीयांनी चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली. याला केंद्र सरकारकडून अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचेही सांगण्यात येत होते. 
गणपती, दिवाळी आणि इतर सणांच्या काळातही चिनी वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन अनेक संघटनांच्या वतीने करण्यात आले होते. किरकोळ व्यापाऱ्यांची देशव्यापी संघटना त्यात पुढाकार घेत होती; पण सध्याची आकडेवारी पाहता याचा काही फायदा झाला आहे, असे वाटत नाही. सीमेवर तणाव असतानाही दोन्ही देशांतील व्यापार या वर्षीच्या पहिल्या ११ महिन्यांत ४६ टक्क्यांनी वाढला. 

भारतातून चीनमध्ये साधारण दोन लाख कोटी रुपयांची निर्यात झाली, तर भारताने चीनकडून तब्बल सहा लाख ६० हजार कोटी रुपयांची आयात केली आहे. गेल्या सहा वर्षांतील चीनकडून करण्यात आलेली आयात प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि ती वाढतेच आहे.  २०१४-१५ मध्ये भारताने चीनला ११.९ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती, तर त्याच वर्षी भारताने चीनकडून ६०.४ अब्ज डॉलर्सची आयात केली होती. ही आयात चीनला केलेल्या निर्यातीपेक्षा तब्बल पाचपटीने जास्त होती.  
२०१९-२० या वर्षात भारताने चीनला १६.६ अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे. त्याच वर्षी भारताने चीनकडून ६५.३ अब्ज डॉलर्सची आयात केली आहे. या व्यापारात फारच विरोधाभास आहे.

जगात भारत आणि चीन यांच्यातील स्पर्धा आणि तणावाची माहिती असताना आणि चीन कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नसताना भारत आणि चीनमधील व्यापार मात्र वाढत आहे. गलवान खोऱ्यांत दोन्ही देशांत झालेल्या चकमकीत दोन्ही देशांच्या सैनिकांचा बळी गेला. तणावही खूप वाढला. या भागातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांत दीड डझनाहून अधिक बैठका झाल्या; अनेक प्रयत्न झाले, परंतु त्याची फलनिष्पत्ती अजून तरी समजलेली नाही. 

अरुणाचल प्रदेशात भारताच्या हद्दीत चीनने एक गाव वसविल्याचे उघड झाले. त्यानंतर डोकलाम खोऱ्यात घुसखोरी करून भारताला शह देण्यासाठी चीनने भूतानशी करार केला. चीनचा नवा सीमा सुरक्षा कायदा भारताच्या संरक्षण व्यवस्थेसाठी अडचणीचा ठरणारा आहे. भारत क्वाड परिषदेत सहभागी झाल्याने ड्रॅगनने मध्यंतरी थयथयाट केला. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील व्यापार-उदीम कमी व्हायला हवा होता. त्यातच कोरोना, तसेच चीनमधील आर्थिक परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्यामुळे व्यापारावर परिणाम व्हायला हवा होता; परंतु प्रत्यक्षात तसे झालेले नाही.

दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांत तणाव असल्याने आणि त्यांच्यातून विस्तवही जात नसल्याचे दिसत असताना त्यांच्यातील व्यापार मात्र वाढतो आहे. अर्थातच हा व्यापार चीनच्या बाजूने जास्त झुकलेला आहे.
व्यापारांतील आकडे स्पष्ट करतात, की भारत कमी मूल्याच्या कच्च्या मालाची निर्यात करतो, तर जास्त किंमतीच्या, महाग अशा उत्पादित तयार मालाची मोठ्या प्रमाणावर आयात करतो. दरवर्षी चीनबरोबरच्या व्यापारात भारत खोटच खातो आहे.
पूर्व लडाखमधील लष्करी संघर्षापासून, दोन्ही देशांमधील संबंध अतिशय नाजूक टप्प्यातून जात आहेत. असे असताना दोन्ही देशातील व्यापार वाढीवर संरक्षण विश्लेषक ब्रह्मा चेलानी यांनी  प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनकडून सीमा रेषेच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार २०२१ मध्ये चीनसोबतच्या व्यापारात ५० टक्के वाढ कशी करते, असा त्यांचा सवाल आहे. 

भारत आणि चीनमधल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी आपापल्या भागात सैनिक आणि अवजड शस्त्रास्त्रेही तैनात केली. गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूला ५०-५० हजारांहून अधिक सैनिक तैनात आहेत. ही संख्या १९६२ च्या युद्धानंतरची सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील विक्रमी व्यापाराचा हा आकडा जगाला चकित करणारा आहे. भारतासोबतच्या व्यापाराने सरते वर्ष चीनसाठी भलतेच लाभदायक ठरले आहे, असे दिसते.

Web Title: India's dilemma over Chinese dragon's 'merchant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.