कोरोनाकाळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला, मोदींचा ‘विकास’ गडगडला!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 02:17 AM2020-09-02T02:17:08+5:302020-09-02T06:40:42+5:30
कोरोना काळात देशातील अर्थव्यवस्था रसातळाला गेली. हा तळ इतका खोलात गेला की तळात कितीही वाकून बघितले तर अंधाराशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. इतकी भयावह स्थिती या देशाची झाली आहे.
-विकास झाडे
(संपादक, लोकमत दिल्ली)
खिलौना, जानकर तुम तो, मेरा दिल तोड़ जाते हो... मुझे इस, हाल में किसके सहारे छोड़ जाते हो.... तब्बल ५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘खिलौना’ चित्रपटातील गाण्याच्या या ओळी आठवायला कारणही तसे खास आहे. ३० आॅगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ केली. गेल्या सहा वर्षात त्यांना आकाशवाणीवर हा कार्यक्रम करण्याचा छंद जडला आहे. सुरुवातीला ठीक होते. लोकही कान टवकारून ऐकायचे. त्यांच्या मनात नवीन काय आहे, हे लोकही जाणून घ्यायचे. उपदेशासाठी दर महिन्याचा एक रविवार ठरलेला आहे. परंतु कृतीशून्यता कधीतरी धोबीपछाड देतेच, मोदींच्या बाबतही असेच झाले आहे.
कोरोना काळात देशातील अर्थव्यवस्था रसातळाला गेली. हा तळ इतका खोलात गेला की तळात कितीही वाकून बघितले तर अंधाराशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. इतकी भयावह स्थिती या देशाची झाली आहे. आता लोकांच्याही सहनशीलतेचा अंत झाला आहे. अशा प्रसंगी कोणत्याही सुजाण नागरिकास मोदींच्या ‘मन की बात’ नको तर ‘काम की बात’ हवी आहे. याचा राग आवळायचा तरी कसा!. मोदींच्या विरोधात काही बोलले तर थेट ‘राष्टÑद्रोही’ म्हणून किताब द्यायला गल्लीबोळात भक्त बसले आहेत. ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असा हा प्रकार आहे. परंतु असे खूप काळ चालत नाही. कामाचा बागुलबुवा उभा करणाऱ्यांच्या आत केवळ पोकळपणा असल्याची जाणीव लोकांना होते तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखविली जातेच.
रविवारी ‘मन की बात’मध्ये तसेच काहीसे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बराच वेळ खेळण्यांशीच खेळत होते. खेळणी पूर्ण असावी की अपूर्ण इथपासून देशाची खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था खेळण्यातील खुळखुळा वाजविला तर कशी खळखळून भरभराटीस येईल याचे ते ज्ञान देऊन गेलेत. देश कोरोनाने ग्रासला आहे. लाखो लोक पीडित आहेत. हजारो लोकांनी आपला जीव गमावला. कोट्यवधी लोकांच्या नोकºया गेल्यात. लोकांवर उपाशी राहायची वेळ आली आहे. अनेकांनी आत्महत्या केल्यात. सहा महिन्यात होत्याचे नव्हते झाले. मोदींनी सांगितल्यानुसार सुरुवातीला लोकांनी प्रामाणिकपणे टाळ्या, थाळ्या वाजवल्या. घरातील दिवे बंद करून बाहेर उजेड पाडायला सांगितला. मोदी किती योगी पुरुष म्हणून भक्तांनी त्या तारखांची आकडेमोड केली. हे सर्व करूनही उजेड पडला नाही. हजाराच्या घरात रुग्ण असताना केलेले प्रयोग आणि प्रयोग करणारेही रुग्णांचे आकडे लाखांवर गेल्यावर गायब झाले. नंतर या विषयावर तोंडावर बोट होते. विदेशातून श्रीमंतांनी आणलेल्या कोरोनाचे परिणाम देशातील गरीब लोकांना भोगावे लागत आहेत. लोकांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात चीड आहे. लोकांना व्यक्त होण्याची संधी हवी होती. रविवारी झालेल्या ‘मन की बात’चा व्हिडिओ भाजपच्या अधिकृत ‘युट्यूब’ चॅनलवर अपलोड झाल्यावर लोकांनी आपली भडास काढली. केवळ दोन दिवसांत नऊ लाख लोकांनी मोदींच्या भावनांना ‘डिसलाईक’ केले. लाईक करणाऱ्यांची संख्या दोन लाखांच्या घरातही नव्हती.
मोदींच्या परवाच्याच ‘मन की बात’ वर लोकांचा रोष आहे असे नाही तर भाजपने याआधीही अपलोड केलेल्या ‘मन की बात’च्या व्हिडिओस लाखो लोकांनी उलटा अंगठा दाखवून नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांना यामागे कॉँग्रेसचा हात दिसून येतो. डिसलाईक करणारे ९८ टक्के लोक हे विदेशातील असल्याचा ते खुलासा करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. कारण आयटीच्या माध्यमातून करामती करण्याचे बीजारोपण २०१४ पासूनच झाले आहे. भाग एवढाच की दुसºयांसाठी खोदलेल्या खड्ड्यात स्वत:च जाऊन पडणे असे म्हणता येईल. मालवीय म्हणतात ते जर खरे असेल तर देशातील लोक मोदींचे व्हिडिओ पाहात नाहीत असाही त्याचा अर्थ काढता येऊ शकतो.
मोदींना केवळ ‘मन की बात’ने झटका दिला असे नाही. लगेच दुस-या दिवशी म्हणजे सोमवारी जाहीर झालेल्या सकल राष्टÑीय उत्पादनाच्या (जीडीपी) आकड्यांनी सरकारची मानगूट धरली आहे. भारतीय सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून २०२० या तिमाहीतील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात देशाची अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी घसरली आहे. १९९६ पासून जीडीपीची तिमाही आकडेवारी जाहीर होत असते. गेल्या २४ वर्षांतील ही सर्वात मोठी घरसण आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अर्थव्यवस्था इतकी डबघाईस आली असेही म्हणता येईल.
महासत्ता होण्याचे स्वप्न दाखविणा-या मोदी सरकारला जी-७ मधील राष्टÑांनी अर्थव्यवस्थेत शेवटच्या क्रमांकावर फेकले. चीनने आपला जीडीपी दर ३.२ टक्के ठेवून उणे अर्थव्यवस्था असलेल्या जपान, अमेरिका, जर्मनी, कॅनडा, इटली, फ्रान्स, ब्रिटन आणि भारत या देशांना वाकुल्या दाखविल्या आहेत. देशाची इभ्रत वाचविण्याचे काम ख-या अर्थाने बळी राजाने केले. या तिमाहीत कृषीक्षेत्राचा दर ३.४ टक्के आहे. हे तेच शेतकरी बांधव आहेत त्यांचा केवळ मतांसाठी वापर केला जातो. नापिकी झाली की सरकारपुढे आसवे गाळतो, मायबाप सरकार मदत करा हो म्हणून टाहो फोडतो. त्यांचे कोणी ऐकले नाही की गळाला फास लावून आपली जीवन यात्रा संपवतो. त्यांच्या आत्महत्येची कोणी साधी दखल घेत नाही. लाखो शेतकºयांनी आत्महत्या केल्या. त्याची सीबीआय चौकशी करावी असे कोणाला वाटले नाही. माध्यमांना सुशांत सिंह राजपूत महत्त्वाचा वाटतो. देशातील ९४ टक्के असंघटित क्षेत्राचे वाटोळे झाले आहे. त्याचे मंथन करून पुनरुज्जीवित करण्याची ही वेळ आहे. मोठ्या उद्योगपतींवर माया दाखविणाºया मोदी सरकारला आता सहजतेने सुटता येणार नाही. देशाच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना ‘देवाची करणी’ (अॅक्ट आॅफ गॉड) असे सांगून जनतेची दिशाभूल खूप काळ करता येणार नाही. मूर्ती किती मोठी असावी आणि कळस किती लांबून दिसायला पाहिजे यात वेळ आणि पैसा घालवण्यापेक्षा रसातळाला गेलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची ही वेळ आहे. त्यासाठी निर्लज्जतेच्या कळसाचा सर्वप्रथम त्याग करावा लागेल.