दृष्टिकोन - भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ‘अन् सेव्ह इंडियन फार्मर्स’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 04:32 AM2019-09-07T04:32:20+5:302019-09-07T04:32:53+5:30
परदेशातील सुखसमृद्धीचे जीवन जगत असतानाच मायभूमी भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी अस्वस्थ होऊन
चंद्रकांत कित्तुरे
परदेशातील सुखसमृद्धीचे जीवन जगत असतानाच मायभूमी भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी अस्वस्थ होऊन अमेरिकेतील काही भारतीय तरुणांनी सेव्ह इंडियन फार्मर्स नावाची संस्था आठ वर्षांपूर्वी सुरू केली. आज या संस्थेचे कार्य भारतातील ११ राज्यांमध्ये सुरू आहे. तिने आतापर्यंत सुमारे १४ कोटींहून अधिक रुपयांची मदत करून हजारो शेतकरी कुटुंबांना सक्षम आणि स्वावलंबी बनविले आहे. या संस्थेचे अनेक प्रकल्प सध्या सुरू आहेत. परदेशात राहून भारतात अशी एखादी चळवळस्वरूपाची संस्था चालविणे कसे शक्य होत असेल. या चळवळीचे कार्य कसे चालते हे जाणून घेताना आपणही यासाठी काहीतरी करावे असे वाटल्यावाचून राहत नाही.
साधारणपणे आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. हेमंत जोशी हे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे डेटा सायंटिस्ट म्हणून सुखासीन जीवन जगत होते. एके दिवशी मात्र भारतातील शेतकरी आत्महत्येची बातमी वाचून ते खूपच अस्वस्थ झाले. डेटा सायंटिस्ट असल्यामुळे त्यांनी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी तपासली असता धक्कादायक आकडे त्यांच्या हाती लागले.
भारतात दर ४१ मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या करतो, हे वाचून तर त्यांची झोपच उडाली. शेतकºयांच्या या आत्महत्या रोखण्यासाठी काही करता येईल का, असा विचार सुरू झाला. तो त्यांनी आपल्या काही मित्रांना बोलून दाखविला. शेतकºयांसाठी काहीतरी केलेच पाहिजे यावर सर्वांचेच एकमत झाले; पण करायचे काय? शेतकरी आत्महत्येचे कारण केवळ आर्थिकच आहे काय? की सामाजिकही आहे, याचा अभ्यास करून कर्जबाजारी शेतकºयाला त्याचे कर्ज फेडण्यासाठी पैसे देऊन फारसा उपयोग होणार नाही. त्यासाठी त्याला आर्थिक स्रोत मिळवून देण्यासाठी स्वत:च्या पायावर उभे करायला हवे, असे ठरले. अमेरिकेत राहून हे कसे करता येईल हा प्रश्न होताच. त्यासाठी आपल्या भूमिकेला अनुकूल अशी एखादी संस्था भारतात विशेषत: महाराष्टÑातील विदर्भात शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यासाठी तीन अटी होत्या. दिलेल्या पैशाचा हिशेब पारदर्शी असला पाहिजे आणि तो नियमितपणे दिला पाहिजे. ती संस्था जातिधर्म, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व घटकांसाठी काम करत असली पाहिजे. एखादी चूक झाली तरी ती सत्याशी प्रतारणा करणारी नसावी म्हणजेच खोटे बोलणे, वागणे अजिबात चालणार नाही. अनेक संस्थांनी काम करण्याची तयारी दर्शविली; पण सेव्ह इंडियन फार्मर्सच्या या अटी ऐकून त्यांनी माघार घेतली. यवतमाळ येथील दीनदयाळ बहु-उद्देशीय प्रसारक मंडळाने या अटी मान्य करून काम सुरू केले. सुरुवात झाली गीता चिंचाळकर यांच्यापासून. श्रीराम चिंचाळकर या ३२ वर्षीय शेतकºयाने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी गीता चिंचाळकर (वय २९) यांना पांढºया पायाची म्हणून कुटुंबीयांनी घराबाहेर काढले. त्यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी लक्ष्मी होती. माहेरच्यांनीही घरी घेण्यास नकार दिल्याने गीता या निराधार झाल्या होत्या. हेमंत जोशी यांनी त्यांचे ७८ हजारांचे कर्ज फेडण्याची तयारी दर्शविली; पण कर्ज फेडून सर्व प्रश्न सुटणार आहेत का, यापेक्षा त्यांना स्वत:च्या पायावर उभे करायला हवे, असा विचार पुढे आला. त्यातून गीता यांना पाच शेळ्या घेऊन देण्यात आल्या. यातून त्यांचा उदरनिर्वाह चालू झाला. आज त्या स्वावलंबी आहेत. ताठ मानेने जगत आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या शेकडो विधवा पत्नींना सेव्ह इंडियन फार्मर्सने स्वावलंबी बनविले आहे.
सेव्ह इंडियन फार्मर्स आज महाराष्टÑाबरोबरच ओडिसा, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, मणिपूर, तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यांत कार्यरत आहे. प्रत्येक राज्यातील शेतकºयांचे प्रश्न वेगळे आहेत. जलसंवर्धन, शिक्षण, महिलांचे आरोग्य, सेंद्रिय शेती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोअरवेल जलपुनर्भरण, पाण्यावरील चाºयाची शेती, मायक्रोफायनान्स म्हणजेच केवळ ५ टक्के दराने कर्जपुरवठा अशा स्वरूपात संस्था कार्य करत आहे. सेव्ह इंडियन फार्मर्सच्या संस्थापकांमध्ये हेमंत जोशी यांच्यासोबत जितेंद्र कारकेरा, पराग देशपांडे, राहुल कुलकर्णी, गौरव कुमार, सुबोध साळवेकर आणि शशिकांत दलाल यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे सर्व जण अनिवासी भारतीय आहेत. शेतीशी त्यांचे फारसे देणे-घेणे नाही. तरीही भारतीय शेतकºयांच्या विकासासाठी ते धडपडत आहेत. जगभरात या संस्थेचे सुमारे २०० स्वयंसेवक आहेत. भारतीय शेतकºयांनी आत्महत्या करू नये यासाठी परदेशात राहून हे अनिवासी भारतीय धडपडत आहेत. भारतात मात्र सरकारनेच सर्व आत्महत्या रोखाव्यात, असा एक सार्वत्रिक चर्चेचा सूर असतो. भारतातील स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती आणि कार्यकर्त्यांनीही अशी चळवळ सुरू केली तर कशाला करतील शेतकरी आत्महत्या?
( लेखक लोकमत वृत्तसमुहात वृत्तसंपादक आहेत )