ऑस्ट्रियातील गावातही भारताच्या पराभवाचे दु:ख

By विजय दर्डा | Published: July 15, 2019 05:22 AM2019-07-15T05:22:49+5:302019-07-15T05:23:22+5:30

‘मी ब्रिटिश आहे व विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये इंडिया हरली याचे मला वाईट वाटले.’

India's grief over losing in Austria | ऑस्ट्रियातील गावातही भारताच्या पराभवाचे दु:ख

ऑस्ट्रियातील गावातही भारताच्या पराभवाचे दु:ख

googlenewsNext

- विजय दर्डा

सध्या मी ऑस्ट्रियातील एका जेमतेम १,९०० लोकवस्ती असलेल्या गावात आहे. मध्य युरोपातील या सुंदर देशाची लोकसंख्याही अवघी ८८ लाख आहे. इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध खेळत होता तेव्हा जगभरातील भारतीयांप्रमाणे माझेही लक्ष त्या सामन्याकडे लागले होते. भारताच्या पराभवाने मला दु:ख होणे स्वाभाविक होते, कारण भारत पराभूत होईल, याची कधी शक्यताही वाटली नव्हती.
दुसऱ्या दिवशी झालेल्या दुसºया उपांत्य सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यानंतर थोड्याच वेळाने या गावातील एका महिलेशी माझी भेट झाली. ‘सॉरी मि. दर्डा, इंडिया लॉस्ट!’ असे म्हणून तिने संभाषणाला सुरुवात केली तेव्हा मला आश्चर्य वाटले. भारतीय क्रिकेट संघाला येथील लोक एवढे फॉलो करतात की काय, असा मला प्रश्न पडला. ‘तुम्ही क्रिकेट फॉलो करता का?’, असे विचारल्यावर ती म्हणाली, ‘मी ब्रिटिश आहे व विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये इंडिया हरली याचे मला वाईट वाटले.’ मी विचारले, ‘तुम्हाला का वाईट वाटले? तुमचा देश तर २७ वर्षांनंतर फायनलमध्ये पोहोचला, याचा खरे तर तुम्हाला आनंद व्हायला हवा!’ त्यावर ती म्हणाली, ‘आम्ही भारताविरुद्ध फायनलमध्ये खेळण्याची मजाच काही और असती! (अर्थात चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले आहे.)
ती ब्रिटिश महिला म्हणाली की, ‘भारतीयांची खिलाडूवृत्ती कमालीची आहे. जगातील अन्य कोणत्याही देशाच्या संघात हे पाहायला मिळत नाही. तुमचा धोनी किती क्यूट आहे, किती शानदार आहे’, असे म्हणून ती हसू लागली. परदेशात भारताची ही प्रशंसा ऐकून मला खूप बरे वाटले. मात्र, ‘तुम्हाला आमच्या राजकारणातही रस आहे का?’ असे विचारता तिने साफ ‘नाही’, असे उत्तर दिले. ती म्हणाली की, मला माझ्या देशाच्या राजकारणात रस नाही व तुमच्या देशाच्याही नाही!
मला असे वाटते की, खेळ हा फक्त खेळापुरता मर्यादित नाही. जेव्हा भारत व पाकिस्तानची मॅच होती तेव्हा जगभरातील भारतीय श्वास रोखून पाहत होते. अशा सामन्यांच्या वेळी क्रिकेट जणू आपले प्राण बनून जाते. क्रिकेटचे एवढे वेड व त्यातून भारतीय संघ चांगला खेळत असताना, सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून आपला पराभव होईल असे म्हणूनच कोणालाही वाटले नव्हते. पण, दुर्दैवाने तसेच झाले. आपल्या संघाच्या निवड समितीने चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी एखादा मजबूत फलंदाज निवडला असता तर हा दिवस पाहावाच लागला नसता. जगातील बहुतेक संघांचे सर्वोत्तम फलंदाज चौथ्या क्रमांकावर खेळतात. परंतु आपल्याकडे या क्रमांकाच्या फलंदाजासाठी सतत फक्त प्रयोग केले गेले. म्हणूनच पहिले चार फलंदाज झटपट बाद झाल्यावर आपला पराभव होणार हेही नक्की झाले! यावर एखाद्या खेळाडूने भाष्य करणे स्वाभाविक आहे. पण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र्र मोदी, राहुल गांधी व लता मंगेशकरही यावर टिप्पणी करतात तेव्हा हा फक्त एक सामना नव्हता हेच स्पष्ट होते.


मला असे वाटते की, लोकसभा निवडणुकीत ‘रालोआ’ला ३५० जागा मिळाल्यावर होता त्याहून जास्त उत्साह लोकांना या सेमी फायनलविषयी होता. त्यामुळे त्या सामन्यातील पराभवाने सर्वांचीच मने दुखावणे ओघानेच आले. खरे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात खिलाडूवृतीची गरज असते. देश उभारायचा असो, समाजाची जडणघडण करायची असो वा घर-संसार चालवायचा असो, खिलाडूवृत्तीशिवाय ते जमणार नाही. खिलाडूवृत्तीशिवाय कोणत्याही क्षेत्रात प्रगती अशक्य आहे. मला, आठवतंय की भारत- इंग्लंड सामन्याच्या वेळी भारत जिंकावा यासाठी पाकिस्तानही दुआ मागत होता. हीच तर खिलाडूवृत्तीची कमाल आहे. खिलाडूवृत्तीनेच आपले दोन्ही देश जवळ येऊ शकतात, असे मला ठामपणे वाटते. भारत सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हरला तेव्हा मला एका पाकिस्तानी मित्राचा फोन आला व त्यानेहीे त्यावर दु:ख व्यक्त केले.
मी सध्या जेथे आहे ते गाव छोटेसे असूनही येथील सोयीसुविधा पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. येथील लोकांच्या वागण्या-बोलण्याने मी खूपच प्रभावित झालो. एकाला मी विचारले, ‘तुम्हा लोकांचे वागणे अगदी सहजपणे एवढे चांगले कसे काय?’ त्यावर त्याने प्रतिप्रश्नानेच उत्तर दिले, असे नसते तर तुम्ही एवढ्या दुरून आमच्या येथे आला असतात का? हे मी ज्याला विचारले तो मूळचा जर्मन भाषिक होता. पण लोकांशी सहजपणे बोलता यावे यासाठी तो मुद्दाम इंग्रजी शिकला होता.

मला येथे आणखी एक युवक भेटला जो बॉक्सिंग करणाऱ्यांच्या हाताला पट्टी बांधतो. बॉक्सिंगचे ग्लोव्हज घालण्याआधी हाताच्या पंजावर ही पट्टी बांधली जाते. हा युवक जागतिक पातळीवर खेळणाºया बॉक्सरना पट्टी बांधतो व इजा झाल्यास त्यांच्यावर उपचारही करतो. तो मला सांगू लागला, ‘मी भारतात गेलो होतो. हिंदुस्थान गरीब जरूर आहे, पण खूप सुसंस्कृत आहे. मी बनारस, ऋषिकेश, आग्रा वगैरे ठिकाणे पाहिली. तुमची संस्कृती फरच सुंदर आहे.’ त्याचे हे बोलणे ऐकून मी प्रफुल्लित झालो. आणि हो, एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी की, येथे कोणीही बाटलीबंद पाणी पित नाही! स्थानिक लोकांनी सांगितले की, येथील पाणी थेट आल्प्स पर्वतांतून येते. एकदम शुद्ध व खनिजांनी भरपूर.
(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह)

Web Title: India's grief over losing in Austria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.