भारताचा हिंदू पाकिस्तान कदापि होऊ शकत नाही

By Admin | Published: August 24, 2016 06:36 AM2016-08-24T06:36:53+5:302016-08-24T06:36:53+5:30

समान भाषा आणि समान शत्रू या निकषांवर काही लोकाना एकत्र आणून त्यांचे राष्ट्र निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले

India's Hindu Pakistan can never be done | भारताचा हिंदू पाकिस्तान कदापि होऊ शकत नाही

भारताचा हिंदू पाकिस्तान कदापि होऊ शकत नाही

googlenewsNext


युरोपमधील काही प्रदेशात १८व्या व्या आणि १९व्या शतकात समान भाषा आणि समान शत्रू या निकषांवर काही लोकाना एकत्र आणून त्यांचे राष्ट्र निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी काही लोकांवर जबरदस्तीही केली गेली. काही ठिकाणी यासाठी धर्माचादेखील वापर केला गेला. काही जागी कॅथलिक लोकांच्या तुलनेत प्रोटेस्टंट लोकाना खरे इंग्रज मानले गेले तर काही ठिकाणी याच्या नेमकी उलट परिस्थिती होती. चांगला पॉल होण्यासाठी चांगली पोलीश भाषा येणे गरजेचे होते. तुम्ही कॅथलिक किंवा तिरस्करणीय मानले जाणारे ज्यू जरी असलात तरी मग काही बिघडत नव्हते, पण चांगला पोलीश नागरिक होण्यासाठी पोलंडला ज्यांच्यापासून धोका आहे अशा रशिया किंवा जर्मनी यांचे तुम्ही द्वेष्टे असणे मात्र गरजेचे होते.
वरील संकल्पना लक्षात घेता, पाकिस्तान हे एक उत्कृष्ट युरोपियन राष्ट्र ठरते. जीनांच्या या राष्ट्राची उभारणी भाषा आणि धर्म यांच्याच आधारावर झाली आहे. पण आज याच दोन गोष्टी पाकिस्तानसाठी अडचणीच्या ठरत आहेत. खरा पाकिस्तानी व्हायचे तर तुम्हाला उर्दू बोलता आली पाहिजे, तुमचा धर्म इस्लाम असला पाहिजे आणि तुमच्या मनात भारताविषयीचा द्वेष भरलेला असला पाहिजे.
महात्मा गांधींचा मात्र धार्मिक किंवा भाषिक आधारावर भारतीयत्वाची व्याख्या करण्यास विरोध होता. त्यामुळे भारत हिंदुबहुल असूनही त्याची निर्मिती हिंदू राष्ट्र म्हणून झाली नाही. मुस्लीम, ख्रिस्ती, शीख, पारशी या साऱ्यांना सामान नागरिकत्व देण्यात आले. बहुसंख्य भारतीय हिंदी बोलतात आणि लिहितात पण जर कुणाला अन्य भाषा वापरायची असेल तरी त्याचा स्वीकार केला जातो.
गांधींजींना हे माहीत होते की राष्ट्राची उभारणी केवळ वैविध्य आणि अनेकता यावरच होऊ शकते. पूर्व पाकिस्तानात उर्दू भाषेच्या झालेल्या सक्तीला विरोध झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. श्रीलंकेत तामिळ भाषकांना समान नागरिकत्व देण्यावरून गृहयुद्ध छेडले गेले व त्यात मोठा रक्तपात झाला. आपल्या या दोन्ही शेजारी राष्ट्रांच्या नेमक्या विरोधात जाऊन भारताने भाषिक विविधतेला प्रोत्साहन दिले आणि त्याचा फायदाही झाला.
इंग्लंडने भारतावर राज्य केले, म्हणून इंग्लंडला शत्रू मानण्याला गांधींचा विरोध होता. त्यांचा जरी साम्राज्यवादाला विरोध होता तरी त्यांनी इंग्रज अधिकारी आणि राजदूत यांना मानानेच वागवले. ब्रिटिशांकडून भारतीयांनी शिकावे असे खूप काही आहे असे गांधी म्हणते. विशेषत: त्यांची सहनशक्ती, संयम आणि वक्तशीरपणा यांचा त्यात गांधी समावेश करीत. ते सतत सांगत असत की इंग्रज भारत सोडून गेल्यानंतरही दोन्ही देशातील संबंध मैत्रीचेच असतील व घडलेही तसेच.
राष्ट्रीयत्वाच्या संदर्भातील गांधीजींचे विविध आग्रह सकारात्मकच ठरले आहेत. पाकिस्तानने काश्मीरवर केलेल्या आक्रमणाचा त्यांनी विरोधच केला होता पण या आक्रमणाचा प्रतिशोध घेण्यासही त्यांचा विरोधच होता. उलट भारताने पाकिस्तानला कबूल केलेली रक्कम अदा केली जाण्याबाबत ते कमालीचे आग्रही होते. गांधींची हत्त्या झाली नसती तर त्यांची अहिंसेची शिकवण सीमापार म्हणजे पश्चिम पंजाब आणि सिंधपर्यंत जाऊन पोहोचली असती.
एका बाजूला गांधीजींचे राष्ट्रीयत्वाचे विचार प्रागतिक आणि मौलिक होते तर दुसऱ्या बाजूला इतर काही भारतीय विचारवंत आणि संघटना यांचे विचार त्याच्या विपरित होते. जीनांनी मुस्लीम लीगच्या माध्यमातून पाकिस्तान निर्मितीचा संकल्प सोडण्याच्या आधीच सावरकर आणि त्यांच्या हिंदू महासभेने हिंदू भारताची मागणी केली होती. भाषेच्या आधारावर झालेली युरोपियन राष्ट्रांची निर्मिती बघून भारतातील काही राजकारण्यांना त्याचे अनुकरण करावेसेही वाटत होते. संपूर्ण भारतात हिंदी भाषेची सक्ती करावी हा गोळवलकर गुरुजी आणि समाजवादी राममनोहर लोहिया यांचा आग्रह होता. शिवाय पाकिस्तानी लोक भारताचा द्वेष करतात म्हणून आपणही तसेच करावे असे काही विचारवंतांचे मत होते.
स्वतंत्र भारताची निर्मिती ६९ वर्षांपूर्वी याच महिन्यात झाली. पण हिंदुत्ववादी आणि हिंदीचे आग्रही लोक यांनी समान भाषा, समान धर्म आणि समान शत्रू या मुद्यांवर लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु सुदैवाने या प्रयत्नांना तितकाच विरोधही आहे. धर्मनिरपेक्षता, अनेकता, पुरोगामीत्व आणि लोकशाही या तत्त्वांवर विश्वास असणाऱ्यांनी हिंदुत्ववाद्यांसमोर आव्हान उभे केले आहे. हिंदुत्ववाद्यांचा कार्यक्रम राष्ट्रनिष्ठेविषयी गोंधळ निर्माण करणारा आहे. हिंदीचा आग्रह करणाऱ्यांनाही असाच विरोध झाला असून तो दक्षिण भारतात अधिक तीव्र आहे. काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तानने भारताशी चार वेळा युद्ध केले असले तरी अनेकांनी राष्ट्राभिमानाची तुलना पाकिस्तानद्वेषाशी केलेली नाही.
भारतीय प्रजासत्ताक आपल्या अनेक नागरिकांना चांगले शिक्षण व आरोग्य सुविधा देण्यात तसेच हिंसा आणि भेदभावापासून संरक्षण देण्यात अपयशी ठरले आहे. पण दुसऱ्या बाजूने देशाचा आकार आणि गुंतागुंत लक्षात घेता येथे होणाऱ्या मुक्त आणि नियमित बहुपक्षीय निवडणुका वाखाणण्यासारख्या आहेत. भारताची भाषिक वैविध्याशी असलेली कटिबद्धता अतुलनीय आहे. देशातील धार्मिक वैविध्य गुंतागुंतीचे असले तरी पाकिस्तानात इस्लामी कट्टरपंथियांचा प्रभाव आहे पण भारत हिंदू राष्ट्र नसले तरी त्याने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. देश अजूनही प्रगतीपथावरच आहे.
भारतीयांना आपल्या राष्ट्रीयत्वाच्या मूळ संकल्पनेचा विसर पडू शकतो आणि पुढे जाऊन हेच राष्ट्रीयत्व आक्रमक, विरोधात्मक आणि एकांगी रूप धारण करु शकते. जसे ते युरोपात जन्मले आणि पाकिस्तान व श्रीलंकेने स्वीकारले. रा.स्व.संघाच्या नियंत्रणातील भाजपा आज सत्तेत आहे व टिआरपी वाढवण्यासाठी वृत्तवाहिन्या अशा कट्टर राष्ट्रवादाला प्रोत्साहन देत आहेत आणि जनसामान्यांना त्यांचे राष्ट्रप्रेम सिद्ध करण्यासाठी काही परीक्षा देणे भाग पाडले जात आहे.
पण या साऱ्याला विरोध व्हायला हवा. उत्तम आणि राष्ट्रभक्त भारतीय होण्यासाठी जन्माने, धर्माने किंवा संस्कृतीने हिंदू असण्याची गरज नाही. त्याला हिंदी भाषा अवगत असण्याची सक्ती नाही आणि पाकिस्तानचा द्वेष करण्याची तर मुळीच गरज नाही.
-रामचंद्र गुहा
(ज्येष्ठ राजकीय विश्लेषक)

Web Title: India's Hindu Pakistan can never be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.