नीतू, निखत, लवलिना आणि स्वीटीने सोने लुटले, त्याची गोष्ट..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 07:51 AM2023-03-29T07:51:10+5:302023-03-29T07:51:36+5:30

भारताच्या चार सुवर्णकन्यांनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर ‘म्हारी छोरिया छोरों से कम है के?’ हा संवाद पुन्हा गाजू लागला आहे..

India's Neetu Ghanghas, Nikhat Zareen, Lovelina Borgohai and Sweety Bura bag historic gold medals at World Boxing Championships | नीतू, निखत, लवलिना आणि स्वीटीने सोने लुटले, त्याची गोष्ट..

नीतू, निखत, लवलिना आणि स्वीटीने सोने लुटले, त्याची गोष्ट..

googlenewsNext

- रोहित नाईक

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ चित्रपटातील, ‘म्हारी छोरिया छोरों से कम है के?’ या संवादाने भारतीय क्रीडाविश्वाला वेड लावले होते. खेळ कोणताही असो, महिला खेळाडूने विजयी कामगिरी केल्यानंतर तिच्या यशाचा जल्लोष करताना हा संवाद हमखास वापरला जात होता. आताही नुकताच संपलेल्या महिलांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या नितू घंघास, निखत झरीन, लवलीना बोरगोहाईं व स्वीटी बुरा यांनी ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले आणि पुन्हा एकदा हा संवाद गाजू लागला.

महिला बॉक्सिंगमध्ये आज आपल्याला मेरी कोमनंतरची पुढची भक्कम पिढी लाभली आहे. मात्र, या चौघींचे कौतुक होत असताना मेरी कोमच्या संघर्षाचा विसर पडता कामा नये. मेरी कोमने भारतीय मुलींना बॉक्सिंगकडे वळवले. आपणही दमदार पंच मारू शकतो, हा विश्वास मेरी कोमने मिळवून दिला. ज्या स्पर्धेत या चौघींनी सुवर्णपदके जिंकली, त्याच स्पर्धेत मेरी कोमने तब्बल सहा सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण आठ पदके पटकावली आहेत. जागतिक स्पर्धेत आतापर्यंत एकाहून अधिक सुवर्ण पटकावणारी मेरी कोम एकमेव भारतीय महिला होती. आता निखतने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्ण जिंकत मेरी कोमच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. 

मार्च महिना खऱ्या अर्थाने महिलांचा ठरला. ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो आणि याच महिन्यात महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) आणि महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग या दोन स्पर्धा गाजल्या. भारताच्या चारही गोल्डन बॉक्सर्सना या यशासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले. संघर्ष कोणाला चुकला नाही, असे आपण सहज म्हणतो. पण, यशस्वी व्यक्तींच्या संघर्षावर नजर टाकल्यास त्यापुढे आपला संघर्ष कवडीमोल वाटतो. कारण, आपल्या ध्येयासाठी दिवस-रात्र मेहनत घेणे, वेड्यासारखे झपाटून मेहनत करणे आणि त्यासाठी तहान-भूक विसरून झटत राहणे हे प्रत्येकालाच जमत नसते. 

नीतूला बॉक्सिंग चॅम्पियन म्हणून घडविण्यासाठी तिच्या वडिलांनी हरयाणा राज्यसभेतील नोकरीतून सुट्टी घेत शेती सुरु केली. तिच्या सराव आणि खुराकासाठी ६ लाख रुपयांचे कर्ज काढले. पोडियम सुवर्णपदक स्वीकारताना नीतूला अनावर झालेल्या अश्रूंची किंमत केवळ तिला आणि तिच्या कुटुंबीयांनाच माहीत होती. ऑलिम्पिक कांस्यविजेती लवलीनाचे वडील एक साधारण लघुउद्योजक, ज्यांची महिन्याची कमाई केवळ १३०० रुपये होती. एक दिवस वडिलांकडून एका वर्तमानपत्रात गुंडाळून आणलेली मिठाई घेतल्यानंतर त्या वर्तमानपत्रातील दिग्गज बॉक्सर मोहम्मद अली यांच्यावरील लेख नजरेत आला आणि तिला बॉक्सिंगची प्रेरणा मिळाली. निखत, या शब्दाचा अर्थ होतो सुगंध आणि झरीन म्हणजे सोन्याने बनलेली.

निखत आज आपल्या नावाप्रमाणेच देशभरातील मुलींना प्रेरित करत आहे तर स्वीटीने मानसिकरीत्या खचल्यानंतर कशा प्रकारे पुनरागमन करावे याचा धडाच दिला आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी संधी न मिळाल्यानंतर निराश झालेल्या स्वीटीने बॉक्सिंगमधून ब्रेक घेतला. यादरम्यान कबड्डीपटू असलेला पती दीपक हुड्डा याने तिला कबड्डीकडे वळले. स्वीटीला त्याची मोठी मदत झाली, पण कबड्डीमध्ये मन रमत नसल्याने पुन्हा एकदा तिने बॉक्सिंग ग्लोव्हज घातले आणि पुढे घडला तो इतिहास...या चौघींचा संघर्ष सर्वांनाच प्रेरित करणारा आहे. भारतीय महिला क्रीडाविश्व किती भक्कम आणि उज्ज्वल आहे, हे यंदाच्या मार्च महिन्यात दिसून आले. मुलींना मोकळीक दिली, त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना आवश्यक असा पाठिंबा दिला, तर नक्कीच प्रत्येक घरामध्ये नीतू, लवलीना, निखत आणि स्वीटी घडतील. शेवटी खेळ असो किंवा शिक्षण, कोणत्याही क्षेत्रातील यशाचा लिंग किंवा धर्म नसतो. महत्त्वाचे असते ती मेहनत आणि ध्येयप्राप्तीचा दृष्टिकोन..

Web Title: India's Neetu Ghanghas, Nikhat Zareen, Lovelina Borgohai and Sweety Bura bag historic gold medals at World Boxing Championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.