‘खांदेरी’मुळे वाढणार सामरिक ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 04:24 AM2019-09-27T04:24:22+5:302019-09-27T04:27:27+5:30

नौदलाच्या ताफ्यात रुजू होत असलेल्या खांदेरी पाणबुडीमुळे भारतीय नौदलाच्या शक्तीमध्ये मोठी वाढ होणार आहे.

indias tactical strength will increase with ins khanderi | ‘खांदेरी’मुळे वाढणार सामरिक ताकद

‘खांदेरी’मुळे वाढणार सामरिक ताकद

Next

- कॅप्टन डी.के. शर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, नौदल (निवृत्त)

नौदलाच्या ताफ्यात रुजू होत असलेल्या खांदेरी पाणबुडीमुळे भारतीय नौदलाच्या शक्तीमध्ये मोठी वाढ होणार आहे. खांदेरी पाणबुडी पूर्वी रशियाकडून भारताकडे आली होती. सन १९६७ मध्ये कलवरी, त्यानंतर ६८ मध्ये ६९ मध्ये व ७० मध्ये अशा प्रकारे सलग चार पाणबुड्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात रुजू करण्यात आल्या होत्या. खांदेरी भारतीय नौदलात ६ डिसेंबर १९६८ ला रुजू झाली होती. नौदलात रुजू झालेली ती दुसरी पाणबुडी होती. दिवंगत कमांडर एम.एन. वासुदेवा यांच्या नेतृत्वात सोव्हिएत बंदर रिगा येथे त्याचे हस्तांतरण झाले होते. नौदलामध्ये खांदेरी पाणबुडीने तब्बल २१ वर्षे सेवा बजावली होती. भारतीय नौदलाची ३० वर्षांची पाणबुडी निर्मितीची योजना आहे. त्या अंतर्गत प्रोजेक्ट ७५ मध्ये ६ पाणबुड्या बनवण्यात येत आहेत. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये या पाणबुड्यांची निर्मिती केली जात आहे.



१७ डिसेंबर २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलवरी नौदलाच्या ताफ्यात रुजू केली होती. नऊ महिन्यांनंतर खांदेरी ही पाणबुडी नौदलाच्या सेवेत येण्याची गरज होती. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे विलंब झाल्याने २८ सप्टेंबर २०१९ ला ही पाणबुडी सेवेत रुजू होत आहे. ही पाणबुडी अगदी तयार स्थितीत असून कोणत्याही क्षणी कोणत्याही मोहिमेवर जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. ही अत्यंत सायलेंट प्रकारची पाणबुडी आहे. याची बांधणी अत्याधुनिक आहे. माझगाव डॉक शिपमध्ये फ्रान्सच्या नौदल गटासोबत याची निर्मिती केली गेली. देशाच्या नौदलात गरजेपेक्षा पाणबुड्या कमी होत्या. सध्या १४ पाणबुड्या कार्यरत आहेत. कलवरी, खांदेरी या पाणबुड्यांची ताफ्यात भर पडली आहे.



पाण्याखालील युद्धामध्ये पाणबुडी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. सागरी किनाऱ्याचे मोठे संरक्षण याद्वारे केले जाते. कोणतेही नौदल, कोणत्याही बंदरावर हल्ला करू शकत नाही, पाणबुडी पाण्याखाली नेमक्या कोणत्या भागात आहे ही माहिती नसल्याने विरोधक शत्रूंची अडचण होते व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती चांगली बाब होते. देशाचे नौदल अत्यंत सशक्त आहे. इंडियन ओशिएन विभागात सर्वात ताकदवान भारतीय नौदल आहे. नौदलाच्या पाणबुडी क्षमतेत आणखी वाढ केली जात आहे. अशा प्रकारच्या आणखी एकूण ६ पाणबुड्या ताफ्यात येणार आहेत. ही पाणबुडी जुन्या पाणबुडीच्या तुलनेत अत्याधुनिक आहे. यात वापरण्यात आलेल्या सामग्रीचा दर्जा अत्युत्तम आहे. ही पाणबुडी सेवेत येण्यासाठी काही काळ विलंब झाला. मात्र याच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ही पाणबुडी थेट संरक्षणासाठी तैनात करता येईल.



सुरुवातीला ही पाणबुडी मुंबईत तैनात करण्यात येणार आहे. त्यानंतर नौदल त्याला कारवार किंवा अन्यत्र पाठवू शकेल. मुंबईत तैनात असतानादेखील पूर्ण अरबी समुद्रातील सुरक्षेसाठी या पाणबुडीवर अवलंबून राहता येणे शक्य होणार आहे. एकदा पाण्यात गेल्यानंतर एक महिनाभर ही पाणबुडी पाण्यात राहून आपले काम करू शकेल. या पाणबुडीवर सुमारे ५० जणांचा ताफा कार्यरत राहू शकतो. या पाणबुडीत कार्यरत असलेल्या जवान, अधिकाऱ्यांचा शिधा संपल्यावर त्यांना परत मागे किनाऱ्याकडे यावे लागते. अन्यथा आणखी काही काळदेखील ही पाणबुडी समुद्रात पाण्याखाली राहून सक्षमपणे काम करू शकते.



या प्रकारच्या पाणबुड्यांमध्ये ऊर्जेसाठी बॅटऱ्या लावलेल्या असतात. सुमारे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांनंतर या पाणबुडीतून पाइप बाहेर काढून त्याद्वारे ऑक्सिजन आत घेऊन बॅटऱ्या चार्ज केल्या जातात. शक्यतो ही कार्यवाही रात्रीच्या वेळी गडद अंधारात केली जाते. कोणालाही पाणबुडी नेमकी कुठे आहे हे कळू नये यासाठी ही काळजी घेतली जाते. तर दिवसाउजेडी ही पाणबुडी खोल पाण्यामध्ये असते. २०० ते ३०० मीटर पाण्याखाली जाऊन कार्यरत राहण्याची क्षमता या पाणबुडीची आहे. अत्यंत सक्षम अशा या पाणबुडीचे चांगले डिझाइन तयार करण्यात आले आहे.



खांदेरीला देदीप्यमान इतिहासाचा वारसा असल्याने खांदेरीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे व खांदेरीकडून ही अपेक्षा नक्कीच पूर्ण होईल यात कोणतीही शंका नाही. १९७१ च्या युद्धामध्ये खांदेरीने पूर्व किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी मोठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. रशियन बनावटीच्या या फॉक्सट्रोट गटातील या पाणबुडीने देशाच्या सेवेत सुमारे २१ वर्षे उत्तम कामगिरी केली. नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर विशाखापट्टणम येथील आयएनएस वीरबाहूच्या संचालन मैदानात पुढील पिढ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या स्मृती जतन करण्यात आल्या.



नवीन खांदेरी माझगाव डॉक येथील ११८७६ यार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. ७ एप्रिल २००९ रोजी तिच्या निर्मितीस प्रारंभ झाला होता. पाच भागांत ही निर्मितीची प्रक्रिया करण्यात आली व हे पाच भाग नोव्हेंबर २०१६ मध्ये एकत्र करण्यात आले व तिला खांदेरीचे आजचे रूप देण्यात आले. ६७.५ मीटर लांब व १२.३ मीेटर उंच अशा बलाढ्य आकारमानाची ही खांदेरी पुढील काही वर्षे देशाच्या सेवेत कार्यरत राहून विरोधकांना धडकी भरवेल यात शंका नाही.

Web Title: indias tactical strength will increase with ins khanderi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.