इंदिरा गांधी, मोदी अन् आणीबाणीचे कवित्व
By admin | Published: June 26, 2015 12:57 AM2015-06-26T00:57:13+5:302015-06-26T00:57:13+5:30
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषीत केलेल्या आणीबाणीला आज ४० वर्षे पूर्ण झाली. आणीबाणी घोषीत करून त्यांनी योग्य केले की अयोग्य यावर चर्चा झडत राहतील
धनंजय जुन्नरकर, (सचिव, मुंबई कॉँग्रेस) -
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषीत केलेल्या आणीबाणीला आज ४० वर्षे पूर्ण झाली. आणीबाणी घोषीत करून त्यांनी योग्य केले की अयोग्य यावर चर्चा झडत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ ते आजतागायत जो कारभार चालविला आहे किंबहुना चालवत आहेत तो पाहिल्यावर इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीचा पुन्हा एकदा अभ्यास करणे भाग पडत आहे. इंदिरा गांधी यांच्या व्यक्तीमत्वाची जडण घडण, आणीबाणीच्या आधीचा व आणीबाणी लावल्या नंतरचा भारत याचा सांगोपांग विचार करणे आजची गरज आहे. लालकृष्ण अडवाणींनी आणीबाणीविषयी जी मते एका मुलाखतीत व्यक्त केली आहेत ते पाहता कालचक्र पुन्हा त्याच मार्गाने जात आहे हेही स्पष्ट झाले .
भाजपाचे सरकार असूनही त्यांना आणीबाणी लागणार नाही याची खात्री वाटत नाही यातच सर्व आले. नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे कोणत्याही मंत्र्याला स्वत:चा सचिवही नेमायचा अधिकार दिला नाही हे पाहिल्यावर त्यांना काम करण्याचा काही अधिकार दिला असेल असे वाटत नाही. नियोजन आयोगाची बरखास्ती, शासकीय संस्थांचे भगवेकरण आणि फाजील वाद यात लोकांना काम दिसलेलेच नाही. वारंवार वटहुकुम काढणे, परदेशगमन करणे आणि देशाला जो आज मान मिळत आहे त्याला आपणच कारणीभूत आहोत असे परदेशात सांगणे याशिवाय काहीच घडताना दिसत नाही. इंदिरा गांधीच्या आणीबाणी पर्वात माध्यमांना सेन्सॉर केले जात होते. मोदींच्या काळात माध्यमे स्पॉन्सर झाली एवढाच काय तो फरक. इंदिरा गांधींनी आणीबाणी का लावली असावी, १९७५ साली भारतीय लोकशाहीच्या खांबांखाली काय उलथापालथ झाली, या सर्व प्रश्नांचा विचार करायचा असेल तर, १९७१ चा बांगला देश मुक्ती संग्राम, १९७२ चा भीषण दुष्काळ, अमेरिकेने अन्नधान्य भारताला देण्यासाठी केलेली अडवणूक, १९७३ ला तेलाच्या चारपट वाढलेल्या किमती, ३० टक्क्यांवर गेलेला चलन फुगवटा, अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तुंची तीव्र टंचाई आणि या सर्वांचा फायदा घेत जयप्रकाश नारायण यांनी सत्तेच्या राजकारणासाठी दिलेला संपूर्ण क्र ांतीचा नारा व जॉर्ज फर्नांडीस यांनी दिलेली रेल्वे संपाची हाक याचाही विचार करावा लागेल. ‘आपल्या सामाजिक व आर्थिक बाबींसाठी घटनात्मक पाठपुरावा न केल्यास अराजकता लोकशाहीचा घात करण्यास टपून बसलेली असेल’ असा इशारा डॉ. आंबेडकर यांनी दिला होता. पण सत्ता परिवर्तनाच्या नावाखाली तो खुंटीवर टांगला गेला. १९७५ च्या आधीची देशाची अवस्था देशाला कडू डोस देण्याइतपत बिघडली होती.
१९७३ मध्ये रेल्वेत संप घडवून आणणे, गो-स्लो , काम बंद आंदोलन अशी आंदोलने जॉर्ज फर्नांडीस यांनी केली. त्या आंदोलनांमागे रेल्वे कर्मचाऱ्यांचे भले व्हावे हा विचार नव्हता हे लगेच कळून आले. इंदिरा गांधी यांना सत्तेवरून खाली खेचणे हेच आपले उद्दिष्ट आहे, हे त्यांनीच जाहीर केले होते. टंचाईग्रस्त भागात अन्नधान्य घेऊन जाणाऱ्या गाड्यांना रुळावरून घसरविणे, आगगाड्यांचे स्मशानभूमीत रुपांतर करणे असे कार्यक्र म त्यांच्या कार्यक्र म पत्रिकेवर होते. अशा बिकट परिस्थितीतही इंदिरा गांधी धीरोदात्तपणे काम करीत होत्या.त्यावेळी अहमदाबादमध्ये एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेसच्या दरवाढी विरोधात आंदोलन केले. त्या आंदोलनाचे लोण पसरत गेले व चिमणभाई पटेल हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री भ्रष्टाचारी असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांच्या सरकारला राजीनामा द्यायला लावले गेले. तिथे राष्ट्रपती राजवट आली. १९७७ साली मोरारजी देसाई यांचे सरकार येताच त्यांनी सरकार बनवायला काँग्रेसने हकालपट्टी केलेल्या पटेल यांचाच पाठिंबा घेतला.
जानेवारी १९७५ ला रेल्वे मंत्री ललितनारायण मिश्र यांचा खून, भारताच्या सरन्यायाधीशावरील हल्ला, देशाला वेगळ्याच मार्गाने घेऊन जात होता. १२ जून रोजी न्या. जगमोहन सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड भ्रष्टाचार आणि प्रचारसभेत राज्य शासनाच्या खर्चाने व्यासपीठ बनविले या मुद्यावर रद्द केली. सर्वोच्च न्यायालयात भ्रष्टाचार हा मुद्दा टिकला नाही. इंदिरा गांधी यांना केवळ लोकसभेत मतदानाला प्रतिबंध केला गेला. विरोधी पक्षांनी देशव्यापी सत्त्याग्रह केला. पोलीस आणि सैन्याला सरकारचे आदेश न ऐकण्याची चिथावणी दिली. हे सर्व २५ जूनच्या संध्याकाळपर्यंत वाढत गेले व २६ जून रोजी पहाटे आकाशवाणीवरून आणीबाणी घोषीत झाली. जयप्रकाश यांच्या अटकेनंतर सगळी आंदोलने बंद झाली. वृत्तपत्रांनी रंगवलेले हे आंदोलन देशव्यापी नव्हते. या आंदोलनात प्रामुख्याने रा.स्व. संघ आणि जनसंघाचे लोक होते हे स्पष्ट होते. प्रचारसभेत राज्य शासनाच्या खर्चाने व्यासपीठ बनविणे हे पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे होते, किंबहुना असावे.
माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी मोदी यांना गुजरात दंगलीच्या वेळी जाहीरपणे ‘राजधर्माचे पालन करायला सांगितले होते, आता अडवाणी मोदी पंतप्रधान असताना आणीबाणी येऊ शकते याविषयी सुचवित आहेत .यावरून सध्या काय चालले आहे हे सांगण्याची गरज नाही. १९७५ ची आणीबाणी अन् आताची मोदी सत्ता या सर्व बाबींचा अभ्यास केला असता, इंदिरा गांधी यांची चूक झाली की मोदी बरोबर वागत आहेत याचा निर्णय लोकांनीच घ्यायचा आहे .