जन्ता रांगेत हाय.. राजकारणबी लय रंगात हाय !

By सचिन जवळकोटे | Published: May 13, 2021 06:25 AM2021-05-13T06:25:18+5:302021-05-13T11:36:40+5:30

भूतलावर प्रत्येक गोष्टीसाठी रांगा लागल्यात म्हटल्यावर इंद्र देवांनी नारद मुनींना खाली धाडले. मुनी बघतात, तर काय...

Indra Deo and narada's communication on the current corona situation of world | जन्ता रांगेत हाय.. राजकारणबी लय रंगात हाय !

जन्ता रांगेत हाय.. राजकारणबी लय रंगात हाय !

Next

सचिन जवळकोटे

इंद्रांच्या कानावर कलकलाट पडला. डिस्टर्ब होऊन त्यांनी विचारताच नारद म्हणाले, ‘भूतलावर प्रत्येक गोष्टीसाठी प्रचंड रांगा लागल्यात. हॉस्पिटलसमोर बेडसाठी, मेडिकलसमोर रेमडेसिविरसाठी, सिव्हिलसमोर लसीसाठी तर झुणका-भाकर केंद्रासमोर शिवभोजन थाळीसाठी रांग. हे सारं कमी पडलं की काय म्हणून स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी प्रेतांची रांग.. अन‌् आता या साऱ्या रांगा पोहोचल्यात आपल्या दरबाराच्या प्रवेशद्वारापर्यंत.’ 
लांबलचक रांगांचं वर्णन करून नारद दमले असले तरी हे सर्व ऐकून दरबाराचा श्वास अडकला. 

‘मुनी तत्काळ निघा. या रांगांचा जनक कोण, याचा तत्काळ शोध घ्या.’ - इंद्रांनी फर्मावताच नारदांनी ‘विनामास्क’ दंड नको म्हणून अगोदर वीणा बाजूला ठेवली, ‘मास्क’ तोंडाला लावला, मगच ते पोहोचले पंढरीच्या चंद्रभागातीरी. राजकीय नेते आपापल्या आलिशान गाडीत फिरत होते. ‘मैंने नगद बेचा’वाल्या दुकानदारासारखं रुबाबात; मात्र हॉस्पिटलसमोरच्या रांगेतल्या लोकांची अवस्था ‘मैंने उधार बेचा’वाल्या दुकानदारासारखी केविलवाणी.

 अस्वस्थ मुनी पुण्यात पोहोचले. पेठेतल्या पाटीवर चक्क लिहिलेलं, ‘कृपया कोणीही आम्हाला तिसऱ्या लाटेची भीती दाखवू नये. लॉकडाऊनच्या सुट्टीत आम्ही बीचवर जाऊन असंख्य लाटा झेलून आलोत.’ एवढा उत्तुंग आत्मविश्वास पाहून तोंडावर अजून एक मास्क चढवत मुनी समोरच्या पोलीस ठाण्यात गेले. लगेच दोन कॉन्स्टेबल एकमेकांशी कुजबुजले, ‘नवीन ड्रेसमध्ये आपले सीपीसाहेब तर नाहीत ना हे? ’

 ‘एवढी विचित्र परिस्थिती असूनही पुण्यात टोटल लॉकडाऊन का नाही?’-  मुनींच्या या प्रश्नावर समोरचा म्हणाला, ‘तो डिसिजन आमचे सीएम बारामतीतून घेतील.’ गोंधळून मुनींनी पुन्हा विचारलं, ‘पण सीएम तर मुंबईतच ऑनलाईन असतात ना..’ - तेव्हा दुसरा गालातल्या गालात हसून म्हणाला, ‘पुण्याचे सीएम फक्त एकच, आमचे अजितदादा.’ 

  घाम पुसत मुनी मुंबईत पोहोचले. तिथं लसीकरणाच्या रांगेत एक गर्भवती तरुणी उभी. मुनींनी तिला सल्ला दिला, ‘या काळात लस घेऊ नये.’ तेव्हा ती शांतपणे उत्तरली, ‘मी माझ्यासाठी नव्हे तर पोटातल्या बाळासाठी आलेय. आत्ताच त्याची नोंदणी करून ठेवली तरच मोठेपणी लस मिळेल ना त्याला’.
 तेवढ्यात मागून खोकलल्याचा आवाज. एक वयोवृद्ध आजोबा वाकलेल्या अवस्थेत रांगेत उभे. मुनींनी काही विचारण्याच्या अगोदर त्यांनीच सांगितलं, ‘मी तरुणपणीच बुकिंग करून ठेवलं होतं, आज मिळेल बहुधा.’ पुढं याच गर्दीत जाकीटवाले ‘संजयराव’ भेटले, ‘जी चूक ट्रम्पनी केली तीच बायडेनही करताहेत. याविरोधात सर्वांना एकत्र आणण्यासाठी मी पुतीन अन‌् जिनपिंगनाही भेटणार’. 
- मुनींच्या कपाळावरच्या आठ्या ओळखून शेजारचा शिवसैनिक कुजबुजला, ‘तुम्ही टेन्शन घिऊ नगा. राैतांना अशी सवयच हाय. त्ये कुणावरबी कवाबी बोलू शकत्यात.’ 

 चौकातल्या एका ‘घड्याळ’वाल्या कार्यकर्त्याला विचारलं, थोरले काका कुठं भेटतील?- तेव्हा तो लगेच हातातल्या मोबाईलवर ट्विटर ओपन करून आव्हाडभाऊंचं अकाउंट हुडकू लागला. ‘आमचे साहेब कधी कुठं नेमकं काय करत असतात, हे बारीक-सारीक केवळ जितेंद्ररावांच्या ट्विटरवरून समजतं.. पण आज नवीन काही दिसेना..’ तेव्हा गालातल्या गालात हसत मुनी म्हणाले, ‘मग सुप्रियाताईंचा गाडीतून लाईव्ह वगैरे सुरू आहे का बघा...’ 
 मंत्रालयाजवळचा एक पेंटर ॲडव्हान्समध्ये नवीन बोर्ड तयार करून ठेवत होता, ‘मराठी-गुजराती भाई भाई..’ त्याला विचारताच त्यानं हातातल्या पेपरची हेडलाईन दाखवली, ‘पीएमकडून कौतुक. सीएमकडून आभार..’ 

बाजूलाच कोपऱ्यात देवेंद्र नागपूरकर टेन्शनमध्ये येऊन दादा बारामतीकरांना विचारत होते, ‘दादाऽऽ माझं भविष्यातलं सीएमपद जाईल की काय..’ तेव्हा त्यांच्यापेक्षाही अधिक गंभीर होऊन दादांनी प्रतिप्रश्न केला, ‘तुमचं पद तर किमान भावी. पण माझं आजी डीसीएम पद तर टिकेल का नाही कोण जाणे...’   दरम्यान, लांब पलीकडं ‘हात’वाले ‘पटोले’ मोबाईलवरून थेट दिल्लीला गुप्त रिपोर्ट देत होते, ‘मॅडम, यहां की तीनों पार्टी अंदर से मिलीजुली है. अपने को भौत अलर्ट रहना पडेगा.’ नारायणऽऽ नारायण ऽऽ

लेखक हे सोलापूर 'लोकमत' आवृत्ती चे निवासी संपादक आहेत. 
 

Web Title: Indra Deo and narada's communication on the current corona situation of world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.