घटनेतील तत्त्वांशी बांधिलकी मानणारे इंद्रकुमार गुजराल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 02:09 AM2019-12-05T02:09:37+5:302019-12-05T02:09:55+5:30

स्वातंत्र्याचा लढा सुरू होता तेव्हा ते दहा वर्षांचे होते.

Indrakumar Gujral, who is committed to the principles of the Constitution | घटनेतील तत्त्वांशी बांधिलकी मानणारे इंद्रकुमार गुजराल

घटनेतील तत्त्वांशी बांधिलकी मानणारे इंद्रकुमार गुजराल

Next

- नीरजा चौधरी (ज्येष्ठ पत्रकार)

माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे दोन शब्दांत वर्णन करायचे झाले तर एक ‘सभ्य राजकारणी’ असेच करावे लागेल. ते शत्रू आणि मित्र दोघांनाही सारख्याच शालीनतेने वागवायचे. समोरची व्यक्ती कशीही वागली तरी त्यांनी स्वत:ची शालीनता कधी सोडली नाही. ते हयात असते तर त्यांनी ४ डिसेंबर रोजी शंभरी पार केली असती. अनेकांना त्यांनी दिलेल्या योगदानाची जाणीव आहे. पण आजच्या युवकांना त्यांनी कोणता वारसा मागे ठेवला आहे, हे समजायला हवे. कारण अशा ऐतिहासिक आठवणी हाच राष्ट्राचा मोठा ठेवा असतो.

स्वातंत्र्याचा लढा सुरू होता तेव्हा ते दहा वर्षांचे होते. पण त्याही वयात त्यांच्या माता-पित्यांनी त्यांना १९२९ साली झालेल्या लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनासाठी नेले होते. याच अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली होती. त्यांचे वडील हे महात्मा गांधी आणि लाला लजपतराय यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. पुढे ऐन तारुण्यात इंद्रकुमार हे मार्क्सवादाने प्रभावित झाले होते. पण पुढे रशियात जे काही घडले होते त्यामुळे भ्रमनिरास होऊन त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे ते इंदिरा गांधींचे अंतर्गत सहकारी झाले. त्यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी माहिती व नभोवाणी खाते सांभाळले. आणीबाणीच्या काळात संजय गांधी हे मीडियासोबत नरमाईने वागत नसल्याचे बघून ते इंदिरा गांधींपासून दूर गेले. १९९७ मध्ये निर्माण झालेल्या संयुक्त आघाडीत त्यांनी पंतप्रधानपददेखील भूषविले होते.

पंतप्रधान म्हणून काम करीत असताना त्यांनी जी तत्त्वे स्वीकारली ती ‘गुजराल तत्त्व प्रणाली’ म्हणून ओळखली जातात. त्या तत्त्वांद्वारे त्यांनी शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. भारताने मोठा भाऊ या नात्याने शेजारी राष्ट्रात भयाचे वातावरण निर्माण न करता त्यांना उदारतेने वागवावे, असे त्यांचे मत होते. त्यादृष्टीने त्यांनी शेजारी राष्ट्रांना अनेकदा झुकते माप दिले आणि त्याबद्दल त्यांना टीकासुद्धा सहन करावी लागली होती. पण शेजारी राष्ट्रांची मित्रता संपादन करण्यातच राष्ट्राची सुरक्षितता सामावली आहे, असे त्यांना वाटायचे. त्यातून चीनचा या राष्ट्रावरील प्रभाव कमी करता येईल, असे त्यांना वाटत असे. त्यासाठी सार्क राष्ट्रांच्या नेत्यांसोबत त्यांनी मैत्रीसंबंध वाढवले. इतकेच नव्हेतर, त्या नेत्यांच्या कुटुंबांसोबतही मैत्री वाढवली. त्यांचे हे वागणे ‘झप्पी, पप्पी राजकारण’ म्हणून टीकेचे पात्रही ठरले. माले येथे झालेल्या सार्क परिषदेत त्यांनी पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दिलेल्या ‘झप्पी’ची अनेक काळपर्यंत चर्चा होत राहिली.

एप्रिल १९९७ ते मार्च १९९८ या काळात त्यांनी अत्यंत कठीण आघाड्या सांभाळल्या. या काळात काँग्रेसचा प्रभाव ओसरू लागला होता, पण भाजपसुद्धा तेवढा प्रभावशाली झाला नव्हता. त्यामुळे प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन करणे, ही त्या काळची रीतच झाली होती. असा अनेक पक्षांच्या आघाड्यांचे नेतृत्व एच.डी. देवेगौडा यांच्याकडून गुजराल यांच्याकडे आले होते. त्या वेळी त्यांची आघाडी ही ‘मुख्यमंत्र्यांचे सरकार’ म्हणूनच ओळखली जात होती. प्रादेशिक पक्षांचे जे नेते होते, तेच केंद्र सरकारमध्ये आपल्या पक्षाचे कोणते नेते जातील, हे ठरवायचे. त्यांच्या निवडीमध्ये पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्यास वाव नसायचा. त्यामुळे हे मंत्री सर्वप्रथम आपल्या पक्षाच्या नेत्यांशी निष्ठा बाळगायचे आणि त्यानंतर पंतप्रधानांशी निष्ठा बाळगीत! पंतप्रधान गुजराल किंवा राष्ट्रपती के. आर. नारायणन यांना भाजपच्या तत्त्व प्रणालीशी काहीच देणे-घेणे नव्हते. त्यांची बांधिलकी घटनेतील तत्त्वांशी होती. देवेगौडा यांच्याकडून त्यांच्या हाती जे मंत्रीमंडळ सोपविण्यात आले होते, त्यात बदल करण्याची गुजराल यांना परवानगी नव्हती. पण तरीही त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात चार महिलांचा समावेश करून महिलांना प्रतिनिधित्व दिले.

गुजराल हे उदारमतवादी होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी जेव्हा सूत्रे हातात घेतली तेव्हा त्यांनी आपल्या अंतस्थ मित्रांना स्पष्ट केले होते की, त्यांच्या मंत्रीमंडळात माहिती व नभोवाणी मंत्रालयाचा कार्यभार जयपाल रेड्डी हेच सांभाळतील! कारण दोघांनाही वृत्तपत्र स्वातंत्र्याबद्दल आस्था होती. पंजाबचा पुत्तर अशी गुजराल यांची ओळख होती. ल्युटेन्स दिल्लीत त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. सर्वच पक्षांत त्यांचे मित्र होते. तसेच शेजारी राष्ट्रांशीही त्यांनी चांगले संबंध ठेवले होते. सरकार चालविताना त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. पण तसे करताना घटनेतील तत्त्वांचे पालन करणे त्यांनी कधी सोडले नाही आणि देशहिताला त्यांनी सदैव प्राधान्य दिले; त्यांचे मोठेपण या दोन गोष्टींत सामावले आहे!

Web Title: Indrakumar Gujral, who is committed to the principles of the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.