संघर्षरहित शांततामय जगासाठी पुढाकार

By admin | Published: September 1, 2015 10:03 PM2015-09-01T22:03:47+5:302015-09-02T00:06:14+5:30

अलीकडच्या काळात मध्ययुगीन विचारांचा पगडा बसून आपल्या धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांना काफिर संबोधून त्यांचा रक्तपात घडवून आणणे हेच जणू धर्माचे पालन करणे होय

Initiative for a conflict-free, peaceful world | संघर्षरहित शांततामय जगासाठी पुढाकार

संघर्षरहित शांततामय जगासाठी पुढाकार

Next

बलबीर पुंज (माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा)
अलीकडच्या काळात मध्ययुगीन विचारांचा पगडा बसून आपल्या धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांना काफिर संबोधून त्यांचा रक्तपात घडवून आणणे हेच जणू धर्माचे पालन करणे होय असा समज असणाऱ्यांनी जगात जो विध्वंस घडवून आणायला सुरुवात केली आहे, त्यापासून जगाची सुटका होणे शक्य आहे का? अमेरिकेतील राजकीय अभ्यासक असलेले सॅम्युएल पी. हन्टीगटन यांनी आपल्या ‘क्लॅश आॅफ सिव्हिलायझेशन अँड रिमेकिंग आॅफ वर्ल्ड आॅर्डर’ या ग्रंथातून १९९६ साली जगातील संघर्षाचे आणि अंतिमत: विध्वंसाचे जे चित्र रेखाटले होते. त्याच स्थितीला आजचे भयग्रस्त जग पोचणार आहे का?
अलीकडेच सिरियातील वाळवंटात वसलेल्या प्राचीन पामिरा या २००० वर्षे जुन्या शहराच्या अवशेषांचे जतन करणाऱ्या खलिद असद या विद्वानाचे मस्तक इसिसच्या धर्मांधांनी छाटून टाकले. त्याच इसिसने लहान मुलांच्या हातात बंदुका देऊन ते २५ सरकारी अधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्त्या करीत असल्याचा व्हिडिओ जारी करून आपल्यातील हिंस्र पशूचे दर्शन जगाला घडविले आहे. हे कृत्य त्यांनी सिरियातील एका खुल्या सभागृहात घडवून आणले. आपल्या जवळचे पाकिस्तान हे राष्ट्र देखील या भागात दहशतवादी कृत्यांचे केंद्र बनलेले आहे. त्यांनी धर्मांतर्गत संघर्ष घडवून गोळीबार आणि बॉम्बस्फोटांनी धर्मनिष्ठांकडून धर्मनिष्ठांना मारण्याचे काम चालविले आहे. अशा कृत्यांना धर्माची मान्यता आहे असा धर्मांधांचा समज आहे. पाकिस्तानातील काफिर समजले गेलेले हिंदू आणि शीख यांना जवळपास संपविण्यात आले आहे.
स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या भारतात काश्मिरातील बहुरंगी संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या पंडितांचे

शिरकाण करण्यात आले असून त्यांची संख्या शून्यापर्यंत खाली आली आहे. स्वत:ला धर्मनिष्ठ समजणाऱ्यांनी ‘काफिरांना’ संपवून टाकण्यासाठी बंदुकीचा वापर करण्यासाठी कमी केले नाही. काफिरांची प्रतीके नष्ट करण्याचे काम या धर्मनिष्ठांनी चालविले आहे.
हे कार्य शतकानुशतके सुरूच आहे. धर्मासाठी जगात अनेक युद्धे झाली. अनेक संस्कृती धर्माच्या संघर्षात नष्ट झाल्या. प्रचंड रक्तपात घडवून अनेक वंशच्या वंश संपवून टाकण्यात आले. धार्मिक स्थळांचा विध्वंस घडवून आणण्यात आला आणि हे सर्व धर्माच्या नावावर धर्माच्या तथाकथित प्रेषितांसाठी घडवून आणण्यात आले.
जगाच्या या भागात राहणाऱ्या भारतीयांनी हा धार्मिक अत्याचार अनेक वर्षे सोसला आहे. सर्वप्रथम ख्रिश्चन आणि नंतर इस्लामने या देशात व्यापाराच्या मिषाने प्रवेश केला. सर्वप्रथम त्यांचे आगमन केरळच्या किनाऱ्यावर झाले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आले. भारताचा ख्रिश्चन धर्माशी संबंध चौथ्या शतकात आला. त्या काळात इराणमधील ख्रिश्चन कर्मठांनी अनेकांना नास्तिक ठरवून त्यांची हत्त्या करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्यापासून प्राण वाचविण्यासाठी काही ख्रिश्चन मलबारच्या किनाऱ्यावर उतरले. त्यांच्यापाठोपाठ सिरिया आणि अर्मेनियातून निर्वासित झालेल्यांनी भारतात आश्रय घेतला. त्यावेळच्या हिंदू राजांनी आणि समाजाने आलेले लोक कोणत्या धर्माचे आहेत हे न पाहता त्यांचे आनंदाने स्वागत केले. पण महंमद बिन कासिमने आठव्या शतकात सिंध प्रांतावर आक्रमण केल्यानंतर हिंदू-मुुस्लिम संबंधच बदलून गेले. त्यानंतर तीन शतकांनी महंमद गझनीने भारतावर आक्रमण करून भारताचा मोठा भाग व्यापला. नंतर आलेल्या महंमद घोरीने भारतावरआक्रमण केले तेव्हा पृथ्वीराज चौहानने त्याचा प्रतिकार केला. पण त्याचा पराभव झाल्यावर १२०८ साली दिल्लीची सुलतानशाही अस्तित्वात आली. त्यानंतर अठराव्या शतकापर्यंत या देशात धर्माच्या नावाने विध्वंस आणि अत्याचार होतच राहिले. मुस्लिम सम्राटांनी जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणले. तसेच धार्मिक स्थळांचा विध्वंस करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला समृद्ध भारताची संपत्ती लुटण्याच्या हेतूने या देशावर आक्रमण करण्यात आले. पण महंमद गझनीने गुजरात येथील सोमनाथच्या शिवमंदिराचा अनेकदा विध्वंस घडवून आणला. त्यानंतर त्याने येथील काफिरांविरुद्ध जेहाद पुकारला तसेच भारतात सत्ता स्थापन केल्यावर प्रजेकडून नजराणा स्वीकारण्यास सुरुवात केली. त्याने घालून दिलेला पायंडा त्यानंतरच्या धर्मनिष्ठांनी पुढे चालविला.
ख्रिश्चन धर्माचा खरा चेहरा १५४२ साली दिसून आला जेव्हा सेंट फ्रांसिस झेव्हियर आणि त्याचे अनुयायी पोर्तुगालमधून गोव्याच्या भूमीत उतरले. त्यांनी दक्षिण भारतात प्रसार करण्यास सुरुवात केली. या देशातून हिंदू धर्माचे उच्चाटन करून तेथे ख्रिश्चन धर्माची स्थापना करण्याची त्यांची इच्छा होती. पण हिंदूंसाठी ख्रिश्चन धर्म हा परमेश्वरांपर्यंत पोचण्याचा एक मार्ग नव्हता तर त्याद्वारे मध्ययुगीन साम्राज्यवाद भारतावर लादण्याचा प्रयास होता. १६९८ साली ईस्ट इंडिया कंपनीने कंपनीच्या नियमावलीत धर्मगुरुंनी देशी भाषा शिकून घेऊन देशवासीयात प्रोटेस्टंट विचारसरणी रुजविण्याची अट घालण्यात आली होती.
आजही जगभर जी पाश्चात्त्यांची लोकशाही राष्ट्र अस्तित्वात आहेत, त्यापैकी ५० टक्के राष्ट्रांची सरकारे धार्मिक संस्थांना मदत करीत असतात. राज्यांनी मान्य केलेल्या धर्मातील धर्मगुरुंना सरकारी खजिन्यातून वेतन मिळते. तर ४० टक्के राष्ट्रे चर्चसाठी पैसे गोळा करतात. पाकिस्तानसारखी राष्ट्रे भारतात दहशतवाद्यांची निर्यात करीत असतात. तर भारतातील चर्चना पाश्चात्त्य राष्ट्रे पैसे देऊन भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात.
गझनी, घोरी, सेंट झेवियर, ईस्ट इंडिया कंपनी जरी संपले असले तरी त्यांनी घालून दिलेले मार्ग अस्तित्वात आहेत. त्या मार्गावर जाण्याचे तंत्रज्ञान मात्र बदलले आहे. पण उद्दिष्ट स्वत: ‘परमेश्वर’ लादण्याचे आहे. हे करीत असताना समाजाच्या परंपरा नष्ट करण्याचा त्यांचा हेतू आहे म्हणून ते बामियान बुद्धाला सुरुंग लावून त्याचा विध्वंस करीत आहेत. पामिरा शहराचे अवशेषही नष्ट करीत आहेत. त्याचे तत्त्वज्ञान हे द्वेषाचे आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जगाला भारताची गरज वाटते. भारताने हिंदू, बौद्ध, जैन, शीख या धर्मांसह अनेक परंपरांचे जतन केले. हे धर्म एकत्र सुखाने नांदत आहेत. ज्यू आणि पारशी लोकांवर जेव्हा त्यांच्या राष्ट्रात अत्याचार करण्यात आले तेव्हा त्यांनी भारतातच आश्रय घेतला. हे भारतीय तत्त्वज्ञान जगाला विध्वंसापासून रोखू शकेल. परमेश्वर हा अनेक स्वरूपात अस्तित्वात आहे यावर आपला विश्वास आहे. पण जगात विध्वंस करणाऱ्यांना मात्र त्यांचा देव हाच एकमेव आहे आणि बाकीचे सर्व काफिर आहेत असे वाटत असते.

Web Title: Initiative for a conflict-free, peaceful world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.