नावीन्यपूर्ण विज्ञान शिक्षण ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 06:03 AM2019-02-28T06:03:23+5:302019-02-28T06:03:25+5:30

आज २८ फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिन. सर सी.व्ही. रामन यांच्या ‘प्रकाशाचे विकिरण’ म्हणजेच ‘रामन इफेक्ट’ या शोधाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो.

Innovation science education is the need of the hour | नावीन्यपूर्ण विज्ञान शिक्षण ही काळाची गरज

नावीन्यपूर्ण विज्ञान शिक्षण ही काळाची गरज

Next


आज २८ फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिन. सर सी.व्ही. रामन यांच्या ‘प्रकाशाचे विकिरण’ म्हणजेच ‘रामन इफेक्ट’ या शोधाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. नोबेल पारितोषिकाच्या गेल्या ११९ वर्षांच्या इतिहासात, भारतात राहून आणि भारतीय संस्थांमध्ये संशोधन करून, नोबेल पारितोषिक मिळविणारे एकमेव शास्त्रज्ञ म्हणजे सर सी. व्ही. रामन. त्यांच्याप्रमाणेच अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही रामानुजन, होमी भाभा, एस. एन. बोस, जे. सी. बोस, ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी सर्व अडचणींवर मात करून, भारताला विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण करून दिले आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञान शिक्षणाची आजची सार्वत्रिक परीस्थिती काय आहे, याचा मागोवा घेणे संयुक्तिक ठरेल.


स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतील कलम १ (अ) मधील मूलभूत कर्तव्यानुसार समाजामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन, मानवता व अभ्यासूवृती यांची वाढ करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. शालेय शिक्षणामध्ये विज्ञान हा विषय बंधनकारक आहे. प्रत्येक मुलामध्ये बालपणी अनेक गोष्टीबद्दल कुतूहल असते, परंतु त्यांच्या प्रश्नांकडे नकारात्मक पद्धतीने पाहण्याचा एकंदरीतच शिक्षण व्यवस्थेचा आणि समाजाचा दृष्टिकोन, यामुळे त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती हळूहळू संपून जाते. आजही शालेय शिक्षणामध्ये विज्ञान हे प्रयोगापेक्षा पुस्तकी ज्ञानावरच आधारित आहे. खरे म्हणजे, विज्ञान हा विषय वस्तू हाताळणे, त्यांच्यावर प्रयोग करून होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करणे, त्यामागील कारणांचा शोध घेणे, यावर आधारलेला आहे. शाळांमधून मात्र तो मराठी किंवा इतिहासासारखा वाचून शिकविला जातो. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विचाराला स्वातंत्र्य नसते. तुम्ही असे केल्यानंतर तुम्हाला असे दिसेल, अशा वर्णनात्मक पद्धतीने विज्ञान शिकविले जाते. त्यामुळे मुलांना प्रश्नच पडत नाहीत आणि पडलेच, तर त्यांचे समाधान होत नाही. त्यांना प्रत्यक्ष कृती करून पाहण्याची संधीच मिळत नाही. शालेय जीवनामध्ये पेशी किंवा ग्रह दोन्हीही चित्रांतच दाखविले जातात. प्रत्यक्ष सूक्ष्मदर्शकाखाली पेशी किंवा दुर्बिणीतून ग्रह-तारे मुलांना पाहायलाच मिळत नाहीत. शाळेमध्ये वर्षातून एकदा लिटमस पेपर किंवा प्रिझम या व्यतिरिक्त फार काही प्रयोग साहित्य पाहिल्याचे आपल्याला आठवत नसेल आणि आजही बहुतांश शाळांमध्येही यामध्ये फार फरक पडलेला दिसत नाही.


शासकीय शाळांमध्येच नव्हे, तर काही मोजक्या शाळा सोडल्या, तर खासगी शाळांमध्येही प्रयोगशाळा, प्रयोग साहित्य यांची वानवा असते. कल्पक विज्ञान शिक्षकांची कमतरता ही एक समस्या आपल्यासमोर आहे. व्याख्येला दोन गुण, आकृतीसाठी दोन गुण, याप्रमाणे आपण विज्ञान शिकतो. त्यामुळे प्रत्यक्ष वस्तू हाताळण्याची, त्यांच्यावर वेगवेगळे प्रयोग करण्याची गंमत मुलांना अनुभवताच येत नाही आणि त्यामुळे शालेय जीवनातच विज्ञान हा त्यांच्यासाठी एक कंटाळवाणा अनुभव होऊन जातो. विज्ञान आणि दैनंदिन जीवन यात खूप अंतर आहे, असे त्यांना वाटू लागते आणि साहजिकच त्यांचा कल नोकरीसाठी उपयोगी अशा इतर शाखांकडे वळतो. दहावीनंतर संधी मिळताच, मुले विज्ञानापासून स्वत:ची सुटका करून घेतात.
शिक्षणव्यवस्थेबरोबरच आपला समाजही नवकल्पना, संशोधन यापेक्षा परीक्षेतील गुण आणि पदव्या यांना जास्त महत्त्व देतो. त्यामुळे ज्ञान हे गुण आणि पदव्यांमध्ये सीमित राहते. त्यामुळे सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये जिज्ञासा, कल्पकता, संशोधन, यापेक्षा पाठांतर आणि त्याची परीक्षेमध्ये पुनरावृत्ती याला जास्त महत्त्व आहे.


भारतामध्ये नैसर्गिक गुणवत्तेची कमतरता नाही. आवश्यकता आहे, ती मुलांमधील जिज्ञासू वृत्ती जोपासण्याची, त्यांच्यातील कल्पकतेला वाव देण्याची आणि त्यांना नाविन्यपूर्ण प्रयोग आणि प्रकल्पनिर्मितीसाठी आवश्यक ती साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याची. मुलांमध्ये विज्ञानाबद्दल गोडी निर्माण व्हावी, कुतूहल जागृत व्हावे, यासाठी प्रत्यक्ष प्रयोगातून शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. आजूबाजूच्या, दैनंदिन जीवनातील घटना, वस्तू यांच्या माध्यमातून विज्ञान शिकविणे गरजेचे आहे, तरच त्यांची विज्ञानसोबत मैत्री होईल व ते त्यांना जीवनोपयोगी वाटू लागेल. आमच्याकडेही पुष्पक विमान होते, आमच्या ऋ षिमुनींनीही शोध लावले होते, यामध्ये रममाण न होता, आपण भविष्याचा वेध घेतला पाहिजे. जग झपाट्याने बदलते आहे. आज जगातील सर्वात जास्त युवावर्ग भारतामध्ये आहे. या मोठ्या युवाशक्तीला सकारात्मक दिशेने न्यावयाचे असेल व भारतासमोर उभ्या असलेल्या ज्वलंत समस्यांना सामोरे जायचे असेल, तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाला पर्याय नाही.

 

-अमोल नामजोशी । विज्ञान अभ्यासक

Web Title: Innovation science education is the need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.