जगण्याची प्रेरक दृष्टी

By Admin | Published: June 16, 2016 03:49 AM2016-06-16T03:49:05+5:302016-06-16T03:49:05+5:30

अंधत्वाची समस्या असताना स्वत:चे आयुष्य उभे करणे, हेच खरे तर मोठे आव्हान असते. ते समर्थपणे पेलतानाच असंख्य अंध मुलांना राहुल देशमुख या तरुणाने स्वत:च्या पायावर उभे केले आहे.

The inspirational sight of survival | जगण्याची प्रेरक दृष्टी

जगण्याची प्रेरक दृष्टी

googlenewsNext

- विजय बाविस्कर

अंधत्वाची समस्या असताना स्वत:चे आयुष्य उभे करणे, हेच खरे तर मोठे आव्हान असते. ते समर्थपणे पेलतानाच असंख्य अंध मुलांना राहुल देशमुख या तरुणाने स्वत:च्या पायावर उभे केले आहे. त्याची वाटचाल सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

काही माणसं सगळं छान दिसत असूनदेखील आंधळेपणाने आयुष्य जगत असतात, तर काही जण मात्र असे असतात ज्यांना भले दिसत नसेल, परंतु त्यांना जगण्याची खरी ‘दृष्टी’ प्राप्त झालेली असते. अशा माणसांना जगण्याचे नेमके भान आलेले असते आणि अशी माणसं स्वत:पुरती न थांबता आपल्या परिघामध्ये येणाऱ्या साऱ्यांना ही ‘प्रकाशवाट’ दाखवण्याचे काम अगदी मनापासून करीत असतात. ‘दृष्टिभान’ आलेल्यांपैकी एक असाच जिगरबाज तरुण म्हणजे राहुल देशमुख. राहुलला लहानपणापासूनच दिसत नाही, परंतु त्याच्या कामाचा आवाका, पसारा आणि त्याने व्यक्तिगत स्तरावर केलेली उन्नती पाहता त्याला दृष्टी नाही, असे म्हणण्यास मात्र कुठेही वाव नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत राहुलने आजवर जी मजल मारली आहे ती पाहाता कुणालाही त्यातून प्रेरणा व जगण्याची दिशा मिळावी, अशी आहे.
राहुल एका शेतकऱ्याचा मुलगा. शालेय शिक्षण झाले पुणे अंधशाळेत. अनेकदा महाविद्यालयीन शिक्षणाच्या वाटेवर जाताना अंधत्व ही मोठी समस्या वाटत असते, परंतु राहुलचे तसे नव्हते. महाविद्यालयात प्रवेश मिळाला, परंतु राहायला जागा मिळेना. अंध विद्यार्थ्यांना कुणी राहायला ठेवून घ्यायला तयार नव्हते. होस्टेलवरही कुणाची तयारी दिसेना. मग काही रात्री चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून काढाव्या लागल्या. प्रसंगी पोलिसांचा मारही खावा लागला. परंतु त्याने एकदाही हार मानली नाही. स. प. महाविद्यालयात प्रवेश मिळवला. उत्तम शिक्षण घेतले, तरच आपण समाजमानसात ओळख निर्माण करू शकू, असे त्याच्या लक्षात आले होते. त्यादृष्टीने व त्या दिशेने त्याने प्रयत्न सुरू केले. पुस्तक वाचणे, पेपर लिहिणे, अभ्यास करणे या साऱ्यात दृष्टी नसल्याने अनंत अडचणी होत्याच. काही ‘डोळस’ मित्र धावून आले. त्यांनी मदतीचा हात दिला आणि शिक्षणामध्ये झेप घेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले.
हे सारे एका बाजूला सुरू असताना आपल्यासारखेच समस्यांमधून जाणारे कित्येक अंध-अपंग तरुण आहेत, असे त्याच्या लक्षात आले. अंधत्व ही मुख्य समस्या नसून समाजाचे ‘मानसिक अंधत्व’ ही खरी समस्या आहे, हे वास्तव उमगले आणि मग त्या दिशेने प्रयत्नांची सुरुवात झाली. त्यातूनच ‘स्नेहांकित’ हे रोपटे लावले गेले. अंध-अपंग तरुणांसाठी शिक्षणाची वाट सोपी करतानाच त्यांना अत्याधुनिक शिक्षण द्यावे, ही त्यामागची कल्पना होती. अशा असंख्य धडपडणाऱ्या तरुणांसाठी राहुल आदर्श बनला. दिसत नसतानाही अनेक तरुण सहजतेने संगणक हाताळताना दिसू लागले. अनेक जण तिथून शिकून विप्रो-इन्फोसिससारख्या कंपन्यांतही रुजू झाले. आधुनिकतेची कास धरत डिजिटल लायब्ररी, बीपीओ असे असंख्य प्रयोग त्याने राबवले. या साऱ्या प्रयत्नांमध्ये त्याला आयुष्यभराची डोळस साथ देण्यासाठी ‘देवता’ ही त्याची मैत्रिण धावून आली आणि आता ती त्याची सहचारिणीही बनली. स्नेहांकितचे काम आणखी विस्तारत गेले. नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर आॅफ फिजिकली चॅलेंज्ड (एनएडब्ल्यूपीसी) या संस्थेच्या माध्यमातून राहुलच्या या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. अभिनेता आमीर खानच्या हस्ते त्याला सन्मानित करून त्याच्या वेगळ्या कामाला कौतुकाची थाप लाभली. संस्थेच्या कामाचाही सातत्याने विस्तार होतो आहे. गेल्या १५ वर्षांत हजारो अंध विद्यार्थ्यांना दिशा देऊन स्वत:च्या पायावर उभे केले आहे. अंधत्वाची समस्या असताना स्वत:चे आयुष्य उभे करणे हेच खरे तर मोठे आव्हान असते. ते समर्थपणे पेलतानाच असंख्य अंध मुलांना राहुलने स्वत:च्या पायावर उभे केले आहे. संकटांची पर्वा न करता ‘प्रकाशगीत’ गात राहण्याची व जीवन जगण्याची ही प्रेरक दृष्टी खरोखर अभिनंदनीय आहे.

 

Web Title: The inspirational sight of survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.