राज्यकर्त्यांच्या तावडीत घुसमटतेय मराठी भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:23 AM2019-03-07T04:23:34+5:302019-03-07T04:23:50+5:30
पंधरा वर्षांपूर्वी तमीळ भाषेला अभिजात दर्जा दिला गेला. त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम् आणि उडीया यांनाही तो मिळाला.
- प्रा. हरी नरके
पंधरा वर्षांपूर्वी तमीळ भाषेला अभिजात दर्जा दिला गेला. त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम् आणि उडीया यांनाही तो मिळाला. मराठीला हा दर्जा द्यावा, अशी साहित्य अकादमीने एकमताने केलेली लेखी शिफारस मोदी सरकारने दुर्लक्षित केली आहे. राज्य सरकारही त्याबाबत संपूर्ण उदासीन आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षण हे सारेच विषय गेली ५ वर्षे विनोदाचे विषय बनवले गेले आहेत. राज्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेली मराठी तर अक्षरश: गुदमरते आहे़ राज्यातल्या प्रमुख चारही पक्षांचे मराठीप्रेम पुतणा मावशीचे आहे. मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ, मराठीचे २५ वर्षांचे धोरण, मराठी सक्तीचा कायदा आणि अभिजात दर्जा, या चारही बाबतींत खात्याचे मंत्री विनोद तावडे हे निव्वळ बोलबच्चन ठरलेले आहेत. खरेतर, झेपत नसेल तर त्यांनी पायउतार व्हायला हवे़
तमीळ भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात ‘संगम साहित्याचा’ मोठा वाटा आहे. हे साहित्य २३०० वर्षे जुने आहे. कावेरी नदीवर धरण बांधले जात असल्याचा प्रसंग त्यात आला आहे. या धरणाच्या कामासाठी जगभरातून तज्ज्ञ मागविण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील मराठी गवंडी मोठे कुशल असल्याचे वर्णन त्यात आले आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात वररूचीने ‘प्राकृतप्रकाश’ हा व्याकरण ग्रंथ लिहिला. त्यात त्याने शौरसेनी, मागधी, पैशाची व महाराष्ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण सिद्ध केले. आधीचे सगळे नियम सांगून झाल्यानंतर शेवटचा नियम सांगताना तो म्हणतो, ‘शेषं महाराष्ट्रीवत.’ यावरून देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रचलित असलेल्या सगळ्या भाषांना मराठीचे नियम लागू पडत होते. यातून मराठीची प्रतिष्ठा, मान्यता आणि श्रेष्ठता स्पष्ट होते.
संस्कृत महाकवी कालिदास आणि शूद्रक यांच्या ‘शाकुंतल’ आणि ‘मृच्छकटिक’ या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठीत आहेत. महाभारत या जगप्रसिद्ध महाकाव्यात अनेक मराठी शब्द आलेले आहेत. यज्ञाच्या वेळी पंडितांना मराठीत बोलायला बंदी घालण्यात आल्याची नोंद भागवत यांनी दाखवून दिलेली आहे. संस्कृत ही धर्मभाषा असली तरी हे पंडित खाजगीत मराठीत बोलत असत हे यातून उघड होते. संत एकनाथांनी ‘संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासोनी झाली?’ असे संतप्त उद्गार काढले होते. ‘विंचू चावला...’ ही एकनाथांची भारूडांची मराठी आजची अस्सल मराठी असूनही ते तिला प्राकृत म्हणतात कारण महाराष्ट्री प्राकृत हीच मराठी आहे. रघुनाथराव गोडबोले यांनी १८६३ साली प्रकाशित केलेल्या मराठी शब्दकोशाला ‘महाराष्ट्रीय भाषेचा’ कोश म्हटले आहे, ते यामुळेच.
मराठीला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे. त्यामुळे मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होईल. मराठी शिकवण्याची सोय देशातील ४५० विद्यापीठांमध्ये होईल. मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी ५०० कोटी रुपये मिळतील. मराठी शाळा, शिक्षण, शिक्षक यांची दर्जावाढ, वाचन संस्कृती वाढणे, ग्रंथालये संवर्धित केली जाणे, मराठी पुस्तके स्वस्तात मिळणे, मराठी मुलामुलींना अधिकाधिक रोजगार मिळणे यासाठी या दर्जामुळे खूप मदत होईल. मराठीचे गोमटे व्हायला अभिजात दर्जा गती देईल.
राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना दुर्गा भागवतांनी म्हटले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. मराठी संस्कृतोद्भव नाही. ती संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे.
एखादी भाषा मरते तेव्हा एक संस्कृती संपते. तिच्या निर्मिती आणि संवर्धनासाठी शेकडो वर्षे लाखो लोक राबलेले असतात. मराठी शाळांचा दर्जा चांगला नसतो, अशी टीका केली जाते. मराठी शाळांचा दर्जा वाढवायला हवा याबाबत दुमत नाही. मात्र महाराष्ट्रात ज्या दिवशी बुद्धिजीवी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाने मराठीचे बोट सोडले, त्या दिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.
ज्यांनी ज्ञाननिर्मिती केली, देश समृद्ध केला असे बहुतेक सर्व जण मातृभाषेतून शिकलेले आहेत. परममहासंगणक बनवणारे विजय भटकर, मोबाइलची क्रांती घडवून आणणारे सत्यनारायण गंगाराम पित्रोदा, महान शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, वसंत गोवारीकर, माधव गाडगीळ, ज्ञानपीठ विजेते खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी सावंत, तेंडुलकर, सुर्वे, एलकुंचवार, यशस्वी सनदी अधिकारी शरद जोशी, माधव गोडबोले, माधव चितळे, स. गो. बर्वे, राम प्रधान, ज्ञानेश्वर मुळे ते भूषण गगरानी हे सारेच मातृभाषेतून शिकलेले आहेत.
(समन्वयक, मराठी भाषा समिती)