प्रेरणा देणाऱ्या लेखक-प्रकाशकाची गोष्ट

By admin | Published: June 25, 2017 01:33 AM2017-06-25T01:33:11+5:302017-06-25T01:33:11+5:30

मराठी प्रकाशकांबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते याचं कारण त्यांची उदासीनता असावी. त्याचबरोबर त्यांच्या

Inspiring writer-publisher's story | प्रेरणा देणाऱ्या लेखक-प्रकाशकाची गोष्ट

प्रेरणा देणाऱ्या लेखक-प्रकाशकाची गोष्ट

Next

- रविप्रकाश कुलकर्णी
मराठी प्रकाशकांबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते याचं कारण त्यांची उदासीनता असावी. त्याचबरोबर त्यांच्या आप्तेष्टांनादेखील यासंबंधात काही सांगावेसे वाटत नसावे. म्हणून तर मराठी प्रकाशकांची चरित्रे-आत्मचरित्रे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी अल्प दिसतात. या पार्श्वभूमीवर दिलीपराज प्रकाशनचे संस्थापक प्रा. द.के. बर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने (जन्म - २१ आॅगस्ट १९१७, मृत्यूू २४ डिसेंबर १९८१) त्यांचा सहवास लाभलेल्यांनी त्यांच्या आठवणी, कामगिरीची माहिती दिली. तो स्मृतिग्रंथ ‘कल्पवृक्षाच्या छायेत’ नावाने दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केला आहे. त्याचे स्वागत करायला हवे.
बेळगावमधील स्वत:चा वाडा, वडिलांचा बी-बियाणं आणि तेलाचा प्रस्थापित व्यवसाय याकडे पाठ फिरवून केवळ शिक्षण व साहित्याच्या वेडापायी द.के. पुण्याला आले. धडपड करत शिकले आणि शिक्षकी पेशात शिरल्यानंतर ज्ञानदानाबरोबरच मुलांसाठी - बालवाचकांसाठी ते लिहू लागले. इतरांना लिहिण्यासाठी प्रेरित करू लागले. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील चढ-उतार, मान-अपमान होत असतानाच बालवाचकांसाठी प्रत्यक्ष प्रकाशन हा वसा मात्र त्यांनी सोडला नाही. जिद्दीने त्याबाबत ते ठाम राहिले. एवढेच नव्हे तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा उजवा हात निकामी झाला तर त्यांनी डाव्या हाताने लिहायची सवय केली.
फुलराणी, बोलका मासा, चंद्रावर ससा, वाघाची मावशी, बासरीची जादू अशी लहानांसाठी पुस्तके लिहितानाच त्यांनी डॉ. पोटफोडेसारख्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रयोगक्षम एकांकिका लिहिल्या. हे सर्व साहित्य महाराष्ट्रभर वितरित व्हावे म्हणून वणवण केली. ‘मज्जाच मज्जा’, ‘च्याऊ माऊ’सारखे लहान मुलांसाठी दिवाळी अंक काढले. या लेखनातले एक वेगळेपण म्हणजे एक पुस्तक त्यांनी आपल्या ५ - ६ वर्षांच्या मुलाला अर्पण केले. तसेच दुसरे पुस्तक या मुलाच्या लाडक्या मन्यास म्हणजे त्याच्या मांजरीला अर्पण केले आहे.
सुदैवाने हाच मुलगा त्यांच्या प्रकाशन व्यवसायात हातभार लावायला पुढे आला आणि त्याने या व्यवसायात जी मुसंडी मारली, इतकी की त्याचे नाव झाले. हा मुलगा प्रकाशन व्यवसायात राजू बर्वे नावाने ओळखला जातो. ज्याने आतापर्यंत दोन हजारांच्यावर पुस्तके प्रकाशित आणि वितरित केली आहेत. प्रकाशनाचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतर केले आहे.
राजू बर्वे यांचा वडिलांच्या बाबतीत भक्तिभाव आजही कायम किती असावा? प्रकाशित होणारे प्रत्येक पुस्तक ते आधी वडिलांच्या फोटोसमोर ठेवतात आणि मगच ते विक्रीसाठी पाठवले जाते.
प्रा. द.के बर्वे यांनी निवृत्तीनंतर प्रही, पंचवेडी, पोकळी अशा कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्याकडे नव्या वाचकांचे लक्ष जावे म्हणून राजू बर्वे यांनी जन्मशताब्दीनिमित्ताने त्याच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत.
या स्मृतिग्रंथात द.के. बर्वे यांच्या मुलाने दिलीप बर्वे यांनी एक आठवण सांगितली आहे. त्याकडे लक्ष वेधणे महत्त्वाचे आहे. घरात वडिलांना सगळे ‘भाऊ’ का म्हणतात, ‘बाबा’ का म्हणत नाहीत, असे त्याने आईला विचारले. तेव्हा आईने म्हटले, ‘‘तुझे बाबा लेखक आहेत. मराठीतले प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर त्यांचे आदर्श आहेत. त्यांना ते फार मानतात. वि. स. खांडेकरांना अनेक जण भाऊसाहेब खांडेकर म्हणून ओखळतात. त्यांच्या प्रेमापोटी तुझ्या बाबांना असं वाटतं की, त्यांनाही सगळ्यांनी ‘भाऊ’ म्हणून ओळखावं.
‘भाऊ’ बर्वे यांची खांडेकरांबरोबर नक्कीच गाठभेट झाली असणार. त्यासंबंधात इथे पुस्तकात आठवण असती तर किती चांगले झाले असते. या स्मृतिग्रंथाच्या संपादिका आणि भाऊंच्या स्नुषा मधुमिता बर्वे यांनी याबाबत विचार करावा.
भाऊंचा नातू शार्वेय याची एक आठवण बोलकी आहे. तो सांगतो, त्यांची चॉकलेटी रंगाची चामड्याची बॅग होती. सदैव त्यांच्या हातातील मोठ्या फायलीच्या आकाराची, चामड्याच्या दोन मुठी आणि चेन असलेली अशी ही बॅग मी नंतर अनेकांच्या हातात बघितली पण लहानपणी - खरं तर अजूनही - ही बॅग म्हणजे ‘भाऊंची बॅग’ असं माझ्या डोक्यात पक्क बसलं.’
द. के. बर्वे या लेखक-प्रकाशकाबद्दल आणि त्यांच्या प्रेरणेतून उभं राहिलेलं जग पाहून नक्कीच त्याबाबत उत्कंठा वाढेल.
आठवणी म्हणून लिहायच्या असतात.

Web Title: Inspiring writer-publisher's story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.