... त्याच 'त्या' खिचडीऐवजी चिक्की, चिवडा, राजगिरा लाडू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2023 12:36 IST2023-03-24T12:31:58+5:302023-03-24T12:36:48+5:30
नवा पोषण आहार ठरवत असताना दर्जेदार कच्चा माल, पुरेसा निधी याबरोबरच पोषणाचे नाते विविध चवींशी कसे जोडता येऊ शकेल, याचाही विचार व्हायला हवा!

... त्याच 'त्या' खिचडीऐवजी चिक्की, चिवडा, राजगिरा लाडू!
- स्नेहल बनसोडे-शेलुडकर
(‘संपर्क’ या लोककेंद्री संस्थेच्या सदस्य info@sampark.net.in लेखातील आकडेवारी संकलनासाठी संपर्क संस्थेच्या मीनाकुमारी यादव यांनी मदत केली आहे.)
मुलांनी उत्तम अभ्यास करावा, चांगली शैक्षणिक कामगिरी करावी, असं वाटत असेल तर पोटं रिकामी असून कसं चालेल? भरल्या पोटीच मुलांचा अभ्यासातला रस वाढेल, शाळेतली उपस्थितीही टिकेल, या उद्दिष्टाने सुरू करण्यात आलेली ही शालेय पोषण आहार योजना.
या योजनेतंर्गत सध्या महाराष्ट्रातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० कॅलरीज तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० कॅलरीज मिळाव्यात, अशी तरतूद आहे. वर्षातले किमान दहा महिने आणि आठवड्याचे किमान सहा दिवस हा ताजा पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळावा, अशी तरतूद आहे. यात आठवड्याभरात काय आणि कसं द्यावं याच्याही काही मार्गदर्शक सूचना आहेत, ज्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार- खिचडी/ आमटी भात/ वरण-भात/ सांबार-भात तर मंगळवार, गुरुवार शनिवार- हरभरा/ वाटाणा/ मटकी उसळ आणि भात असं नियोजन असतं. सोबत पूरक आहार म्हणून आठवड्यातून एकदा उकडलेली अंडी/ सोयाबीन बिस्कीट/ केळी/ गूळ शेंगदाणा चिक्की/ चिरमुऱ्यांचा चिवडा किंवा राजगिऱ्याचा लाडू अशीही तरतूद आहे.
यात पहिली ते पाचवीसाठी प्रति दिवशी प्रति विद्यार्थी- २ रू. ६८ पैसे शासकीय अनुदान, सहावी ते आठवीसाठी प्रति दिवशी प्रति विद्यार्थी ४ रू. २ पैसे शासकीय अनुदान मिळतं. मात्र यात वर उल्लेख केलेल्या पूरक आहारासाठी खास वेगळी तरतूद नाही. शिवाय हा आहार शिजवण्याचं कंत्राट महिला बचत गट अथवा स्थानिक स्वयंसेवी संस्थांना देण्यात येतं. त्यांना आधी १५०० रुपये प्रतिमहिना मानधन मिळायचं, ते ९ फेब्रुवारी २०२३च्या शासन निर्णयानुसार आता २५०० रूपये प्रतिमहिना मिळणार आहे. मात्र, ते एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. याशिवाय एखाद्या सण, उत्सवानिमित्त प्रासंगिक मेजवानीही मुलांना देता येईल. मात्र, हे ऐच्छिक असून, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, शिक्षक यांच्या संमतीने ठरेल.
आता या सगळ्या बाबतीत ठेकेदाराकडून आलेल्या कच्च्या मालाचा ढासळता दर्जा, मूळचा पोषण आहार बनवायलाच पैसे न पुरल्याने उकडलेली अंडी किंवा चिक्की यासारखा, वाढत्या वयाच्या मुलांना खरोखर उपयुक्त ठरेल असा पूरक आहार कुठून द्यायचा आणि रोजरोज त्याच चवीची खिचडी, वरण-भात खाऊन कंटाळणारी मुलं या अडचणी शिक्षक- प्रशासनासमोर आहेत. म्हणूनच नव्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत फक्त खिचडी किंवा वरण-भाताऐवजी स्थानिक पदार्थ, तृणधान्यं- भाज्या यांचा समावेश करून विद्यार्थ्यांना आवडतील अशा नवीन पाककृती तयार करण्यासाठी महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, पोषणतज्ज्ञ डॉ. अर्चना ठोंबरे यांच्यासह आहारतज्ज्ञ, हॉटेल मॅनेजमेंट तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात आली आहे.
पोषक पाककृती शोधण्याबाबतीत ‘संपर्क’ संस्थेने ‘शिदोरी’ हा उपक्रम दोन वर्षांपूर्वी हाती घेतला. कोविडकाळात जेव्हा ताजा शिजवलेला आहार मिळणं बंद होतं आणि कोरडा शिधाच घरपोच पोहोचवला जायचा तेव्हा या कोरड्या शिध्यातले मोजके पदार्थ, सहज उपलब्ध होणाऱ्या स्थानिक भाज्या- फळं, मसाले यांचा वापर करून पोषक आणि चविष्ट पाककृती कशा बनवाव्यात, याच्या कल्पना अंगणवाडीताईंनी आणि ‘मुंबई स्वयंपाकघर’ या फेसबुक ग्रुपवरील उत्साही सदस्यांनी शेअर केल्या होत्या. सुमारे १२५ हटके पदार्थ यात आले असून, ज्वारीच्या पौष्टिक नूडल्स, बाजरीची खिचडी, शेवग्याचा पाला घालून केलेले दोसे, नागलीचं सूप, कुळथाच्या पाटवड्या, राजगिरा गाठोडी असे साध्या सामग्रीतून बनणारे चविष्ट पदार्थ त्यात आहेत. यापैकी काही पदार्थ कसे बनवावे, याचे व्हिडीओही शिदोरी उपक्रमातंर्गत तयार केले गेले आहेत.
नवा पोषण आहार कसा असावा, हे ठरवत असताना दर्जेदार कच्चा माल, पुरेसा निधी, मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी याचसोबत ‘शिदोरी’सारख्या उपक्रमातून एकत्रित झालेल्या पोषक पदार्थांचा विचार संबंधित आवर्जून करतील, ही आशा.