राज ठाकरे, कुणाचा तरी पोपट का होताय?

By संदीप प्रधान | Published: March 21, 2019 12:53 PM2019-03-21T12:53:37+5:302019-03-21T12:57:44+5:30

मनसेचा मतदार हा सुशिक्षित आहे. त्यामुळे कुणालाही मत द्या, पण मोदी-शहा यांना देऊ नका हे सांगणे त्यांच्या पचनी पडणार नाही.

Instead of supporting congress ncp, Raj Thackeray should think to contest Lok Sabha Election 2019 | राज ठाकरे, कुणाचा तरी पोपट का होताय?

राज ठाकरे, कुणाचा तरी पोपट का होताय?

Next
ठळक मुद्देराज यांनी स्वत: एखाद्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला हरकत नव्हती.आपल्या निर्णयाचा ज्याला कुणाला फायदा व्हायचा त्याला होऊ द्या हे राज यांचे विधान तर त्याहून घातक आहे. 

>> संदीप प्रधान

आपल्या अचूक राजकीय टायमिंगकरिता ओळखले जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चक्रव्यूहात सापडले असून त्यातून त्यांची सुटका होणे तूर्त कठीण दिसत आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यामुळे देश संकटात सापडला आहे. ही जोडगोळी राजकीय क्षितिजावरुन दूर व्हायला हवी. त्यांना हरवणे हेच मनसेचे धोरण आहे. भाजपाचे उमेदवार पाडायचे आहेत. त्यासाठी प्रचार करायचा असून त्याचा ज्याला फायदा व्हायचा त्याला होऊ दे. याकडे लक्ष देऊ नका, अशी असंबद्ध, गोंधळलेली भूमिका राज यांनी घेतली आहे. कुठल्याही लोकशाही देशात एखाद्या व्यक्तीला किंवा पक्षाला पराभूत करायचे तर त्याकरिता निवडणूक हीच प्रक्रिया आहे. हुकुमशाही देशात उठाव करुन मान्य नसलेल्या नेत्याची हत्या करुन त्याला सत्तेवरुन दूर करण्याची पद्धत आहे. त्यामुळे राज यांची इच्छा मोदी यांना पराभूत करण्याची असेल तर त्याकरिता त्यांनी निवडणूक लढवायला हवी होती. लोकसभेच्या किमान एक किंवा दोन जागा लढवून तेथे भाजपा उमेदवाराचा पराभव करुन प्रतिकात्मक स्वरुपात का होईना मोदी-शहा यांना आपण पराभूत केले हा संदेश द्यायला हवा होता. कदाचित त्याकरिता राज यांनी स्वत: एखाद्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला हरकत नव्हती. (यापूर्वी राज यांनी शहरभर पोस्टर लावून ‘मला आपल्याशी बोलायचे आहे’, असे आवाहन करीत घेतलेल्या जाहीर सभेत आपण २०१४ ची निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली होती) यावेळी राज स्वत: रिंगणात उतरले असते तर मनसैनिकांचे मनोबल वाढले असते. कदाचित सध्या राज यांना आपली करंगळी पकडायला दिलेल्या शरद पवार यांनी पार्थ पवारकरिता माघार घेतली, तशी राज लढवत असलेल्या लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला माघार घ्यायला लावली असती. त्यामुळे कदाचित तो मतदारसंघ शिवसेनेला सोडून भाजपाने चाणक्यनितीचे दर्शन घडवले असते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ज्यांचाही मोदी-शहा दुकलीवर तेवढाच रोष आहे) यांनी मोदी-शहा यांची लढाई आपण का लढायची असा विचार करून राज यांच्याशी कडवी झुंज दिली नसती. समजा शिवसेनेनी कडवी झुंज द्यायचे ठरवले असते आणि थेट आदित्य ठाकरे (ज्यांची निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करण्याची तीव्र इच्छा आहे) यांना उतरवून संपूर्ण ताकद लावली असती तरी त्या मतदारसंघातून कुणीतरी ठाकरे आडनावाचा माणूस दिल्लीत गेला असता. ज्याने मोदी-शहा विरोध प्राणपणाने जपला असता. त्यामुळे आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही ही राज यांची भूमिका हा शुद्ध वेडगळपणा असून कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रकार आहे. आपल्या निर्णयाचा ज्याला कुणाला फायदा व्हायचा त्याला होऊ द्या हे राज यांचे विधान तर त्याहून घातक आहे. 

मनसेचा मतदार हा सुशिक्षित आहे. त्याने डोळसपणे राज यांना यापूर्वी मते दिलेली आहेत. त्यामुळे त्याला यावेळी कुणालाही मत द्या, पण मोदी-शहा यांना देऊ नका हे सांगणे पचनी पडणार नाही. पुलवामा येथील हल्ला सरकारने घडवून आणला हे राज यांचे विधान त्यांच्या शहरी मध्यमवर्गीय मतदारांना रुचलेले नाही. हा मतदार दुरावल्याचाच फटका राज यांना पाच वर्षांपूर्वी बसला. आता अशी बेलगाम विधाने करून व कुणालाही मत द्या पण मोदींना देऊ नका, अशा भूमिकेमुळे आणखी दुरावणार आहे. ‘ठाकरे’ या माणसाच्या प्रेमाखातर मत देणारी व्यक्ती ही काँग्रेसविरोधक आणि बहुतांशी हिंदुत्ववादी असते. आता त्या मतदाराला मोदींना पाडण्याकरिता यावेळी काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला मत द्या, असे सांगणे म्हणजे लता मंगेशकर यांचे गाणे ऐकू नको किंवा सचिन तेंडुलकरचे क्रिकेट पाहू नको, असे सांगण्यासारखे आहे.

राज ठाकरे हे बारामतीचा पोपट असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली व त्यावर त्यांनी ठाकरी शैलीत पलटवार केला. मात्र गेल्या काही महिन्यांत विशेष करून शरद पवार यांची पुण्यात जाहीर मुलाखत घेतल्यापासून पवार-राज यांची जवळीक नजरेत भरण्यासारखी आहे. शरद पवार हे तर राज यांच्यापेक्षा अडचणीत आहेत. त्यांचे साथीदार त्यांना सोडून भाजपात जात आहेत. पवार कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला आहे. पवार यांचे कट्टर विरोधक प्रकाश आंबेडकर हे त्यांना दाऊदच्या शरणागतीवरून लक्ष्य करीत आहेत. अशा परिस्थितीत पवार यांना जे बोलता येत नाही, करता येत नाही ते करण्याकरिता कुणाची गरज आहे. सध्या ती गरज राज पूर्ण करीत आहेत. पवार यांनी यापूर्वी असे अनेक नेते आपल्या स्वार्थाकरिता वापरले, याचा मोठा इतिहास आहे. कालांतराने हे असे वापरून घेतलेले नेते पवारांचे कट्टर विरोधक म्हणून फिरत राहिले. मात्र इतरांनी कायम त्यांच्याकडे संशयाने पाहिल्याने ते राजकारणात संपून गेले. पवार यांना त्यांचा पक्ष एकसंध ठेवायचा तर येनकेन प्रकारेण सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात भाजपा बहुमतापासून दूर राहिला आणि रालोआला अधिकाधिक घटक पक्षांची गरज लागली. अशावेळी पवार क्षणाचाही विलंब न लावता त्या सरकारमध्ये आपले दोन-पाच खासदार घेऊन सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समजा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार येत असेल तर त्यात पवार हे असतीलच. तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीचे सरकार येत असेल तर त्या सरकारमध्येही पवार आपला रुमाल टाकून ठेवतील. त्यामुळे समजा पवार यांनी कुठलाही मार्ग पत्करुन सत्ता मिळवली तर त्याक्षणी राज यांची गरज त्यांच्यासाठी संपलेली असेल. त्यामुळे राज यांचा भ्रमनिरास होऊ शकतो. 

२००९ च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज यांचा शिवसेनाविरोध नेमका वापरून महाराष्ट्रात काँग्रेसचे यश पक्के केले. किंबहुना महाराष्ट्रात राज ठाकरे व आंध्र प्रदेशात चिरंजीवी यांच्या प्रजा राज्यम पक्षाने काँग्रेसला लोकसभेत पुन्हा सत्ता मिळवून दिली. राज यांचा फटका त्यावेळी भाजपालाही बसला होता. कधी बारामतीचा तर कधी नांदेडचा पोपट, अशी संभावना आपण का करुन घ्यायची, याचा विचार आता पक्ष स्थापन करुन दशक उलटून गेल्यावर राज यांनी करणे गरजेचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा उल्लेख ‘वसंतसेना’ (वसंतराव नाईक यांच्या हातातले बाहुले असलेली सेना) असा केला जात होता. राज हे भाषणात शेलक्या शब्दांतील टिप्पण्या करण्यापासून नकला करण्यापर्यंत अनेक बाबतीत आपल्या काकांचे अनुकरण करतात. परंतु याचा अर्थ आपल्या मनसेनेची ‘शरदसेना’, ‘अशोकसेना’ किंवा ‘देवेंद्रसेना’ करून याही बाबतीत काकांचे अनुकरण करण्याची गरज नाही. बाळासाहेबांनी ज्या गोष्टी २५ ते ३० वर्षांपूर्वी केल्या त्याच आज जशाच्यातशा करुन चालणार नाहीत हे ज्या दिवशी राज यांना उमजेल तेव्हा त्यांचा पक्ष त्या नात्याच्या ओझ्यातून मुक्त होऊन स्वच्छंद भरारी मारील.

राज ठाकरे यांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश देण्याची आवई उठवून पवार यांनी शिवसेनेच्या आक्रमकतेला लगाम घातला. कारण राज यांना आघाडीत स्थान मिळाले व त्यांना एक-दोन जागा दिल्या गेल्या तर राजकीयदृष्ट्या कमकुवत मनसेचे पुनरुज्जीवन होईल. त्यावेळी जर शिवसेना भाजपाबरोबर युतीत लढली नाही व तिच्या जागा घटल्या तर राजकीय कोंडी होईल हे हेरून मनसेच्या जिवंत होण्याच्या भयाने उद्धव यांनी नाईलाजाने भाजपाचा हात धरला. त्यामुळे पवार यांनी ही आवई उठवून भाजपाला अप्रत्यक्ष मदत केली किंवा कसे हाही बारकाईने अभ्यास करण्याचा विषय आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विधानसभा निवडणुकीतील गणिते अवलंबून आहेत. पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली रालोआ सत्तेत आली तर भाजपा-शिवसेनेचा संसार सुरु राहील. लोकसभा निवडणुकीत परस्परविरोधी राजकारण केले तर युतीमधील हे पक्ष विधानसभेकरिता पुन्हा परस्परांवर आरोप प्रत्यारोप करीत विरोधात उभे राहतील. तीच गोष्ट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधांची आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत आली तर राष्ट्रवादी काँग्रेस मुकाट्याने विधानसभेला साथ देईल. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा विचार करील. युती-आघाडीच्या थेट लढतीत राज यांच्यासारख्या एकांड्या शिलेदारांना आपली लढाई आपणच लढायची आहे. त्यामुळे कुणाचा तरी पोपट होऊन अपमानित होण्यापेक्षा निवडणुकीच्या रिंगणात खंबीरपणे पाय रोवून उभे राहणे व वेळप्रसंगी पराभूत होणे हाच योग्य पर्याय आहे. या चक्रव्यूहातून राज यांनी वेळीच सहीसलामत बाहेर पडावे हेच योग्य.

Web Title: Instead of supporting congress ncp, Raj Thackeray should think to contest Lok Sabha Election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.