मुलांसाठी विमा : नो, नाय, नेव्हर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:15 AM2021-04-27T00:15:17+5:302021-04-27T00:15:43+5:30
माझा पाच वर्षांचा मुलगा आहे, त्याच्यासाठी लाइफ इन्श्युरन्स पॉलिसी? घेऊ का? - असा प्रश्न एका बाईंनी मला विचारला. मुलगा ...
माझा पाच वर्षांचा मुलगा आहे, त्याच्यासाठी लाइफ इन्श्युरन्स पॉलिसी? घेऊ का? - असा प्रश्न एका बाईंनी मला विचारला. मुलगा पाच वर्षांचा, त्याच्यासाठी कशाला हवी पॉलिसी? माझं स्पष्ट उत्तर, नो- नाय -नेव्हर-नाही!
कशाला हवा लहान मुलांचा इन्श्युरन्स? केवळ कुणीतरी तुम्हाला फायदे सांगतं, शंभरदा फोन करतं, तुम्हाला वाटतं आपल्या मुलांना सिक्युरिटी आहे म्हणून तुम्ही घेता पॉलिसी, हप्ते भरता; पण त्याची गरज आहे का? तर याचं एका शब्दात उत्तर आहे की, नाही.
आता तुम्ही विचाराल का नको?- त्याची ही काही सोपी कारणं..
१. मुलं कमवत नाहीत : जीवनविम्याचा हेतू काय की जो घरात रोजीरोटी आणतो, त्याला काही झालं तर त्याच्या मागे कुटुंबाला आधार म्हणून काही रक्कम पर्यायी यावी. सुरक्षित रहावी. छोट्या मुलांचा सर्व खर्च पालक करतात, त्यांच्या गरजा पुरवतात, ते स्वत: काही कमवत नाहीत. त्यांच्यावर कुणी आर्थिकदृष्ट्या अवलंबून नाही. तर मग उगीच कशाला हवा विमा?
२. विमा एजंट खूप कॉल्स करतात : करू देत. ते त्यांची गोष्ट विकतात. त्यात तुमचा फायदा काहीच नाही. ते तुमच्या असुरक्षिततेला हाका मारतात. तुम्ही असुरक्षित वाटून घ्यायचं काय कारण? वाटतच असेल तर तुमचा स्वत:चा मोठ्या रकमेचा विमा उतरवा. मुलाच्या विम्यापोटी पैसे खर्च करण्याचं काय कारण? जेवढे कॉल्स जास्त, तेवढी आपल्याला गरज नाही असं समजा..
३. युलीप : हे गुंतवणुकीचे गरीब माध्यम चाइल्ड पॉलिसीच्या नावाखाली ते विकलं जातं, पण त्याचा गुंतवणूक म्हणून काही फार फायदा नाही. उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणून अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, मग चाइल्ड पॉलिसी कशाला?
४. वाईट गिफ्ट : मूल तीन-चार वर्षांचं असताना तुम्ही विमा घेतला, मूल २२ वर्षांचे होईतो हप्ते भरले, तरी त्याचा परतावा कमी मिळतो. त्यापेक्षा त्या रकमेचे योग्य शेअर्स, एसआयपी केल्या तर अधिक लाभ होऊ शकेल. अगदी काहीच नाही तर मुलाच्या नावाने पीपीएफमध्ये पैसे ठेवले तरी त्यापेक्षा जास्त व्याज परतावा मिळू शकेल.
५. मग कुणी घ्यावा मुलांसाठी विमा? जे बालकलाकार असतात, लहान वयात जी मुलं कमावतात, खेळाडू म्हणून चमकू लागतात, त्यांच्या पालकांनी जरूर घ्यावा विमा. मात्र तसं तुमचं मूल आहे का हे पहा ! विम्यात पैसे केवळ मनातली असुरक्षितता म्हणून गुंतवू नयेत.