बुद्धीचं वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:57 AM2018-03-10T00:57:29+5:302018-03-10T00:57:29+5:30
विश्वाच्या पसा-यात मानवाला महत्त्व कशामुळे आहे? हा प्रश्न मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. अन्य योनीमध्ये जे नाही ना ते मानवामध्ये आहे. इतर जीव आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच स्तरावर जगतात. मानव यापेक्षा वेगळा आहे. त्याला ‘बुद्धीचं वरदान’ भगवंतानं प्रदान केलेलं आहे. त्यासमवेत ‘मन’देखील दिलं!
- कौमुदी गोडबोले
विश्वाच्या पसा-यात मानवाला महत्त्व कशामुळे आहे? हा प्रश्न मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. अन्य योनीमध्ये जे नाही ना ते मानवामध्ये आहे. इतर जीव आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच स्तरावर जगतात. मानव यापेक्षा वेगळा आहे. त्याला ‘बुद्धीचं वरदान’ भगवंतानं प्रदान केलेलं आहे. त्यासमवेत ‘मन’देखील दिलं! मनामुळे माणूस विशेषपणानं ओळखला जातो. त्याचप्रमाणे बुद्धीमुळे तो प्रगतीपथावर आहे. त्याने संशोधन करून अनेक क्षेत्रामध्ये शोध लावले आहेत.
बुद्धीच्या देणगीमुळे तो इतर प्राण्यांपेक्षा उच्च दर्जाचं जीवन जगू शकतो आहे. स्वत:ची नैसर्गिक, सामाजिक, उन्नती करून घेऊ शकतो आहे. संरक्षण, संवर्धन करून सुसंस्कारित समाज घडवू शकतो आहे. तो आकाशात उंच भरारी घेऊन आकाशाला स्पर्श करतो. देहाला आराम मिळण्यासाठी विविध वस्तूंची निर्मिती करतो. बुद्धीच्या जोरावर जगावर अधिराज्य गाजविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो. निसर्गाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यांमध्ये भगवंतानं दिलेल्या बुद्धीचा सुयोग्य उपयोग करण्याची विस्मृती होते.
कुबुद्धी-दुर्बुद्धी प्रबळ होते. सुमती कुमती होऊन जाते. संपत्ती, सत्तेची लालसा त्याला पथभ्रष्ट करते. यामुळे द्वेष, मद, मत्सर प्रबळ होतात. यामधूनच लोभ, क्रोध अनावर होतात. वासना, विकार, विकृतीच्या विळख्यात स्वत:समवेत अनेकांना अडकवतो. ‘काम’ इतका बळावतो की माणूस माणुसकी विसरून जातो. श्वापदाप्रमाणे वर्तन करतो. प्रगती, उन्नती दूर राहते. अधोगतीचा वेग वाढत जातो. अशा ढाळसलेल्या, कोसळलेल्या मानवाला पुनश्च सुयोग्य मार्गावर आणण्यासाठी ‘संत’ ‘विभूती’ अवतार घेतात. सद्बुद्धी प्राप्त होऊन सन्मार्गावर राहण्यासाठी भगवंताच्या भक्तीचा सुंदर मार्ग दाखवतात. स्वआचरणातून समाजाला घडवण्यासाठी सदैव झटतात. सुंदर, सात्विक विचारांचा सुगंध दरवळण्यासाठी कुबुद्धीला भगवंताकडे वळवतात. मग बुद्धीमध्ये अनुकूल बदल घडून येतो. प्रत्येक माणसानं भगवंतानं दिलेल्या बुद्धीचा सुयोग्य पद्धतीनं उपयोग करण्याची आवश्यकता आहे. आपल्या बुद्धीला सदैव सतेज, सात्विक ठेवण्यासाठी भगवंताच्या नित्य स्मरणाची सवय लावणं गरजेचं आहे. भगवंताच्या प्रति ‘कृतज्ञ भाव’ ठेवला की बुद्धीमध्ये बिघाड होण्याचं भय उरत नाही.
संत सर्वश्रेष्ठ असून देखील ते भगवंताकडे ‘सद्बुद्धीचं दान’ मागतात. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांनी कळवळून भगवंताला ‘सुयोग्य बुद्धीचं मागणं’ नको का मागायला?