बारामती वाड्यावरचं बौद्धिक
By राजा माने | Published: December 25, 2017 02:35 AM2017-12-25T02:35:40+5:302017-12-25T02:35:47+5:30
रेशीमबागच्या बौद्धिकाला इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर आमचा यमके (एम.के. अर्थात मनकवडे) ला देखील प्रवेश मिळाला नव्हता... त्यात आता बारामती वाड्यावरचं बौद्धिक त्याच्या नशिबी रिपोर्टिंगसाठी आलं!
रेशीमबागच्या बौद्धिकाला इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर आमचा यमके (एम.के. अर्थात मनकवडे) ला देखील प्रवेश मिळाला नव्हता... त्यात आता बारामती वाड्यावरचं बौद्धिक त्याच्या नशिबी रिपोर्टिंगसाठी आलं! या बौद्धिकाला पवारसाहेबांनी मराठीभूमीतील निवडक प्रस्थापितांनाच निमंत्रण धाडलेलं होतं... यमकेनं थेट पवारसाहेबांनाच गळ घालून प्रवेश मिळविला. ‘रिझल्ट ओरिएंटेड’ रिपोर्टिंग इंद्र दरबारी पोहोचविण्याच्या अटींवर साहेबांनी त्याला बौद्धिकाला प्रवेश दिला. बौद्धिक सभास्थानी अजितदादांपासून जितेंद्रभाऊपर्यंतचा नेहमीचा यशस्वी एकही चेहरा दिसत नव्हता. उपस्थित समस्त प्रस्थापितांचे बौद्धिक घेण्यासाठी पूजनीय अडवाणी, राळेगणचे अण्णा, खान्देशचे नाथाभाऊ आणि सुरेशदादा, विदर्भातून पटोल्यांचे नाना यासारखी दिग्गज मंडळी येणार असल्याचे निमंत्रितांना सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात बौद्धिकाची प्रार्थना झाली आणि स्टेजवर फक्त पवारसाहेबच अवतरले! हे पाहून उपस्थित प्रस्थापित विचलित झाले व कुजबूज करू लागले. साहेबांनी माईकचा ताबा घेतला आणि बोलते झाले...
पवारसाहेब : प्रस्थापित मित्रांनो, देशाच्या आणि राज्याच्या भविष्याबद्दल मंथन व्हावे या उद्देशाने तुम्हाला या ठिकाणी बोलावले आहे. (भविष्य हा शब्द ऐकताच पुण्यातून आलेला एक गट चवताळून उठला आणि त्यातील हर्षवर्धन बोलू लागले...)
हर्षवर्धन : साहेब, आपल्या पुण्याचे खा. काकडे महाराज भविष्यवाले असताना भविष्याची चर्चा आपण कशाला करायची?
पवारसाहेब : हर्षवर्धन भाऊ, त्यांच्या भविष्याचा फायदा नरेंद्रभाऊ आणि देवेंद्रपंतांना होईल. पण, पुण्याचे म्हणून तुम्ही-आम्ही काकडे महाराजांना हात दाखवूनच घेऊ!
हा संवाद चालू असतानाच नाथाभाऊंची एन्ट्री झाली. त्यांच्यासोबतच्या पाच-सहा जणांनी ‘प्रस्थापित नाथाभाऊंचा विजय असो’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. एवढ्यात निमंत्रण नसताना घुसलेले आ. नितेशही घोषणा देऊ लागले, ‘कुंपणावरील ढेगू-पाटील विखेंचा विजय असो’, ही घोषणाबाजी सुरू असतानाच रावतांच्या संजयची नवजुद्दीन सिद्धीकीसह एन्ट्री झाली. हे चाललेले असतानाच छगनरावांचा विशेष निरोप आल्याने आजचे बौद्धिक उद्यावर ढकलल्याची घोषणा पवारसाहेबांनी केली.