भागवतांचे बौद्धिक, केंद्राला संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:25 AM2017-10-02T01:25:39+5:302017-10-02T01:26:51+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा लक्षात घेता विजयादशमीच्या पर्वावर सरसंघचालकांकडून होणा-या उद्बोधनात सामाजिक मुद्यांवर जास्त भर असतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा लक्षात घेता विजयादशमीच्या पर्वावर सरसंघचालकांकडून होणा-या उद्बोधनात सामाजिक मुद्यांवर जास्त भर असतो. मात्र यंदा सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केलेल्या उद्बोधनाला अनेक राजकीय कंगोरे असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अगदी शेतकरी समस्येपासून देशाची आर्थिक स्थिती, शैक्षणिक बदलांवर भाष्य करणा-या सरसंघचालकांनी आपल्या विशेष शैलीतून केंद्र शासनाला योग्य आणि समर्पक भाषेत संकेत दिले आहेत. वेळीच जागे व्हा, अन्यथा परिणामांना सामोरे जा, ही त्यांच्या बौद्धिकाची अप्रत्यक्ष दिशा होती. सत्ताधा-यांनी या भाषणाचा नेमका काय अन्वयार्थ लावला हे येणारा काळ सांगेलच. मात्र संघधुरिणांना सरसंघचालकांच्या भाषणातील नेमकी तळमळ कळली आहे आणि यावर मंथन होणार, हे निश्चित. सत्ताबदलानंतर झालेला हा चौथा विजयादशमी उत्सव ठरला आणि अगोदरच्या तीनही वेळी सरसंघचालकांनी सरकारची जाहीरपणे पाठच थोपटली होती. अगदी नोटाबंदीच्या मुद्यावरदेखील संघ सरकारच्या पाठीमागे उभा असल्याचे दिसत होते. मात्र यावेळी डॉ. भागवत यांच्यावर जाहीरपणे सरकारला चिमटे काढण्याची वेळ आली. याचाच अर्थ त्यांना भविष्यातील धोका स्पष्टपणे दिसतो आहे हे जाणवले. नोटाबंदीसारखा धाडसी निर्णय राबविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची लोकप्रियता जनसामान्यांमध्ये वाढली होती. मात्र त्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग, विविध पातळ्यांवर सरकारविरोधात उपस्थित होणारे प्रश्न, महागाईचे वाढते शेपूट यामुळे जनतादेखील हैराण झाली आहे. निर्णय धाडसी असला तरी त्याची अंमलबजावणी नीट झाली नाही हे संघातील संघटनांचेदेखील मत बनले. २०१९ ची परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. देशात जर संघाला आपला अजेंडा राबवून घ्यायचा असेल तर या निवडणुकांत २०१४ ची पुनरावृत्ती अत्यावश्यक आहे. मात्र आर्थिक पातळीवर ढासळता आलेख हा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो याची संघाला जाणीव आहे. नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यामुळे शेतकरी कोलमडला आहे. त्यामुळेच वेळ आली तर शासनाने खर्चाचे ओझे उचलावे, मात्र बळीराजाला फायदा होईल असे किमान आधारभूत मूल्य निश्चित करावे, हे त्यांचे भाष्य कोट्यवधी शेतकºयांचे रुदन मांडत होते. या उद्बोधनात सरसंघचालकांनी संघाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरदेखील भाष्य केले. मात्र देशाची दशा आणि त्यांच्या भाषणाची दिशा केंद्राला गंभीरतेने घ्यावी लागणार आहे. सरसंघचालकांचा संकेतार्थ स्वीकारत केंद्र शासन आणि थिंकटँक आता जर शहाणे झाले नाहीत, तर आगामी निवडणुकांत भाजपसमोरील प्रवास निश्चितच मोठ्या अडथळ्यांचा राहू शकतो हे निश्चित.