तत्त्वनिष्ठ, सत्त्वशील आणि विचारगर्भ व्यक्तिमत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 06:19 AM2019-11-09T06:19:29+5:302019-11-09T06:21:42+5:30
अरविंद इनामदार नेहमी प्रेक्षकांची नाडी अगदी सहज पकडत असत
विनायक पात्रुडकर
महाराष्ट्रात आतापर्यंत जितके पोलीस महासंचालक होऊन गेले त्यामध्ये अरविंद इनामदार यांची कारकीर्द नक्कीच ठळकपणे लक्षात राहणारी आहे. त्यांच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. केवळ कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून न वावरता त्यांनी संवेदनशील माणूसपणाची जी भूमिका आयुष्यभर निभावली, त्याला साऱ्या महाराष्ट्रातून सलाम ठोकला पाहिजे. ज्येष्ठ पोलीस अधिकारी इतका साहित्यप्रेमी, दर्दी रसिक, कलासक्त असू शकतो, याचे त्यांच्या चाहत्यांना नेहमी कोडे पडलेले असे. भगवद्गीता, कुसुमाग्रज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अरविंद इनामदारांचे आवडीचे विषय. अर्थात प्रचंड वाचनामुळे आणि वक्तृत्वामुळे ते नेहमी देशभर हिंडत असत. विविध विषयांवर ते अधिकारवाणीने भाषणे करीत. महाराष्ट्रात भाषणे करताना ते स्वत:चा उल्लेख नेहमी पांडू हवालदार असा करीत. स्वामी विवेकानंद असो वा आजच्या तरुणाईला प्रेरणा देणारे व्याख्यान असो.
अरविंद इनामदार नेहमी प्रेक्षकांची नाडी अगदी सहज पकडत असत. त्यांच्यातल्या संवेदनशील माणूसपणामुळेच त्यांचे तात्यासाहेब उर्फ कुसुमाग्रज यांच्याशी सूत जुळले. ते इतके घट्ट ऋणानुबंध होते की, तात्यासाहेबांनी त्यांचा एक कवितासंग्रह अरविंद इनामदारांना अर्पित केला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या गाजलेल्या ‘जाणता राजा’ या प्रयोगाचे ‘एडिटिंग’ इनामदारांनी केले होते. खूप कमी लोकांना याची माहिती आहे. इनामदारांना भेटणे म्हणजे एक मैफल असायची. राज्यातील राजकारणापासून आफ्रिकेतील जंगल सफारीपर्यंत त्यांना कोणताच विषय वर्ज्य नसे. विविध प्रांतांत मुशाफिरी केल्याने त्यांच्या वक्तृत्वाला एक धार आली होती. तरीही ज्या खात्यामध्ये त्यांनी कारकीर्द घडविली, त्या पोेलिसांविषयी त्यांच्या मनात नेहमीच माणुसकीची भावना राहिलेली होती. पोलिसांकडे केवळ एक कठोर प्रशासकीय व्यवस्था म्हणून न पाहता, त्यांच्याकडे एक माणूस म्हणून पाहा. त्यांना शारीरिक आणि मानसिक बळ द्या आणि मगच त्यांच्याकडून कायदे पालनाची अपेक्षा करा, असे त्यांचे ठाम मत असे. पोलिसांच्या ड्युटीविषयी, त्यांना मिळणाºया भत्त्यांविषयी त्यांची आग्रही भूमिका होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू असायचे. निवृत्तीनंतरही त्यांनी या खात्याविषयी कायम ठाम भूमिका घेतली होती. केवळ मत मांडून नव्हे तर त्यांनी ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ या उक्तीनुसार अरविंद इनामदार फाउंडेशन नावाने संस्थाही स्थापन केली होती. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील उत्कृष्ट पोलिसांना, अधिकाऱ्यांना ते पुरस्कारही देत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, उद्योगपती रतन टाटा, इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांच्या हस्ते त्यांनी देखणे कार्यक्रमही पार पाडले. राज्यातील साºया पोलिसांना या पुरस्काराविषयी उत्सुकताही असे.
मुंबई पोलीस दलात सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हे महत्त्वाचे मानले जाणारे पद त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळले. या काळात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाची शानही वाढवली. या काळात मुंबईत गँगवॉर पराकोटीला पोहोचले होते. शहरात अनेक गुन्हेगारी टोळ्या हैदोस घालत होत्या. इनामदार यांनी त्यांच्यावर बºयापैकी नियंत्रण मिळवले. पोलीस दलातील शिस्तीकडे त्यांची करडी नजर असे. पोलीस अधिकाºयांचा बेशिस्तपणा ते अजिबात खपवून घेत नसत. वेळप्रसंगी पोलीस अधिकाºयांची कठोर शब्दांत कानउघाडणीही करीत. ब्रिटिश काळापासूनचे मानाचे समजले जाणारे पोलीस आयुक्तपद भूषवण्याचे प्रत्येक अधिकाºयाचे स्वप्न असते. अनेक महत्त्वाची पदे भूषवणाºया इनामदारांना या पदाने मात्र हुलकावणी दिली. पोलीस महासंचालकपदी गेल्यावर त्यांनी पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पोलीस मॅन्यूअल मराठीत अनुवादित करण्याची त्यांची कामगिरी मोलाची समजली जाते. पोलीस कसा रूबाबदारच दिसला पाहिजे, असे ते नेहमी सांगत. त्यासाठी त्यांनी पोलीस शिपायांची वर्षानुवर्षांची फटिग कॅप बदलून त्याऐवजी पी कॅप आणली. आणखी अनेक बदल करण्याचा त्यांचा मानस असतानाच तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांच्याशी त्यांचे मतभेद झाले. हे विकोपाला जाताच स्वाभिमानी इनामदारांनी मागचापुढचा विचार न करता आपल्या पदाचा राजीनामा देणे पसंत केले. अनेक पोलीस अधिकारी घडवण्याचे काम करणाºया इनामदार यांच्या करारी बाण्याची चर्चा कायमच पोलीस दलात होत राहील. कर्तव्यदक्ष अधिकारी आणि संवेदनशील माणूस याचा सुरेख संगम या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळाला, हे राज्याचे भाग्यच म्हणायला हवे.
( लेखक लोकमत वृत्तसमुहात कार्यकारी संपादक आहेत)