आत्मनाशाची अतर्क्य ओढ

By Admin | Published: March 17, 2017 12:39 AM2017-03-17T00:39:14+5:302017-03-17T00:39:14+5:30

आपल्या मनाप्रमाणे जगता यावे असा हट्ट धरणारे कलावंत आत्मनाशाची अवघड वाट निवडून कडेलोटाच्या दिशेने प्रवासाला निघतात तेव्हा त्यांच्या या वर्तनाला एखाद्या शास्त्राच्या

Intentional obsession of self-destruction | आत्मनाशाची अतर्क्य ओढ

आत्मनाशाची अतर्क्य ओढ

googlenewsNext

प्रल्हाद जाधव
आपल्या मनाप्रमाणे जगता यावे असा हट्ट धरणारे कलावंत आत्मनाशाची अवघड वाट निवडून कडेलोटाच्या दिशेने प्रवासाला निघतात तेव्हा त्यांच्या या वर्तनाला एखाद्या शास्त्राच्या कोंदणात बसवून त्याचे कौतुक करायचे की या वृत्तीचा धिक्कार करायचा हेच कळेनासे होते. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या तालुक्याच्या गावी स्थापन झालेल्या आणि आपल्या नाटक, एकांकिकांनी महाराष्ट्र गाजवणाऱ्या रंगसुगंध या नाट्यसंस्थेचे सदस्य चंद्रशेखर कदम यांचे परवा झालेले अकाली निधन त्याच्या सर्व चाहत्यांना असेच संभ्रमात टाकून गेले. अभिनयाची उत्तम जाण, स्वच्छ वाणी, धाडसी स्वभाव आणि मोत्याच्या दाण्यासारखे हस्ताक्षर असलेले चंद्रशेखर कदम अर्थात चंद्या हयात नाही, ही कल्पनाच त्याच्या चाहत्यांना सहन होण्यासारखी नाही. रंगमंच असो की बॅकस्टेज, ढोरमेहेनत करायची एवढेच चंद्याला माहीत असायचे. केवळ गाजलेल्या नाटकांतील उतारेच नव्हे तर चिं.त्र्यं. खानोलकर यांच्यापासून अरुण कोलटकर यांच्यापर्यंत अनेक मान्यवर कवींच्या कविता त्याला मुखोद्गत होत्या. वरून रांगडा; पण आतून निष्पाप आणि निर्मळ असा चंद्या एक उत्तम सायकलपटूही होता. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा त्याने सायकलने पिंजून काढला होता. ऐंशीच्या दशकात मराठी नाटक सिनेमातून नावारूपाला येत असलेला अभिनेता प्रशांत सुभेदार आणि चंद्या पुण्यात एका लॉजवर एकत्र राहायचे. आकाशवाणीवरील श्रुतिकांपासून व्यावसायिक, प्रायोगिक नाटकात मिळणाऱ्या लहान-मोठ्या भूमिका करत स्ट्रगल करायचे. रा.रं. बोराडे यांच्या आमदार सौभाग्यवती या नाटकाने या दोघांनाही स्थिर होण्यासाठी चांगला हात दिला; पण पुढच्याच डावात नशिबाचे दान उलटे पडले. पैसे काढायला बँकेत गेलेला प्रशांत बँकेत कोसळला तो पुन्हा उठलाच नाही आणि वैफल्यग्रस्त मन:स्थितीत मद्यपानाकडे वळलेला चंद्या त्या पाशातून अखेरपर्यंत सुटलाच नाही. एकेकाळी व्यसनमुक्तीच्या कामासाठी स्वत:ला वाहून घेणारा आणि त्यासाठी गावोगावी जाऊन पथनाट्याचे प्रयोग करणारा चंद्या स्वत:च एका व्यसनाचा बळी ठरावा हा आणखी एक दैवदुर्विलास! चंद्याच्या येथील आयुष्याच्या नाटकावर आता कायमचा पडदा पडला हे खरे आहे; पण काय सांगावे कदाचित त्याला वेगळ्याच विश्वातील एखाद्या अनोख्या नाटकाची तिसरी घंटा ऐकू आली असेल आणि एव्हाना तिकडे झोकदार एन्ट्री घेऊन त्याने आपली भूमिका रंगवायला सुरुवातदेखील केली असेल. कलावंतांच्या या बेबंद वेडेपणाला आत्मनाशाची अतर्क्य ओढ असे म्हणायचे की, अज्ञाताची अनिवार्य हाक हे अशा वेळी कळत नाही, हेच खरे !

Web Title: Intentional obsession of self-destruction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.