आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा खेळखंडोबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:45 AM2020-04-08T05:45:36+5:302020-04-08T05:46:04+5:30
जगभरचे टेनिसप्रेमी ज्या हिरव्यागार कोर्टच्या ‘विम्बल्डन’ची आणि लाल मातीतल्या ‘फ्रेंच ओपन’ची वाट पाहतात त्या स्पर्धेच्या आयोजनावर सध्या पाणी पडले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगाला ग्रासले आहे. कोरोनाबाधितांची संख्या आणि या आजाराला बळी पडणाऱ्यांमध्ये दर मिनिटाला भर पडते आहे. दुसºया महायुद्धानंतरचे जगावर ओढवलेले सर्वांत भीषण संकट असे या महामारीचे वर्णन करावे लागते आहे. वास्तवात या संकटाचे भय दुसºया महायुद्धापेक्षाही मोठे आहे. कारण या महामारीपासून अलिप्त राहण्याची सोयच नाही. ‘लॉकडाऊन’चा निर्णय होण्यापूर्वी, देशोदेशी जाणारी गलबते बंदर बंद करण्याआधी आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे जमिनीवर आणण्यापूर्वीच या अतिसूक्ष्म विषाणूने देशोदेशी स्वत:चे अस्तित्व दाखवून दिले. परिणामी आजचे जग कप्पेबंद झाले आहे. नियोजित आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, परिषदा, सोहळ््यांना खीळ बसली आहे. याचा मोठा फटका क्रीडा क्षेत्राला बसला आहे. दर चार वर्षांनी एकदा होणाºया आॅलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या.
जगभरचे टेनिसप्रेमी ज्या हिरव्यागार कोर्टच्या ‘विम्बल्डन’ची आणि लाल मातीतल्या ‘फ्रेंच ओपन’ची वाट पाहतात त्या स्पर्धेच्या आयोजनावर सध्या पाणी पडले. क्रिकेटविश्वात लोकप्रिय झालेल्या इंडियन प्रीमियर लीगला फटका बसला. आॅस्ट्रेलियात होणाºया टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषक धोक्यात आहे. या महत्त्वाच्या स्पर्धांसह अनेक लहान-मोठ्या क्रीडा स्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. म्हटले तर ही फार मोठी गोष्ट नाही. कारण मुळातच कला, क्रीडा या गोष्टींना मानवी आयुष्यात असणारे स्थान हे पोट भरल्यानंतरचे आहे. ऐसपैस रिकाम्या वेळेत, निवांतपणे आनंद लुटण्याच्या या गोष्टी आहेत. शारीरिक क्षमतेची, ताकदीची, लवचिकतेची सर्वश्रेष्ठता ठरवण्याचा आणि वर्चस्व सिद्ध करण्याचा सभ्य आणि सुसंस्कृत मार्ग म्हणजे खेळ. हे एवढ्यापुरतेच मर्यादित होते तोवरची या स्पर्धांना लागलेली परिमाणे वेगळी होती;
पण जेव्हापासून या क्रीडा स्पर्धा दूरचित्रवाणीच्या पडद्यावरून जगभर पोहोचू लागल्या (अलीकडे तर त्यांचे प्रक्षेपण ‘लाईव्ह’च असते) तेव्हापासून हा मामला निव्वळ मनोरंजनाचा किंवा शारीरिक वर्चस्व सिद्ध करण्यापुरता उरला नाही. प्रेक्षकांची संख्या अमर्याद झाल्याने खेळाचे रूपांतर आस्तेआस्ते इंडस्ट्रीत होत गेले. किती प्रेक्षकांनी सामना दूरचित्रवाणीवरून, आॅनलाईन पाहिला, प्रक्षेपणाचे हक्क किती डॉलर्सला विकले गेले यावर स्पर्धेचे यश मोजले जाऊ लागले. खेळाची लोकप्रियता वाढवणारे ‘स्टार’
खेळाडू या ‘स्पोर्ट्स इंडस्ट्री’चे भांडवल बनले. फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल, क्रिकेट, फॉर्म्युला वन, रग्बी, गोल्फ, बेसबॉल, बुद्धिबळ आणि मुष्टीयुद्ध या दहा खेळांना या इंडस्ट्रीतल्या सर्वांत बड्या कंपन्या म्हणावे लागेल. कारण सर्वाधिक लोकप्रियता आणि पर्यायाने पैसा या खेळांमध्ये आहे. यात सर्वोच्चस्थान द्यावे लागते ते आॅलिम्पिकला. तब्बल दोनशे देश सहभागी होणारी आॅलिम्पिकसारखी
दुसरी कोणतीच स्पर्धा जगाच्या पाठीवर नाही. या स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी दहा-दहा वर्षे आधी तयारी करावी लागते. या तयारीसाठीच कोट्यवधी डॉलर्सचा खर्च केला जातो. आॅलिम्पिक जिंकून क्रीडा इतिहासात स्वत:चे नाव कायमचे कोरण्याचे स्वप्न पाहातच हजारो खेळाडू वर्षानुवर्षे घाम गाळत असतात. एका विषाणूने ‘स्पोर्ट्स इंडस्ट्री’ला जबरदस्त ठोसा लगावला आहे. अनेक
खेळाडूंच्या कारकिर्दीची कधी न भरून निघणारी हानी तर होईलच, शिवाय स्पर्धा खोळंबल्याने आर्थिक नुकसानही सोसावे लागेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे होणाºया पर्यटन-हॉटेल व्यवसायाला धक्का बसतो आहे. वानगीदाखल सांगायचे तर ‘विम्बल्डन’ सुरू असताना स्ट्रॉबेरी आइस्क्रीम आणि वाईन-बियरचे चषकच्या चषक रिते होत असतात. आता ते होणार नाहीत याचा फटका शेतकऱ्यांना बसेल. हीच स्थिती जगभर आहे. दुसºया महायुद्धानंतर प्रथमच जगातल्या ‘स्पोर्ट्स इंडस्टी’चा असा खेळखंडोबा झाला आहे. अर्थात जिथे जगण्याचाच खेळ होऊन बसला आहे, तिथे मैदानी खेळाची तमा कोण करेल! ही स्थिती खिलाडूपणे स्वीकारण्याखेरीज दुसरा पर्यायही खेळ जगतापुढे नाही. चौसष्टपेक्षा जास्त कला आणि त्याहून जास्त क्रीडा प्रकारांनी मानवी आयुष्य समृद्ध केले आहे. संपूर्ण सजीवसृष्टीपासून माणसाचं वेगळेपण अधोरेखित करणाºया गोष्टीत कला-क्रीडेचा क्रमांक फार वरचा; पण कितीही झाले तरी शेवटी हे निवातंपणातले उद्योग.
सध्या गल्लीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सर्व खेळांच्या स्पर्धा बंद असल्याचा मोठा परिणाम होईल तो प्रायोजक मिळवण्यावर. बड्या कंपन्या, उद्योगपती खेळांवर आणि खेळाडुंवर पैसे खर्च करण्यास किती प्राधान्य देतील हा मोठा प्रश्न आहे. मात्र, असे म्हणतात की, खेळ कोणताही असो, आधी तो मनात जिंकावा लागतो. मार्इंड गेम जिंंंंंंकणाºया खेळाडूंसाठी कोरोनानंतरचेही जग यशदायीच असेल.
सुकृत करंदीकर । सहा. संपादक, लोकमत, पुणे