International Yoga Day: आरोग्यसंपन्नतेसाठी योगाचे योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 03:28 AM2019-06-21T03:28:47+5:302019-06-21T03:30:13+5:30
योगामुळे शारीरिक आरोग्य तर उत्तम राहतेच, त्याशिवाय एकाग्रता व कामातही निपुणता येते.
- एम. व्यंकय्या नायडू (उपराष्ट्रपती)
जगभरातील १७० हून अधिक देश आज पाचवा जागतिक योग दिवस साजरा करीत आहेत. प्राचीन भारताचा अनमोल ठेवा आणि अमूर्त जागतिक वारशाचे अद्वितीय अंग असलेल्या योगाविषयी थोडे चिंतन करण्याची ही सुयोग्य वेळ आहे.
योग जगात सर्वत्र निरनिराळ्या स्वरूपात केला जातो व त्याची लोकप्रियता वाढत आहे. योग ही मुख्यत: प्राचीन शारीरिक, मानसिक व आत्मिक क्रिया असून तिचा उदय इसवी सनापूर्वी सुमारे पाचव्या शतकात भारतात झाला असावा, असे मानले जाते. योगाभ्यास हा नक्कीच एक परिणामकारक शारीरिक व्यायाम आहे. पण तो तेवढ्यापुरता मर्यादित नाही. योग हा निरामय जीवनाचा सर्वांगीण दृष्टिकोन आहे. शरीर व मन यांच्यातील आंतरिक नात्याला योग महत्त्वाचे मानतो. जीवनात संतुलन, साक्षीभाव, शांतचित्तता, डौल आणि प्रासादिकता आणणे हे योगाभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सर्वोत्तमता, समग्रता व आत्मशांतीची योग ही सर्वोत्तम अभिव्यक्ती आहे. यातून भारतीय वैश्विक विचाराची प्रचिती येते.
योग हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ जोडणे अथवा जुळविणे असा होतो. योगविज्ञान शरीर व मनासह मानवी अस्तित्वाच्या विविध पैलूंचे तादात्म्य घडवून आणते. मानवाच्या प्रगतीसाठी उत्तम शारीरिक आरोग्यास प्राचीन ऋषींनी नेहमीच महत्त्व दिले. योगात आरोग्य, निरामय जीवनाची दृष्टी आहे. जगभरातील लोकांच्या सुआरोग्यासाठी योगाविषयीच्या माहितीचा जास्तीत जास्त प्रसार होणे लाभदायी आहे, हे ओळखूनच संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ जाहीर केला.
आपण सध्या खूप मोठ्या आव्हानात्मक आणि अनाकलनीय व न भूतो अशा परिवर्तनाच्या कालखंडात आहोत. आपलं जगणं, शिकणं, काम करणं आणि आनंद घेणं हे सर्वच झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाने जीवनशैलीत आमूलाग्र बदल होत आहेत. आर्थिक प्रगती, सुलभता, सुखवस्तूपणा, ज्ञान आणि कौशल्ये तसेच ज्ञान व मनोरंजनाची साधने वाढविण्याच्या बाबतीत आपण लक्षणीय प्रगती केली आहे. परंतु सन २०१५ मध्ये जगभरातील विद्वान जागतिक विकासाचा अजेंडा तयार करण्यासाठी विचार करू लागले तेव्हा त्यांना असे जाणवले की, सकल राष्ट्रीय उत्पन्नाखेरीज सकल राष्ट्रीय आनंदाचाही विचार करायला हवा. विकासाच्या या स्पर्धेत गरिबांविषयीची कणव आणि पृथ्वीची काळजी हेही प्रतिबिंबित व्हायला हवी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक, निसर्गाची अविवेकी लुबाडणूक व आवास्तव गरजा यांना आवर घालायला हवा, हेही त्यांना पटले. त्यासाठी व्यक्तिगत जीवनशैली व जागतिक शासनव्यवस्थेची रचना यांची नव्याने सांगड घालण्याची गरज मान्य झाली. त्यातूनच ‘शाश्वत विकास’ हा नवा मंत्र पुढे आला. निसर्गावर अत्याचार न करता विकास करायचा असेल तर संतुलन महत्त्वाचे आहे. या संतुलनाची सुरुवात शारीरिक तंदुरुस्तीपासून होते. योग नेमका यासाठीच आहे.
योग हा जीवनाकडे पाहण्याचा असा दृष्टिकोन आहे ज्यात शारीरिक संतुलन व मानसिक स्थैर्यावर भर दिला जातो व पर्यावरण रक्षणासह अनेक बाबींचा समन्वय साधला जातो. त्यामुळेच यंदाच्या जागतिक योग दिनाचे ‘पर्यावरणासाठी कृती’ हे मुख्य सूत्र समर्पकच आहे. मानव व पृथ्वी या दोन्हींच्या भल्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. साथीचे आजार कमी होऊन इतर आजार वाढत असताना जगभरातील लोकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यात योग मोलाची भूमिका बजावू शकतो.
योगाने जीवनशैलीमुळे होणाऱ्या अनेक आजारांचा प्रतिबंध होऊ शकतो. झालेले आजार बरे होऊ शकतात, हे अमेरिकेतील हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांनी प्रयोगांती सिद्ध केले. त्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले की, जे नियमित योगाभ्यास करतात त्यांना डॉक्टरांकडे जाण्याची वेळ कमी येते व त्यांचा खर्च वाचतो.
योगाच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी लोकांना आरोग्यसंपन्न होण्यात भारताचा मोठा हातभार लागतो, ही समाधानाची गोष्ट आहे. जगभर योगाचा प्रचार व प्रसार करण्याकामी पंतप्रधान मोदीजी स्वत: पुढे होऊन नेतृत्व करीत आहेत. जागतिक योग दिनाच्या मोदीजींच्या सरकारने मांडलेल्या प्रस्तावास संयुक्त राष्ट्रसंघात १७७ देशांचा विक्रमी पाठिंबा मिळाला यातून योगाविषयी असलेले जागतिक कुतूहल व आत्मीयताच स्पष्ट होते.
योगामुळे शारीरिक आरोग्य तर उत्तम राहतेच, त्याशिवाय एकाग्रता व कामातही निपुणता येते. गीतेत म्हटल्याप्रमाणे कोणतेही काम अत्युत्तम पद्धतीने करणे हाही योगच आहे. ही निपुणता ‘ध्यान’, ‘धारणा’, ‘यम’ वा ‘नियमां’मुळे येते. पतंजलीने म्हटल्याप्रमाणे योग जीवनास आठ प्रकारे समृद्ध करते. म्हणूनच योग ही विचार करण्याची, वर्तनाची, शिकण्याची व समस्या सोडविण्याची एक समग्र व्यवस्था आहे. योगगुरू बी. के. एस. अय्यंगार यांनी म्हटल्याप्रमाणे योग संगीताप्रमाणे आहे. शरीराची लय, मनाचा सूर व आत्म्याच्या मिलनातून जीवनाचे संगीत तयार होते. भौगौलिक, राष्ट्रीय, भाषिक व धार्मिक सीमा ओलांडून योगाचे हेच सुरेल संगीत आज योग दिनाच्या निमित्ताने जगभरात कोट्यवधी लोकांच्या जीवनात आनंद खुलवीत आहे. ‘सर्वेभवन्तुसुखिन:, सर्वेसन्तुनिरामय:, सर्वेभद्राणीपश्चंतु, माकश्चिद दुख:भागभवेत’ या प्राचीन भारतीय ऋषींच्या प्रार्थनेने योग दिनानिमित्त मी जगभरातील लोकांचे स्वागत करतो.