अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 03:15 AM2020-06-23T03:15:54+5:302020-06-23T07:19:47+5:30

सध्याच्या अस्वस्थ कोरोना काळात आधीच दुबळ्या झालेल्या मन:शांतीचा क्रमांक एकचा शत्रू समाजमाध्यमे आहेत.

International Yoga Day Why don't you put a semicolon and wait a little longer? | अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे?

अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे?

Next

कोरोनाने जगाचे वेगवान रहाटगाडगे सक्तीने थोपवून धरलेले असताना नाइलाजाने का असेना, आपल्याला थोडी उसंत मिळाली
आहे. डोक्यातल्या कोलाहलापुढे निदान अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे? विखारापासून सुटका झाली, तरच हे घडू शकेल. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने योगाभ्यास आणि मन:शांती याविषयावरील दोन महत्त्वाच्या समकालीन भाष्यकारांनी ‘लोकमत’च्या वेबिनारमध्ये आपल्या मनातली अस्वस्थता मोकळेपणाने मांडली. त्याची दखल येथे घेणे क्रम:प्राप्त आहे. त्यातले एक ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ या जागतिक ख्यातीप्राप्त संघटनेचे संस्थापक श्री श्री रविशंकर आणि दुसरे योगगुरू बाबा रामदेव! सध्याच्या अस्वस्थ कोरोना काळात आधीच दुबळ्या झालेल्या मन:शांतीचा क्रमांक एकचा शत्रू समाजमाध्यमे आहेत.

आयुर्वेद आणि योगविद्या या प्राचीन भारतीय ज्ञानाच्या संचिताकडे दुर्लक्ष करून पश्चिमेच्या भजनी लागलेली आपली परावलंबी आरोग्य व्यवस्था आणि केवळ घोकंपट्टीचा रोग जडलेले आपले किरटे शिक्षण अशा दुर्धर दुखण्यांवर या दोघांनी नेमके बोट ठेवले आहे. श्री श्री रविशंकर आणि बाबा रामदेव हे दोघे तसे भिन्न स्वभावधर्माचे; पण कोरोना नावाच्या विषाणूशी चालू असलेली लढाई निभावताना आपण सर्वांनीच जो असह्य कलकलाट आरंभलेला आहे, तो थांबवा, असे या दोघांचेही अगदी कळकळीचे सांगणे होते. या कलकलाटाला, त्यातून हळूहळू येत चाललेल्या त्रासिक उद्विग्नतेला आणि आधीच घरकोंडीने घुसमटलेल्या सामान्यांच्या अस्वस्थ मनांना कारणीभूत आहेत ती अतिरेकी माध्यमे... आणि त्याहीपेक्षा समाजमाध्यमे!


दोन-चार महिने आमदनी थांबली म्हणून काही न बिघडणाऱ्या सुदैवीवर्गाने आधी समाजमाध्यमांवर ‘लॉकडाऊन लाईफस्टाईल’ची दुकाने मांडली. मग ‘डालगोना कॉफी’ आणि ‘बनाना ब्रेड’ न परवडणाऱ्यांनी या अभिजनांची धुलाई केली. छुपा मत्सर आणि त्यापोटी विखार हा तर समाजमाध्यमांचा स्वभावच. या विखाराचा हैदोस सध्या लोकांच्या डोक्यात घुसला आहे. सतत सल्ले तरी, नाही तर भीतीदायक अफवा तरी किंवा मग आत्महत्येपर्यंत नेवू पाहणाºया अस्वस्थतेचे आत्मरंजन तरी! त्यात दर मिनिटागणिक कानीकपाळी आदळणारे कोरोना विषाणूबाधितांचे, मृत्यूंचे वाढते आकडे! बरे, या नकोशा माहितीपासून स्वत:ला दूर ठेवण्याचे दोर सगळ्यांनी कधीच कापलेले... त्यामुळे हातातल्या त्या चौकोनी स्मार्ट डब्यातून नको ते सारे सतत डोळ्यांवर, मनांवर आदळत असतेच! हा अतिरेकी हैदोस आता तरी थांबवा, असा कळकळीचा सल्ला एरव्ही मितभाषी असलेल्या रतन टाटा यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तित्त्वाला थेट इन्स्टाग्रामवर जाऊनच द्यावासा वाटला, यातच काय ते आले. टाटा म्हणतात, ‘हे वर्ष सगळ्यांसाठीच फार कठीण आहे. ही वेळ एकमेकांवर हल्ले चढवून विखारी निर्भत्सनेची नाही, आता आपण एकमेकांना सावरले पाहिजे. परस्परांविषयी आपल्या मनात सहानुभाव असला पाहिजे!’ एकमेकांच्या दु:खांची-अडीअडचणींची जाणीव असणे, अवघड वेळी न बोलता परस्परांना सांभाळून नेणे आणि आधीच भळभळत्या जखमेवर उगा बोट न दाबणे, ही माणूसपणाची अगदी प्राथमिक कर्तव्ये! पण त्याचाही अनेकांना विसर पडलेला आहे.

सर्दी-खोकल्याने बेजार केले तर हळद घालून गरम दूध पिण्याचे आपण केव्हा विसरलो आणि औषधाच्या दुकानांकडे कसे धावू लागलो; हा तर प्रश्नही हल्ली कुणाला पडत नाही. खरे तर ही दुखणी काही कोरोनाने आणलेली नाहीत. आपला समाज त्याने जर्जर आहेच. फक्त कोरोनाने वरवरचे बुरखे ओरबाडून काढल्यावर आता आत सडलेले समाजमन अधिकच उघडे पडत चालले आहे, एवढेच! हे सडणे इतके जीवघेणे आहे की, त्याने रतन टाटा यांच्यासारख्यालासुद्धा अस्वस्थ केले आहे. वरवरची एक खपली उकलली की, आत सारा असह्य कल्लोळच! कोरोना विषाणूने जगाचे रहाटगाडगे थोपवून धरलेले असताना सक्तीने का असेना, प्रत्येकाच्याच हाताशी काही रिकामा वेळ आला आहे. डोक्यातल्या कोलाहलापुढे पूर्ण नाही, निदान अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे? श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव आणि रतन टाटा हे तीन वेगवेगळ्या स्वभावधर्माचे लोक तेच तर सुचवत आहेत.

Web Title: International Yoga Day Why don't you put a semicolon and wait a little longer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.