भाष्य - बुंद से गई...
By admin | Published: July 6, 2017 01:11 AM2017-07-06T01:11:03+5:302017-07-06T01:11:03+5:30
पार्टी विद अ डिफरन्स असा लौकिक असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अवध्या तीन वर्षात आमूलाग्र बदल होईल, असे भाकीत ज्योतिषाने
पार्टी विद अ डिफरन्स असा लौकिक असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अवध्या तीन वर्षात आमूलाग्र बदल होईल, असे भाकीत ज्योतिषाने वर्तविले नसते. गटबाजी केवळ काँग्रेसची मक्तेदारी नाही, हे देखील भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे स्थानिक ज्येष्ठ माजी मंत्र्याने फिरविलेली पाठ, पक्षाच्याच नेत्याविरुध्द बदनामीची मोहीम असे प्रकार जळगाव जिल्ह्यात घडून गेले. धुळ्याच्या आमदारांनी तर पक्षात अस्पृश्यपणाची वागणूक मिळत असल्याची खंत जाहीरपणे व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत तीन दिवस मुक्काम ठोकून पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कानमंत्र दिला. परंतु भाजपाच्या स्थानिक मंडळींनी या कानाने ऐकले आणि त्या कानाने सोडून दिले, असे वाटणारी घटना जळगावात घडली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने भाजपाने या वर्षाचे निमित्त साधून पक्षसंघटनेचा विस्तार करण्याचे ठरविले. त्यासाठी महत्त्वाकांक्षी अशी विस्तारक योजना राबवली. कागदावर मोठे आकडे आणि हॉटेलच्या लॉनवर विस्तृत बैठक घेऊन या मोहिमेची आखणी करण्यात आली. या अभियानासाठी प्रदेश कार्यालयाने प्रचार साहित्य पाठविले. विस्तारकांकरवी ते खेडोपाडी पोहोचवायचे नियोजन होते. पण पक्षाच्या कार्यालयमंत्र्याने हे तीन टन प्रचार साहित्य चक्क घाऊक रद्दी विक्रेत्याकडे विकून टाकले. १० हजार रुपये रोख घेऊन उर्वरित २० हजार रुपये वैयक्तिक बँक खात्यात जमा करुन घेतले. ३० हजारांचे असे हिस्सेवाटे का केले या प्रश्नाच्या खोलात न गेलेले बरे. भाजपा ज्यांना गुरुस्थानी मानतो, त्या उपाध्यायांची शेकड्याने रंगीत छायाचित्रे, पक्षाचे मुखपत्र मनोगत, शिवार संवाद ही ३१ पानी रंगीत पुस्तिका, केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहितीपत्रके असे सगळे साहित्य आमदार, जिल्हाध्यक्ष व संघटनामंत्र्यांच्या नावे लिहिलेल्या खोक्यांसह रद्दी कारखान्यात पोहोचले. ही बातमी छायाचित्रांसह समाजमाध्यमांवर प्रसारित होण्यासाठी पक्षातील नाराज गट सक्रिय होता, असे आता सांगितले जात आहे. पावसामुळे खराब झालेले साहित्य नष्ट करायचे होते, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आणि कार्यालयमंत्र्यावर खापर फोडून त्याचे काम थांबविले. या घटनेने शतप्रतिशत आणि पंचायत से संसद तक या घोषणा देणाऱ्या भाजपामधील बौध्दिक दिवाळखोरी ठसठशीतपणे समोर आली. कागदावर संघटनात्मक अभियान रंगविणारे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी तोंडघशी पडल्यानंतर आमदारांनी ३० हजार रुपये देऊन हे साहित्य पुन्हा खरेदी केले. पण ‘बुंद से गई वो हौदसे आती नही’ हे भाजपाच्या मंडळींना कोण सांगणार?