‘त्या’ ३६५ दिवसात मी ना सूर्योदय पाहिला, ना सूर्यास्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 07:39 AM2024-05-17T07:39:01+5:302024-05-17T07:40:18+5:30
सर्वपक्षीय स्त्री खासदारांशी केलेल्या संवादाची मालिका : नेत्री! या प्रकल्पात भुवनेश्वर येथील खासदार अपरजिता सारंगी यांच्याशी झालेल्या गप्पांचा सारांश.
शायना एन. सी. भाजप नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या
भारतीय प्रशासकीय सेवेत २४ वर्षांहून अधिक काळ सेवा केल्यानंतर राजकारणात येणे पत्करणाऱ्या कदाचित आपण पहिल्या महिला खासदार असाल. हे पाऊल उचलताना काय विचार केला होता?
१९९४ मध्ये मी भारतीय प्रशासकीय सेवेत आले आणि सुमारे १९ वर्षे माझ्या राज्यात ओडिशात महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यानंतर पाच वर्षे मी दिल्लीत ग्रामीण विकास मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम केले; पण जीवनात असे काही क्षण येतात जेव्हा आपण आतला आवाज ऐकतो. ऑगस्ट २०१८ मध्ये मला असे जाणवले की, सनदी सेवेत शक्य ते सर्व मी केले. आता क्षितिज रुंदावण्याची वेळ आली आहे. राजकारण हे लोकसेवा, लोकनीतीचे सर्वात मोठे माध्यम आहे, या विश्वासाने मी नोकरी सोडली आणि राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
बिहारची मुलगी, ओडिशाची सून या प्रवासात कुणाचा पाठिंबा, सहकार्य मिळाले?
शिक्षक असलेल्या माझ्या आई-वडिलांकडून मला प्रेरणा, आशीर्वाद मिळाला. वडिलांनी भेदभाव केला नाही. पण घरातले वातावरण पारंपरिक होते. मला सनदी परीक्षा द्यावयाची होती. आई-वडिलांनी फार प्रोत्साहन दिले नाही. संलग्न सेवेतला, दिसायला चांगला मुलगा त्यांनी शोधला, हुंड्याची तरतूदही केली. ‘मला फक्त एक वर्ष द्या’ अशी विनवणी मी केली, ते त्यांनी मान्य केले. पुढच्या ३६५ दिवसात मी ना सूर्योदय पाहिला, ना सूर्यास्त! खोलीत कोंडून घेऊन अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाले. प्रशिक्षणासाठी मसुरीत असतानाच ओडिशातल्या सहकाऱ्याच्या प्रेमात पडले. मलाही आधीच ओडिशा केडर मिळाली होती. आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.
सनदी सेवा सोडून आपण राजकारणात आलात. मुंबईचे पोलिस आयुक्त राहिलेले अरूप पटनाईक यांना हरवून आपण भुवनेश्वरमधून खासदार झालात. कसे घडले हे सगळे?
नोकरशाहीत खूप मर्यादाही असतात. नियमांच्या बंधनात राहावे लागते. राजकारणात यायचे ठरवल्यावर मी भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारणात येऊन मला थोडीच वर्षे झाली आहेत. ओडिशा हे गरीब राज्य आहे. दरडोई उत्पन्नात खूपच मागे असलेल्या या राज्याला पुढे आणायचे आहे. जगन्नाथाचा रथ ओढायला जसे अनेक हात लागतात तशी सर्वांची मदत घेऊन मला हे काम करायचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्योग निघाले, लघु आणि सूक्ष्म उद्योगांवर भर दिला गेला तर सध्याचे बेरोजगारीचे चित्र बदलू शकते. कृषी क्षेत्रातही पुष्कळ काही करता येईल. माझा स्वतःचा मतदार संघ आधुनिक करण्याचा प्रयत्न मी चालवला आहे.
उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपल्याला पुरस्कार मिळाला...?
ओडिशाच्या लोकांनी निवडून दिल्यानंतर मी संपर्क आणखी वाढवला. त्यांच्या अडीअडचणी, गाऱ्हाणी समजून घेतली. गावोगावी जाऊन मी लोकांचे म्हणणे ऐकून घेते. मंदिरात किंवा झाडाखाली बसते. सर्व तक्रारींचा पाठपुरावा केला जातो. जास्तीत जास्त लोकांचे काम व्हावे, यावर माझा भर असतो. प्रशासनाशी ताळमेळ साधून वाद टाळून हे करावे लागते. यूथ ॲक्शन, महिलांसाठी ‘अजिता’, बुद्धिजीवी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘समर्थ’ अशा तीन संस्थांच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत.
आपल्यासारख्या उच्चशिक्षित लोकांनी राजकारणात येण्याची वेळ आता आली आहे, असे आपल्याला वाटते का?
होय. आज गरज आहे ती कोणतेही पद, पदवी याचा विचार न करता राग, लोभ बाजूला ठेवून सर्वांसाठी काम करण्याची. राजकारणाचे उदाहरण घ्यायचे तर हे क्षेत्र पुरुषी वर्चस्वाखाली आहे. आक्रमक न होता, विनम्र राहून या क्षेत्रात आपली जागा तयार करावी लागेल. सनदी नोकरी सोडून राजकारणात येण्याच्या माझ्या निर्णयाचा मला कोणत्याही क्षणी पश्चात्ताप झाला नाही. नोकरशाहीत राहून मिळाले नसते एवढे आशीर्वाद मला मिळत आहेत. देशातल्या सुशिक्षित तरुणींनीही आज ठरवून राजकारणात येण्याची गरज आहे असे मला वाटते.