माणूस रानटी होऊ लागलाय, तो का?
By संदीप आडनाईक | Published: December 30, 2023 07:34 AM2023-12-30T07:34:03+5:302023-12-30T07:35:45+5:30
कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेला एक संवाद!
मुलाखत : संदीप आडनाईक
ग्रामीण भागात तुमचे वास्तव्य आहे. फारशा सोयी नसलेल्या ठिकाणी गेलेल्या बालपणाचा लिखाणावर परिणाम झाला का?
-अर्थातच. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी या छोट्या गावात मी शिकलो. चौथीपर्यंतच शाळा होती. गावात कोणाच्याही घराला कधी कुलूप लागलेले पाहिले नाही. कुणाकडे चोरून नेण्यासारखे काहीच नसायचे. मी नववी, दहावीला आल्यानंतरच एसटी पाहिली. पुढचे शिक्षण पन्हाळा हायस्कूलमध्ये झाले. गडाखालून चालत पोहोचावे लागे. जिथे शिकलो त्याच संस्थेच्या कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कळे येथे शिक्षक म्हणून १९९३-९४ मध्ये नोकरीस लागलो. तिथे मला समृद्ध ग्रंथालय मिळाले आणि आपणही लिहू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. वाचन हा लेखकाचा रियाज असतो. लेखकाला स्वतःचे काही सापडण्यासाठी वाचन असावे लागते. देशोदेशीचे वाचायला मिळाले, तेव्हा आपल्याकडेही तसेच काही असल्याचे लक्षात आले आणि मग मी लिहायला लागलो. कादंबरी कशी लिहायची हे कुणीही सांगितले नाही, ती कशी लिहायची याचे तंत्र माहीत नसताना ती लिहिली. त्याबाबतीत मुळातले अज्ञानच फायदेशीर ठरले. जे लिहिले त्याला लोक कादंबरी म्हणायला लागल्यानंतर ती कादंबरी आहे, हे मला समजले; पण यामुळे बेबंद लिहिता आले. कोणाचाही दबाव नव्हता. मी लिहितो स्वत:च्या समाधानासाठी. मला ज्या शब्दांत व्यक्त व्हावे असे वाटले, समोर जे दिसले ते लिहीत गेलो.
आपल्या लिखाणात विविधता आहेच, पण वेगळेपणही आहे; याची जाणीव प्रथम केव्हा झाली?
कोल्हापूरपासून २० ते २५ किलोमीटवर आमचा गाव. जिल्हा जरी समृद्ध असला तरीही डोंगरकपारीतील गावे मागास होती, आहेत. वाचायला लागल्यावर आपल्याकडे लिहिण्यासारखे काहीतरी आहे, आपण ते योग्य पद्धतीने मांडू शकतो, हे माझ्या लक्षात आले. मी गांभीर्याने केलेले सकस लेखन वाचत होतो. आपण जे जगतो, ते साहित्यात मुखर करायचे असेल तर या सगळ्या जगण्याकडे गंभीरपणे पाहावे लागेल याची जाणीव झाली. त्यामुळे मी हे विषय हाताळत असताना आपसूकच गंभीर लेखनच घडले असावे.
‘रिंगाण’ या कादंबरीपूर्वी आपल्या ‘गावठान’,’ रौदाळा’, ‘झड-झिंबड’, ‘धूळमाती’ अशा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तुमच्या लेखनाचे विषय ग्रामीणच आहेत...
- साहित्यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशी विभागणी करू नये, साहित्य हे साहित्यच असते. अभ्यासकांच्या सोयीसाठी ही विभागणी केली असावी, असे मला वाटते. मी शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील असल्याने मला या मातीतले कष्टच अधिक भावतात. प्रत्येक गावातल्या, प्रत्येक खेड्यातल्या समस्या वेगळ्या असतात. माझ्या कादंबरीत आलेले विषय, त्याचे अर्थ हे खेड्यातील लोकांनीच माझ्या लक्षात आणून दिले आहेत.
‘रिंगाण’ या कादंबरीबद्दल थोडेसे सांगा?
-चांदोलीच्या अभयारण्यात खूप फिरलो. तेव्हा जे टिपले, जो अनुभव घेतला, त्याचा वापर योग्यवेळी केला. एक माणूस म्हणाला, या पाळीव म्हशी आता रानटी झाल्यात, ते माझ्या मनात इतके पक्के बसले की हा शब्द वर्तुळासारखा डोक्यात फिरू लागला. हे रानटी होणे याचा शोध घेता आला पाहिजे. मी धरणग्रस्त वसाहतींना भेटी दिल्या. त्यांच्याशी गप्पा मारल्या. तिथे फिरल्यानंतर इथला पाळीव प्राणी जसा रानटी झाला आहे तसा इथला माणूससुद्धा आता रानटी होणार आहे, याची जाणीव झाली. त्यादृष्टीने आता त्याची वाटचाल सुरू आहे. विस्थापनाचा मार्ग फक्त रानटी होण्याइतपत मर्यादित नाही, तर आपण अनेक अंगांनी याचा विचार करू शकतो. काही जण स्वेच्छेने विस्थापन स्वीकारत असतील; पण या कादंबरीतले विस्थापन हे सक्तीने केले गेलेले आहे, त्यामुळे त्यांचे नैसर्गिक जगणे आपल्या व्यवस्थेने संपवून टाकले आहे. या व्यवस्थेमुळे लेखक म्हणून मी अस्वस्थ होतो. या अस्वस्थपणामुळेच माझ्याकडून ही कादंबरी लिहिली गेली.