पोलीस आले की पळ काढायचा हे त्यांचं ठरलेलं होतं; ‘स्टोरी’ अजून संपलेली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 06:38 AM2021-03-27T06:38:52+5:302021-03-27T06:39:12+5:30

धोका डोक्यावर घंटा वाजवत असताना मी मुंबईच्या कानाकोपऱ्यात फिरत होतो.. हे फोटो काढताना जे पाहिलं, ते थेट काळं किंवा पांढरं असंच होतं..!

Interview of Photo journalist experience during lockdown period | पोलीस आले की पळ काढायचा हे त्यांचं ठरलेलं होतं; ‘स्टोरी’ अजून संपलेली नाही...

पोलीस आले की पळ काढायचा हे त्यांचं ठरलेलं होतं; ‘स्टोरी’ अजून संपलेली नाही...

googlenewsNext

विकास खोत, ज्येष्ठ छाया-पत्रकार

कोविडची पहिली लाट आली, तेव्हाच तुम्ही मुंबईभर सर्वत्र फोटोसाठी फिरत होतात. किती कठीण होता तो अनुभव?
गेली सत्तावीस वर्षे मी देशातल्या प्रतिष्ठित मासिकांसाठी, वर्तमानपत्रांबरोबर फोटो जर्नालिझम करतो आहे. पण, कोविडचं वेगळं होतं. एरवीप्रमाणे घटना घडून गेल्यावर काम करायचं, नोंदी घ्यायच्या असं नव्हतं. घटना सलग घडत होती, तिचा नेमका अंदाज येत नव्हता. जगभरात गोंधळ उडाल्याचं कळत होतं. २०२० च्या मार्चमध्ये आपल्याकडे पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाला, गोष्टी बदलल्या. पूर्ण महानगर ठप्प, मोठ्या प्रमाणात घडू लागलेलं मजुरांचं स्थलांतर,  कोविडग्रस्तांची संख्या वाढणं, उपचारांची भव्य सेंटर्स उभारणं, मृतदेहांच्या व्यवस्थेचा ताण असा सतत फोकस शिफ्ट होत राहिला. मी आधी आठवडाभर बाहेर पडलो नाही; पण स्वस्थ बसवेना. मास्क, पीपीई किट, सॅनिटायझेशन वगैरे काळजी घेऊन बाहेर पडलो. एरवी चोवीस तास जाग्या असणाऱ्या शहरात फक्त पक्षी नि पोलीस तेवढे दिसत होते. भीषण वाटत होतं. एरवी एखाद्या असाईनमेंटवर गेलो की धोका माझ्याच शरीराला असायचा, आता जर मी निष्काळजी वागलो तर घरच्या-दारच्या सगळ्यांच्या जीवाला धोका होऊ शकला असता. ती टांगती तलवार घेऊन आम्ही अनेक छायाचित्रवृत्त प्रतिनिधी मुंबईच्या कानाकोपऱ्यांत फिरलो.

India

फोटोंमागची गोष्ट काय पाहिली?
लॉकडाऊन कडक होता. काही मध्यमवयीन बायका बसलेल्या दिसल्या. विचारलं तर म्हणाल्या, उद्योगपती मदतीसाठी पैसे वाटणारे त्याची वाट बघतोय! पण, खरी गोष्ट अशी की टिचभर घरात आता पूर्णवेळ साताठ माणसं.

चोवीस तास तिथं बसणं कसं शक्य होतं?

पोलीस आले की पळ काढायचा हे त्यांचं ठरलेलं होतं.  फार कुणाच्या जवळ जाऊ नका, भावुक होऊन जरुरीपेक्षा जास्त बोलू नका, असं मेडिकल वर्कर्सनी सांगितलं होतं. आता मागे बघताना वाटतं, खूपच रिस्क घेऊन आपण वस्तीवस्तीत फिरलो. एका वस्तीत पोहोचलो तर तिथल्या माणसांनी सांगितलं, आम्ही दोन आठवडे जवळपास उपाशी आहोत. स्वयंसेवी संस्था किंवा नगरसेवकांना निरोप द्या, खायला पाठवा. घरातलं ज्येष्ठ माणूस वारल्यावर उपचार पूर्ण करून शेवटचा निरोपही न देणारे लोक बघितले. आईच्या शेजारी पीपीई किट घालून तिला बरं करण्यासाठी धडपडणारा मुलगा पाहिला.  लाखो मजूर लॉकडाऊननंतर जीवाच्या आकांताने तडफडून आपल्या गावी पोहोचण्यासाठी निघाले होते. माणसांचे किती पैलू अनुभवले! अशावेळी मनाला आवर घालून नेमका फोटो काढणं कठीण असतं. भीती वाटली? नेमका अंदाज नसण्याची भीती होती ती. आजवर दुष्काळ, पूर, भूकंप, त्सुनामी, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले मी कव्हर केले होते. अशावेळी साईटवर काय घडलेलं असू शकतं याबद्दलची मानसिक तयारी असते. इथे मात्र कोविड वेगवेगळ्या तऱ्हेच्या ‘आयसोलेशन’मुळं घाबरवून टाकत होता. त्याचा हल्ला तुम्हाला दिसू शकत नव्हता. परिस्थितीची गुंतागुंत समजून आपण आपल्या परिघातल्या लोकांना कसं जबाबदार बनवू शकू ही जबाबदारी वाटली मला.

In Photos: Fear, Foreboding and Makeshift Barricades in Dharavi as COVID-19 Spreads

सध्या प्रत्येकाच्या हातात कॅमेरा नि सोशल मीडिया आहे. मग, फोटोजर्नालिस्टच्या फोटोचं वेगळं मोल काय?

अगदी गल्लीच्या कोपऱ्यातही कुणी व्यक्त होत असेल तर चांगलंच आहे. तशी ‘मायक्रो’ स्टोरी माझ्यासारख्या पत्रकारांची नसेल; पण ती युनिवर्सल असेल. ते माझं काम असल्यामुळे घटनेकडे बघण्याचा सामान्य माणसाहून व्यापक असा एक दृष्टिकोन घडलेला असतो. खाजगी स्तरावरचं सादरीकरण व व्यापक पटलावर पुराव्यांसह घटना मांडणं यात फरक असणारच.

तुम्ही रंग वगळलेत फोटो काढताना...?
काही घटना या शेकडो वर्षांमधल्या सर्वांत भीतीयुक्त असतात त्यातली एक कोविडची. मला वाटतं, यात सगळं आर या पार आहे. काळं नि पांढरं. करडंही नाही. रंगांनी घटनेच्या गांभीर्याबद्दल विचलितता येते असं मला वाटलं. घटनेची तीव्रता अतिशय दाहक होती, धोका सतत डोक्यावर घंटा वाजवत होता. ही व्यक्तीपेक्षा समूहांची गोष्ट होती, म्हणून पोर्ट्रेटही कमी आहेत. कुठल्याच भेदाभेदांना न जुमानता कोरोना सगळ्यांपर्यंत पोहोचला नि त्याची झळ जगभरातल्या प्रगत, अप्रगत सगळ्याच देशांना पोहोचली. अजूनही वेगवेगळ्या रूपांत कोविड अवतरत राहील अशी शक्यता वर्तवली गेलीय... म्हणजे ‘स्टोरी’ संपलेली नाही. संयमानं सगळ्या पातळीवरची अवस्था, अनिश्‍चितता टिपत राहाणं एवढं हातातल्या कॅमेऱ्यातून करायचं आहे. त्यात कधीतरी रंगही येतील, अशी वाट मी बघतोय.  

मुलाखत : सोनाली नवांगूळ
 

Web Title: Interview of Photo journalist experience during lockdown period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.