असहिष्णुतेचे लोण
By admin | Published: September 7, 2016 03:58 AM2016-09-07T03:58:54+5:302016-09-07T03:58:54+5:30
राजकारणात वावरताना जिभेला लगाम घालूनच जे काही बोलायचे, ते बोलायचे असते. पण जे असा लगाम घालीत नाहीत ते असहिष्णुतेचे कसे धनी होतात
राजकारणात वावरताना जिभेला लगाम घालूनच जे काही बोलायचे, ते बोलायचे असते. पण जे असा लगाम घालीत नाहीत ते असहिष्णुतेचे कसे धनी होतात याचा प्रत्यय गेले काही महिने भारतात वारंवार येतोच आहे. परंतु असहिष्णुतेचे हे लोण आता दूरदेशीही पोहोचले असावे असे दिसते. आशिया खंडातीलच फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटार्ट हे यांचे अगदी ‘बोलके’ उदाहरण मानावे लागेल. ड्युटार्ट यांचा त्यांच्या जिभेवरील ताबा सुटला आणि त्यांनी भर पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याविषयी अत्यंत गलिच्छ अपशब्द (खरे तर आईबहिणीवरुन शिवी) उच्चारले आणि ते समजताच ओबामा यांनी त्यांच्यासोबतची मंगळवारची नियोजीत बैठक रद्दच करुन टाकली. दक्षिणपूर्व आशिया खंडातील दहा देशांच्या आशियान परिषदेच्या बैठकीसाठी ओबामा लाओस येथे जाणार होते आणि तिथेच उभय नेत्यांची बैठक होणार होती. वास्तविक पाहाता अमेरिका आणि चीन यांच्यात जो उभा दावा आहे आणि ज्याला आता नवे धुमारे फुटत आहेत, त्यामध्ये फिलीपाईन्स राष्ट्र म्हणून आणि ड्युटार्ट त्याचे प्रमुख म्हणून अमेरिकेसोबत आहेत. तरीही ड्युटार्ट यांची जीभ घसरावी, त्यामागेही काही कारण आहे. ड्युटार्ट अगदी अलीकडे म्हणजे गेल्या मे महिन्यात राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून गेले आहेत. त्यांच्या राष्ट्राला गुन्हेगारीचा, टोळी युद्धांचा आणि अंमली पदार्थांच्या व्यापाराचा करकचून वेढा पडला आहे. आपण हा वेढा मोडून काढू असे वचन देऊनच त्यांनी निवडणूक जिंकली आणि दिल्या वचनाला जागून त्यांनी गुन्हेगारांचा व अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचा बिमोड करण्यास प्रारंभ केला. दिल्या वचनाला जागणे हेही भारतीयांच्या अनुभवाच्या दृष्टीने विचार करता जरा विपरितच. पण त्यांनी ते सुरु केले. स्वाभाविकच जे लोक ठार मारले गेले, त्यांचा कैवार घेऊन मानवी हक्क संरक्षणाच्या पाठीराख्यांनी वैश्विक आवाज उठविण्यास प्रारंभ केला. अर्थात याचाही अनुभव भारत घेतच असतो. खुद्द ओबामा यांनीदेखील फिलीपाईन्समधील मानवी हक्कांच्या रक्षणाची चर्चा केली आणि ड्युटार्ट यांची जीभ घसरली. त्यांनी नंतर ओबामा यांची माफीदेखील मागितली. पण त्यातही ते पटाईत आहेत. त्यांनी मागे पोप फ्रान्सीस यांचाही पाणउतारा करुन नंतर माफी मागितली होती. पण एकीकडे ओबामा यांची माफी मागतानाच दुसरीकडे आपल्या देशातील अखेरचा गुन्हेगार जिवंत असेपर्यंत शिरकाण सुरुच राहील असेही त्यांनी सांगून टाकले आहे.