‘एसटी’ला ग्रहण अवैध वाहतुकीचे

By admin | Published: May 29, 2016 03:18 AM2016-05-29T03:18:07+5:302016-05-29T03:18:07+5:30

नव्वदच्या दशकात तत्कालीन शासनाने प्रवासी वाहतुकीसाठी खाजगी वाहनांना परवाना देण्याचे धोरण स्वीकारले आणि प्रवासी वाहतुकीतील एस.टी.ची मक्तेदारी संपुष्टात येण्यास सुरुवात झाली.

Invalid traffic to 'ST' | ‘एसटी’ला ग्रहण अवैध वाहतुकीचे

‘एसटी’ला ग्रहण अवैध वाहतुकीचे

Next

- श्रीरंग बरगे

नव्वदच्या दशकात तत्कालीन शासनाने प्रवासी वाहतुकीसाठी खाजगी वाहनांना परवाना देण्याचे धोरण स्वीकारले आणि प्रवासी वाहतुकीतील एस.टी.ची मक्तेदारी संपुष्टात येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला ‘नगण्य’ वाटणारी ही वाहतूक व्यवस्था गेल्या २0-२५ वर्षांत चांगलीच फोफावली असून, आजमितीस एस.टी.च्या उत्पन्नाएवढीच किंबहुना जास्तच आर्थिक उत्पन्न कमावणारी समांतर अर्थव्यवस्था या अवैध प्रवासी वाहतुकीतून निर्माण झाली आहे.
एस.टी.चे दैनंदिन उत्पन्न सरासरी १८ कोटी रुपये आहे. तर अवैध वाहतुकीचे दररोजचे उत्पन्न सरासरी २0 ते २२ कोटी रुपये आहे. अवैध वाहतुकीचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. साधारणत: १ ते ५0 कि.मी. अंतरावर विशेषत: ग्रामीण भागात ‘वडाप’ किंवा ‘काळी-पिवळी’ या नावाने ओळखली जाणारी कमी अंतराच्या पल्ल्यावर धावणारी व दुसरी शहरी भागात विकसित झालेली साधारणत: २५0 कि.मी.पेक्षा जास्त अंतरावर चालणारी खाजगी आराम बस (लक्झरी बसेस) या दोन्ही वाहतूकीला परिवहन विभागाचे कमकुवत कायदे, पोलीस व परिवहन अधिकाऱ्यांच्या सोईस्कर दुर्लक्षामुळे ‘बळ’ प्राप्त झाले आहे.
एस.टी.च्या आर्थिक तोट्याला कारणीभूत ठरणारा महत्त्वाचा घटक म्हणून या अवैध वाहतुकीकडे पाहिले जाते तेव्हा प्रश्न निर्माण होतो तो त्याच्यावर कारवाईचा व निर्बंधाचा. उच्च न्यायालयाने वारंवार याबाबत शासनाला खडसावूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने अवैध प्रवासी वाहतुकीचे ‘भूत’ एस.टी.च्या मानगुटीवर बसले आहे.
सुदैवाने महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक बदल झालाय. राज्याचे परिवहनमंत्रीच महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष झालेत. यापूर्वी अध्यक्ष व परिवहन मंत्री वेगवेगळ्या व्यक्ती असल्याने आरटीओ व एस.टी. महामंडळ एकत्र काम करण्यास अडचणी होत्या. पण या बदलामुळे आता काही प्रमाणात संयुक्त कारवाईला सुरुवात झालेय. पण पुढे काय होते ते पाहावे लागेल; कारण राजकीय दबावाला बळी पडून अशा कारवाईतून यापूर्वी काहीच हाती लागले नव्हते. याउलट रोजगाराचा प्रश्न निर्माण करून काही राजकारणी खाजगी वाहतुकीचे समर्थन करतात.
दुर्गम भागात फक्त एस.टी.च वाहतूक करते. खाजगी वाहतूकवाले गाड्यांचे नुकसान होईल म्हणून डोंगराळ भागातून व कच्च्या रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करीत नाहीत. दैनंदिन सुमारे ६0 लाख प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे कार्य एस.टी. अगदी लीलया पार पाडते. खाजगी वाहतूकवाले कधीही भाडेवाढ करतात. हंगामी व सणाच्या वेळी ते दुप्पट भाडे आकारतात. एस.टी. तसे करीत नाही. स्वच्छता, नियमितता, शिस्त हे गुण बदलत्या काळानुसार एस.टी.ने अंगीकारले आहेत. एस.टी.ला लागलेले खाजगी वाहतुकीचे ग्रहण दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू या.

(लेखक हे महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस आहेत.)

Web Title: Invalid traffic to 'ST'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.