उलथापालथ !

By सचिन जवळकोटे | Published: October 23, 2019 08:31 AM2019-10-23T08:31:18+5:302019-10-23T08:33:01+5:30

लगाव बत्ती

Inverted! | उलथापालथ !

उलथापालथ !

googlenewsNext

- सचिन जवळकोटे

‘शाई म्हणाली बोटाला.. दे धक्का बटणाला.. दे धक्का प्रस्थापितांनाऽऽ’ असं काल कुणीतरी कुणाच्या कानात कुजबुजलं. तुमच्या कानी नाही का पडलं? मग बहुधा तुम्ही ‘त्या’ मतदारसंघातले नाही वाटतं? होय.. होय.. तेच ते मतदारसंघ, जिथं घडणारंय उद्या प्रचंड उलथापालथ. जाणवणारंय भलताच राजकीय भूकंप. होणारंय नव्या चेहºयांचा उदय... जुन्यांची सद्दी संपवून! मग आलं का लक्षात... आपल्या जिल्ह्यातले कोणकोणते मतदारसंघ आहेत ते !

 ‘लक्ष्मी’चा चमत्कार..गद्दारांचा शाप !

परीक्षेत शॉर्टकट मार्गानं हमखास यश मिळवायचं असेल तर म्हणे अक्कलकोटच्या ‘खेडगी’ कॉलेजला नंबर यावा लागतो. आजपावेतो या ‘खेडगी’ कॉलेजनं किती विद्यार्थ्यांना साथ दिली माहीत नाही. परंतु, गेल्या दोन दिवसांत याच नावाच्या नेत्यानं पुन्हा एकदा अक्कलकोट शहरात ‘लक्ष्मी’चा चमत्कार घडविला. आता ‘लक्ष्मी निवास’ हे ‘सिद्धूअण्णा दुधनीकर’ यांच्या बंगल्याचे नाव आहे, हा योगायोग समजावा. अक्कलकोटच्या ‘कमळा’ला गद्दारांचा शाप तसा खूप जुना. घरातला उंदीर मारण्यासाठी बाहेरचा अजगर आणून पोसण्याची इथल्या काही लोकांना नेहमीच हौस. जो इतिहास यापूर्वी ‘सचिनदादां’च्या घराण्यानं रचला, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा ‘बिखेता’ ग्रुपनं घडविली. आता ‘बिखेता’ म्हणजे पेट्यांची उलाढाल करणारा कुणी विक्रेता का? असा सवाल उगाचंच कुणी विचारू नये. कदाचित ‘बिखेता’चं उत्तर ‘बिराजदार-खेडगी-तानवडे’ ग्रुपच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडं मिळू शकतं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की, दिल्लीहून झगडून तिकीट आणणाºया ‘सचिनदादां’पेक्षा शेवटच्या तीन दिवसांत ‘सिद्धूअण्णां’नी जोरात आघाडी घेतली. ‘दुश्मनाशी थेट झगडत बसण्यापेक्षा दुश्मनाच्या घरभेद्यांना आपलंसं करावं !’ ही नेहमीची स्ट्रॅटेजी ‘अण्णां’नी वापरली. नेहमीप्रमाणं वातावरण बदलून टाकलं. तरीही अनेक गावात ‘शाई म्हणाली बोटाला... दे धक्का प्रस्थापितांना !’

रस्त्यातच झोपी गेलं ‘बापूं’चं कासव..

लहानपणी ‘ससा अन् कासव’ची गोष्ट तुम्ही ऐकली असेलच. यंदाही तसंच झालं. ‘सुभाषबापंू’ चं ‘कासव’ यावेळी ‘दक्षिण’मध्ये चक्क ‘ससा’ बनून भलतंच पुढं धावलं. ‘आपल्याशी स्पर्धा करायला कुणीच नाही’, म्हणत पळता-पळता तेरा मैलावरच निवांत झोपी गेलं. ‘प्रत्येक गोष्टीत घासाघीस करून बापूंचा पैसा कसा वाचविला!’ हे बंगल्यावर सांगण्यात ‘अवि’ रमले. ‘लाखाच्या लीडनं आपणच कसं निवडून येऊ!’ याची कागदी बेरीज मारण्यात बाकीचे रथी-महारथी विजापूर रस्त्यावरच्या मंगल कार्यालयात रंगले. हद्दवाढ भागातली काही मेंबर मंडळीही पावसाच्या नावाखाली छत्रीखाली निवांत उभी राहिली.
एवढ्या वेळात ‘नई जिंदगी’तलं ‘बाबा कासव’ अवघ्या तालुक्यात गराऽऽ गराऽऽऽ फिरलं. ‘छलोऽऽ मनशा... अपना आदमीऽऽ’ची भाषा रानावनात घुमली. ध्यानी-मनी नसणारा ‘हात’ प्रत्येक मतदान केंद्रावर धडाधड बटणावर पडू लागला, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सायंकाळी पाच वाजताही अनेक गावात रांगा लागल्या होत्या. एवढं झालं तरीही ‘कमळ’च फुलणार, यात शंका नाही. मात्र ‘स्टेट लेव्हलचा लीडर’ म्हणून ज्या पद्धतीनं लीड मिळायला हवा, ते लक्ष्य पूर्ण होणार का, याचं उत्तर केवळ ‘शाईवाल्या बोटा’लाच माहीत. एक मात्र खरं, एका बलाढ्य ‘समूहा’ला धक्का देण्याचं धाडस एकांड्या शिलेदारानं दाखविलं, हेही नसे थोडकं.

महेशअण्णां’ची शेगडी अन्

‘फारूखभाई का पतंग’..

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या ‘शहर मध्य’चा निकाल धक्कादायक नसला तरी अनपेक्षित असाच असेल. गेल्या कित्येक दशकांपासून ‘शिंदे’ अन् ‘माने’ घराण्यातल्या वडीलधाºयांचं राजकीय वैरत्व ‘कोठें’नी धगधगत ठेवलेलं. मध्यंतरीच्या काळात ‘दिलीपरावां’नी याच ‘शिंदे’ गटाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलेला. मात्र यंदा ‘मध्य’मध्ये पुन्हा एकदा तिन्ही घराण्यांचे वारसदार एकमेकांच्या विरोधात उभारले.
इथं ध्यानी-मनी नसताना ‘महेशअण्णा’ शेवटच्या तीन-चार दिवसांत जबरदस्त चर्चेत आले. त्यांचे एकेकाळचे परममित्र (!) ‘खरटमल’ यांनीही आयुष्यभर आपल्या दुकानातून ‘गॅस शेगड्या’ विकल्या नसतील, एवढ्या ‘महेशअण्णां’नी शेवटच्या दोन दिवसांत हातोहात खपविल्या. म्हणूनच पूर्व भागात ‘मन मन्शीऽऽ’ म्हणत ‘शेगडी’ जोरात पेटली. ‘दिलीप मालकां’साठी मोदी ते सेटलमेंटपर्यंतचा भाग शेवटपर्यंत सोबतीला राहिला.. तर नियोजनाच्या पातळीवर ‘प्रणितीताई’ यशस्वी ठरल्या. ‘मेकअप बॉक्स’मुळं बिच्चाºया लोकांचे चेहरे उजळले की नाही, माहीत नाही; परंतु  ‘तार्इं’चा ‘हात’ गरिबाघरी व्यवस्थित पोहोचला.. परंतु सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरतोय ‘फारूखभाई का पतंग’. ‘महेशअण्णां’ची शेगडी जेवढी भडकली, त्याहीपेक्षा जास्त ‘पतंग’ उडाला तर..  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘कमळ’वाल्या दोन्ही ‘देशमुखां’नी आपापले मतदारसंघ ‘सेफ’ ठेवून ‘मध्य’च्या ‘क्लायमॅक्स’ची मजा लुटली. ‘उत्तर’मध्ये येऊ पाहणाºया ‘महेशअण्णांं’ना इथं पाठवून ‘विजूमालक’ रिलॅक्स झाले.. तर ‘दक्षिण’मध्ये त्रासदायक ठरणाºया ‘दिलीपमालकां’नाही इकडं मैदानात उतरवून ‘सुभाषबापूं’नी नि:श्वास सोडला. दोन्ही ‘देशमुखां’ची त्यांच्या दृष्टीनं ही ईडा-पिडा टळली. मात्र ‘प्रणितीतार्इं’नी यावर कसा उतारा शोधला, याचा आकडा उद्या दुपारपर्यंत सोलापूरकरांना समजेलच. तोपर्यंत लगाव बत्ती..

आबा, दीदी अन् मामा !

करमाळ्याएवढी टस्स्ल तर जिल्ह्यातल्या कोणत्याच मतदारसंघात झाली नसावी. तिन्ही उमेदवार स्थानिक परंतु, त्यांना सपोर्ट करणारे नेते स्टेट लेव्हलचे. ‘रश्मीदीदीं’साठी ‘तानाजीं’नी प्रतिष्ठेचा विषय बनविलेला. ‘नारायणआबां’च्या पाठीशी ‘अकलूजकरां’ची ताकद तर ‘संजयमामा’सोबत ‘धाकटे दादा बारामतीकर’ कामाला लागलेले. करमाळ्याचे दोन भाग या निवडणुकीत एकमेकांशी भिडलेले. ‘आबां’चा पश्चिम अन् ‘दीदीं’चा ‘उत्तर-पूर्व’ भाग एकमेकांशी लढत असताना ‘संजयमामां’चा ‘दक्षिण’ पट्टा मात्र काल मतदानावेळी अत्यंत शांतपणे आपलं कार्य अचूकपणे साधून गेला. आता ‘आबां’नी किती मतं खाल्ली, यावरच ‘दीदीं’चं भवितव्य अवलंबून.

मोहोळमध्ये चमत्कार..

यंदा मोहोळच्या इतिहासात म्हणे प्रथमच मोठा चमत्कार घडण्याची शक्यता. बºयाच वेळा ‘नागनाथअण्णां’नी कसं-बसं उभं रहावं. नंतर अपयशाचा बुक्का माथी मारून पुन्हा पाच वर्षे निवांत रहावं, ही जणू परंपराच ठरलेली. मात्र यंदा ‘अण्णां’च्या ‘काठी न् घोंगडं’ला ‘शेटफळ-टाकळी’ची ‘तलवार’ भेटली. त्यात पुन्हा ‘आपला-परका’ भौगोलिक वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘इंदापूर’चं इम्पोर्टेड पार्सल पुन्हा ‘बारामती’ला पाठविण्यासाठी ‘रमेशभाऊं’चीही ‘आतून’ (म्हणजे खरंखुरं ‘आत’मधून होऽऽ) साथ मिळाली.
एक मात्र खरं, ‘भाऊंच्या फ्लॅटमधून त्रेपन्न पेट्या जप्त झाल्या’, हे कळाल्यावर इथले अनेक जण उगाचंच हळहळले. ‘तिकडं या पेट्या कुजण्यापेक्षा इकडं अंगी तरी लागल्या असत्या,’ या जाणिवेनं अनेकांनी शेवटच्या टप्प्यात ‘भाऊं’ची ‘चावी’ टाकून ‘अण्णां’चंच ‘धनुष्य’ हाती घेतलं. अधिक माहितीसाठी आपल्या लाडक्या ‘शेतकरी भैय्यां’शी संपर्क साधावा. असो...

जाता जाता : एकाच दिवशी अख्ख्या जिल्ह्याची उत्सुकता शमविली तर उद्या काय वाचायचं ? म्हणून उर्वरित सहा मतदारसंघांची कुंडली जाणून घेऊ या उद्याच्या अंकात. तोपर्यंत हिशोब चालू द्या तुमच्या आकडेवारीचा.. लगाव बत्ती..

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Inverted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.