नाणारकरिता एक डाव भुतांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:04 AM2018-04-27T00:04:18+5:302018-04-27T00:04:18+5:30
पिंपळावर कोकणातील भुताखेतांची मीटिंग बोलावली होती. समंध आणि मुंजा फांद्यांना लटकून गिरक्या घेत असतात.
संदीप प्रधान|
अमावस्येची रात्र होती... कीर्र अंधार काजळासारखा कोपऱ्याकोपºयांत ठासून भरला होता... कौलारू घरं भेदरलेल्या मांजरासारखी चिडीचूप निपचित पडली होती... घरांच्या पडवीतील एकाकी बल्ब मांजराच्या डोळ्यासारखा अंधारात लुकलुकत होता... त्या बल्बभोवती सैरभैर चिलटं जीवाच्या आकांतानं घोंघावत होती... कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज शांततेच्या चिंध्या करत होता... गावाच्या वेशीवरील अवाढव्य पिंपळ अक्राळविक्राळ भासत होता... त्याच्या पानांची सळसळ हृदयात कापरं भरवणारी होती... पिंपळावर कोकणातील भुताखेतांची मीटिंग बोलावली होती. समंध आणि मुंजा फांद्यांना लटकून गिरक्या घेत असतात. हडळ झाडाखाली बसून केसांतील उवा नखानं ठेचून मारत असते. जखिण मानेला आळोखेपिळोखे देत स्वत:शी बोलत व हसत असते. खविस आपलं डोकं झाडाच्या अजस्र बुंध्यावर आपटून घेत असतो. तेवढ्यात, वेताळ तिथं येतो. सारी भुतं वेताळाभोवती गोळा होतात. वेताळ घसा खाकरतो. आताच मंत्रालयातून आलो. नाणार प्रकल्प जाणार, या वल्गना आहेत. कालच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला आपण सारेच होतो. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केल्यावर हा मुंजा कोलांटउड्या मारत या पिंपळावरून त्या पिंपळावर बागडला. तेव्हाच मी म्हटलं की, माझा यावर विश्वास नाही. लागलीच मी मंत्रालयाकडं जाणारी एसटी पकडली. नाणार प्रकल्प उभा करण्याकरिता हा पिंपळ पाडला जाणार, येथील रस्ते रुंद होणार, दिवाबत्ती होणार, अहोरात्र वर्दळ वाढणार... मग, समंध कसा कुणाला त्रस्त करणार, मुंजा विहिरीपाशी पाणी काढायला येणाºयांना कसा घाबरवून सोडणार आणि हडळ सुवासिनींच्या पोटात गोळा कशी उठवणार... ते काही नाही, नाणार प्रकल्प येणार नाही, याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी. वेताळाच्या निर्धारावर भुतांनी अचकटविचकट अंगविक्षेप करत जल्लोष केला. आपण विरोध करायचा म्हणजे करायचे तरी काय? देवचार आणि गिºहा यांनी एका सुरात प्रश्न केला. वेताळ म्हणाला की, गुजरातहून कुणी मोदी, शहा जमिनीचे व्यवहार करायला आले, तर घरातील बाया, बाप्ये यांच्या शरीरात लागलीच प्रवेश करायचा आणि खेळ सुरू करायचा. खविस तू गावातील खाटकाची पाठ सोडू नको. कुणी जमीनखरेदीला आला, तर चॉपर घेऊन त्याच्या पाठी लाग. झोटिंगा, तू गावातील सारंगाच्या शिडात हवा भर. देवचारा, तू आपल्या गावातील गंगू नाभिकाचा वस्तरा ताब्यात घे. वेताळानं प्रत्येकावर जबाबदारी सोपवली. तेवढ्यात, म्हसोबा पुढं आला आणि म्हणाला की, वेताळा ही काय आपली कामं आहेत का? मग, ते खळ्ळ-खट्याकवाले काय करणार? शिवाय, स्वाभिमानची पोरं राडे घालायला उतावीळ आहेतच. वर्षभरावर निवडणुका आल्यामुळं हे धूमशान सुरू झालंय. निवडणुका होऊ दे. नंतर सारं आपसूक शांत होईल. म्हसोबा समजावणीच्या सुरात बोलला. मागं जैतापूरवरून रान उठलं, तेव्हा आपण हवालदिल झालो होतो. आता कुणी त्याचं नाव पण काढत नाही. तेवढ्यात, झाडाखाली हालचाल दिसली. कुणीतरी मुंडी कापलेलं कोंबडं आणून झाडाखाली भिरकावून धूम ठोकली. सारी भुतं मेजवानीवर तुटून पडली.