संगणक शिक्षण घेणे आवश्यकच आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 09:10 AM2023-04-09T09:10:03+5:302023-04-09T09:10:22+5:30

2025 सालपर्यंत डिजिटल अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलरच्या वरती नेण्याचे लक्ष्य आपण ठेवले आहे. पण, हे लक्ष्य पूर्ण करत असताना आपली अवस्था शंकूसारखी झाली आहे. 

Is Computer Education Necessary | संगणक शिक्षण घेणे आवश्यकच आहे का?

संगणक शिक्षण घेणे आवश्यकच आहे का?

googlenewsNext

2025 सालपर्यंत डिजिटल अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलरच्या वरती नेण्याचे लक्ष्य आपण ठेवले आहे. पण, हे लक्ष्य पूर्ण करत असताना आपली अवस्था शंकूसारखी झाली आहे. 

अनय जोगळेकर, 
माहिती - तंत्रज्ञानविषयक घडामोडींचे अभ्यासक 


भारत हा विरोधाभासांचा देश आहे. कोणत्याही क्षेत्रात दोन टोकांची परिस्थिती राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि कधी कधी घरांमध्येही दिसून येते. आयटी म्हणजे केवळ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी नसून इंडियाज टुमॉरो असल्याचे प्रतिपादन अटल बिहारी वाजपेयींनी केले होते. २१व्या शतकात प्रवेश करत असताना भारत आयटी क्षेत्रातील उदयोन्मुख महासत्ता म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतरच्या दोन दशकांमध्ये भारतीय लोक जागतिक आयटी कंपन्यांचे नेतृत्त्व करताना दिसू लागले. देशाच्या निर्यातीतील सेवा क्षेत्राचा आणि त्यातही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा वाटा आहे.  

सन २०२०-२१ मध्ये सांख्यिकी मंत्रालयाच्या कार्यक्रमांतर्गत १५ ते २९ वयोगटातील सुमारे ११ लाख तरुणांच्या माहिती तंत्रज्ञानासाठी आवश्यक मूलभूत कौशल्यांबाबत केले गेलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. संगणकावर कॉपी पेस्ट करणे, फाइल एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये हलवणे, संगणकावर एखादा प्रोग्रॅम इन्स्टॉल करणे अशी सामान्य कौशल्ये आत्मसात असणाऱ्यांची संख्या एक तृतीयांशाहून कमी आहे. संगणकीय कोडिंगसारखी तुलनेने अवघड कौशल्ये आत्मसात असणाऱ्यांची टक्केवारी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी आहे. यातही देशाच्या दक्षिण आणि उत्तर भागातील आणि शहरी तसेच ग्रामीण युवक यांच्यातील दरी खूप मोठी आहे.

एकीकडे अमेरिकेतील परदेशात जन्म झालेल्या लोकांनी स्थापन केलेल्या युनिकॉर्न कंपन्यांमध्ये भारतीय पहिल्या क्रमांकावर असताना एवढी साधी कौशल्ये शालेय पातळीवर आपण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवण्यात असफल ठरत असू तर हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे. हे सर्वेक्षण कोविड १९ च्या काळात केले गेले होते, जेव्हा जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी किमान एक शालेय वर्ष डिजिटल पद्धतीने शिकण्यात घालवले. माहिती तंत्रज्ञानाचा आवाका सेवा क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नसून, चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि ड्रोनचा वापर वाढत आहे. अशा वेळेस माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्यांची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

या क्षेत्रात मूरचा नियम लागू पडतो. म्हणजेच दोन वर्षांच्या काळात तंत्रज्ञान दुप्पट वेगाने पुढे जात असताना किमती निम्म्याने कमी होतात. त्यामुळे या सुविधा उभारताना काळाच्या पुढे दोन पावले राहिले नाही तर अनेक पांढरे हत्ती तयार केले जाण्याची भीती आहे. असे असले तरी या सर्वेक्षणात तयार केलेल्या प्रश्नावलीबद्दलही शंका उपस्थित करण्यास वाव आहे. आज देशामध्ये स्मार्ट फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ८० कोटींच्या वर गेली असून, गेल्या वर्षी भारतीयांनी युपीआयद्वारे ८३ अब्ज व्यवहार केले. आज भारत स्मार्टफोन निर्मिती आणि निर्यातीच्या बाबतील जगातील आघाडीचा देश आहे. म्हणजेच संगणकीय कौशल्ये बेताची असणारे अनेक लोक आज मोबाइलद्वारे पैशांचे व्यवहार करत आहेत, यु-ट्यूबचा वापर करून अनेक गोष्टी कशा करायच्या, हे स्वतःच स्वतःला शिकवत आहेत आणि इ-रिटेल प्लॅटफॉर्मचा वापर करून खरेदी-विक्रीही करत आहेत.

आज ग्राफिक डिझाइनपासून व्हिडीओ एडिटिंगपर्यंत अनेक कौशल्ये संगणकावर माउसने कॉपी पेस्ट किंवा फाइल ट्रान्स्फर न करता केवळ दोन बोटांच्या सहाय्याने आपल्या स्मार्टफोनवर प्रभावीपणे वापरणे शक्य झाले आहे. की-बोर्डची जागा व्हाइस टायपिंगने घेतली आहे. आजही २१व्या शतकाच्या सुरुवातीला महत्त्वाची मानली गेलेली संगणकीय कौशल्ये तितकीच आवश्यक आहेत का? का निशाणी डावा अंगठा या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षणाकडे बघण्याचा आणि त्यात मोबाइल तंत्रज्ञानाच्या विकासानुरूप बदल करण्यात एक व्यवस्था म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत? 

Web Title: Is Computer Education Necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.