गल्लोगल्ली मिळायला हा साबण आहे, बिस्किटे आहेत, की ड्रग्ज?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 09:15 AM2024-03-01T09:15:04+5:302024-03-01T09:16:34+5:30
हल्ली विमानाचे पायलट ‘ड्रग कॅरियर’ असतात, दूध विकणारी मुंबईची शकुंतला पाटणकर ऊर्फ बेबी शंभर कोटींची उलाढाल करते; हे कसे घडते? : उत्तरार्ध
-रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार
अफगाणिस्तानातून १९२० साली मुंबईत आलेल्या अब्दुल करीम शेर खान ऊर्फ करीम लाला याने तेथील अफू आणली आणि तो इथला ‘ड्रग्ज माफिया’ झाला. जगाच्या कानाकोपऱ्यातून नाना प्रकारचे ड्रग्ज भारतात आणणारे सिंडिकेट तेव्हापासून भरभक्कम आहेत. पण, आता गंगा उलटी वाहू लागली आहे. महाराष्ट्रात तयार होणारे मेफेड्रोन देशभरात नव्हे तर तस्करीच्या मार्गावाटे देशाची सीमा ओलांडून थेट ब्रिटनसह इतर देशांतही पोहचले आहे. ही निर्यात महाराष्ट्राला खचितच भूषणावह नाही.
लहानशा औद्योगिक युनिटच्या जागेत हजारो कोटींचे मेफेड्रोन तयार करण्यापासून ते हवे तेव्हा हवे तेथे वितरीत करण्यासाठी उभे राहिलेले इथले अवाढव्य नेटवर्क पाहून तपासयंत्रणाही अवाक् होत आहेत. या ड्रग्ज नेटवर्कमागे अनेक बड्या अदृश्य शक्ती आहेत, ज्या कधीच कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. केवळ राबणारे मोहरेच तपासयंत्रणांच्या हाती येतात. कारण, कितीही कारवाई झाली तरी मोहरे बदलून ड्रग्जचा व्यापार पुढे सुरू राहतोच. राज्यात आतापर्यंत जितके आरोपी पकडले गेले, त्याच्या अनेक पटीत सूत्रधार परागंदा आहेत.
आताच्या नार्को ट्रेडमध्ये जी माणसे सक्रिय आहेत ती वेगवेगळे मुखवटे धारण करून समाजात वावरतात. त्यांना हुडकून काढलेच तरी त्यांना वाचवण्यासाठी तपास यंत्रणेवर दबाव येतो. पूर्वी ड्रग्जचे वाहतूकदार, घाऊक - किरकोळ सप्लायर पूर्णवेळ तोच उद्योग करीत. आता कधी विमानाचा पायलटही ड्रग्ज वाहून नेताना पकडला जातो, तर दूधविक्री करता करता मुंबईची माफिया क्वीन शकुंतला पाटणकर उर्फ बेबी शंभर कोटींची उलाढाल करते. कधीकाळी अफू, गांजाची लागवड केली जायची. आता रसायन शास्त्रातील उच्चविद्याविभूषित संशोधक फार्मा कंपनीचा फलक लावून आतील प्रयोगशाळेत मेफेड्रोन तयार करताना पकडले जात आहेत. म्हणूनच मेफेड्रोन तयार करणाऱ्यांमध्ये कुठल्याशा टोळीचा मास्टरमाईंड प्रवीणकुमार सेंद्रिय रसायनशास्त्रातील द्वीपदवीधर असतो, तर फार्मा कंपनीत एमएस्सी करणारा आरोपी सापडतो. मेफेड्रोनचे अनेक कारखाने थेट एमआयडीसीत आढळले. अनेक ड्रग्ज सप्लायर जामिनावर सुटून तुरुंगाबाहेर पडताच पुन्हा ड्रग्ज विकायला सुरुवात करतात. हा तपास यंत्रणांचा सपशेल पराभव आहे. पण, त्याबाबत कोणतीच व्यवस्था दखल घेत नाही. अमली पदार्थांचे उत्पादन आणि गल्लोगल्ली असलेली उपलब्धता पाहता हा साबण आहे, बिस्किटे आहेत, की ड्रग्ज असा प्रश्न पडावा!
हल्ली एखाद्या कार्पोरेट कंपनीप्रमाणे हा उद्योग चालवला जातो. कोणते टुरिस्ट स्पॉट आहेत, कोणत्या भागात पार्ट्या चालणारे रिसॉर्ट, पब, हुक्का पार्लर अधिक प्रमाणात आहेत, कुठे सर्वाधिक मागणी आहे, याचा अभ्यास करून ग्राहकाला एखादे उपयुक्त उत्पादन विकावे तसे ड्रग्जचे मार्केटिंग होते, असे तपास अधिकारी सांगतात. विभागवार ड्रग्ज सप्लायर नेमले जातात आणि त्यात तरुणांना लक्ष्य केले जाते. या व्यापारासाठी होणारा वेगवेगळ्या ॲपचा वापर रोखणे आजच्या घडीस तरी नियंत्रणाबाहेर आहे. युवावर्गाला देशोधडीला लावत देश पोखरणारी ही स्थिती भयावह आहे. नार्को टेररचा विषय आणखीनच वेगळा आहे.
यासंदर्भात इक्वाडोरचे उदाहरण ताजे आहे. कधीकाळी पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या इक्वाडोरचे रुपांतर गेल्या काही वर्षात अमली पदार्थांच्या प्रमुख जागतिक व्यापारी केंद्रात झाले. येथील अर्थव्यवस्था अमली पदार्थांच्या व्यापारावर अवलंबून आहे. गेल्याच महिन्यात तेथील ड्रग्ज माफिया एडोल्फो मैकियास उर्फ फिटो तुरुंगातून गायब झाला. एकामागोमाग एक हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या. राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांना नाईलाजाने आणीबाणी जाहीर करावी लागली. देशाचे ‘नार्को-स्टेट’मध्ये रुपांतर होऊ नये, यासाठी सध्या या देशाला संघर्ष करावा लागत आहे. यापासून बोध घेऊन आपण वेळीच पावले उचलणे भाग आहे. अन्यथा अनर्थ अटळ!
ravirawool@gmail.com