तुमचे मूल ‘झरा’ आहे, ‘पर्वत’ आहे, की ‘आकाश’?

By रेश्मा शिवडेकर | Published: March 27, 2024 08:21 AM2024-03-27T08:21:10+5:302024-03-27T08:21:56+5:30

पास-नापास, हजर-गैरहजरच्या निळ्या-लाल शेऱ्यांचे दोन नीरस कागद हे यापुढे तुमच्या मुलांचे प्रगतिपुस्तक नसेल! आता असेल ‘एचपीसी’!

Is your child a 'spring', a 'mountain', or a 'sky'? | तुमचे मूल ‘झरा’ आहे, ‘पर्वत’ आहे, की ‘आकाश’?

तुमचे मूल ‘झरा’ आहे, ‘पर्वत’ आहे, की ‘आकाश’?

- रेश्मा शिवडेकर
(विशेष प्रतिनिधी, लोकमत, मुंबई)

नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण, बहुआयामी विकासाची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्या दृष्टीने अभ्यासक्रमात, परीक्षा पद्धतीत आणि साहजिकच मूल्यमापनामध्येही बदल सुचविण्यात आले आहेत. केवळ गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याऐवजी त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे सर्वांगीण असे मूल्यमापन केले जावे, अशी अपेक्षा  ‘होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड’मध्ये (एचपीसी) वर्तवण्यात आली आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करताना साधारण हीच संकल्पना मांडण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, भावनिक, मानसिक विकासाशी संबंधित पैलूंबाबत शिक्षकांनी त्यांचे निरीक्षण नोंदविणे अपेक्षित होते. उदाहरणार्थ, विद्यार्थी दिलेले काम वेळेत पूर्ण करतो, इंग्रजी उच्चार स्पष्ट करतो, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे, अवांतर वाचन करतो, इतरांना मदत करतो, सर्वांमध्ये मिसळतो इत्यादी. 

सध्या या नोंदी केवळ शिक्षकांच्या निरीक्षणातून केल्या जात आहेत. काही शिक्षक त्या पुरेशा जबाबदारीने, संवेदनशीलपणे करतात;  पण काहींना हे जास्तीचे काम वाटते. होलिस्टिक प्रोग्रेस कार्डमध्ये या नोंदी केवळ शिक्षकांनीच नव्हे, तर वर्गमित्र-मैत्रिणींनी, पालकांनी आणि खुद्द विद्यार्थ्यांनीही स्वतःबद्दल नोंदवायच्या आहेत. हे ‘प्रगतिपुस्तक’ सर्वांसाठीच नवीन असेल. ‘मला गणित, भाषा, विज्ञान हे विषय किती जमतात, त्यात मी कुठे कमी पडतो, कुठल्या विषयात सरावाची गरज आहे’, याचे मोजमाप शिक्षक, पालक, सहअध्यायी आणि स्वत: त्या विद्यार्थ्याने करायचे आहे. त्याचबरोबर ‘टीमवर्क करू शकतो का, कुठल्या कला अवगत आहेत’ अशा व्यक्तिमत्त्वाच्या  पैलूंचेही मूल्यमापन नव्या प्रगतिपुस्तकात केले जाईल. होलिस्टिक प्रोग्रेस कार्डची संकल्पना नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी)  तयार केली आहे. एचपीसीमध्ये  पहिली-दुसरीचा पायाभूत टप्पा, तिसरी ते पाचवीच्या तयारीचा आणि सहावी ते आठवीचा मध्यम टप्पा असेल. या आधारे विद्यार्थ्यांना पुढील इयत्तांकरिता तयार करणे अपेक्षित आहे.

सर्वच राज्यांना एचपीसीनुसार प्रगतिपुस्तकांची रचना बदलावी लागेल. केवळ विषयवार घेतल्या जाणाऱ्या वार्षिक परीक्षांवर नव्हे, तर आता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीबरोबरच त्यांच्या सामाजिक-भावनिक, संज्ञानात्मक आणि सर्जनशील क्षमतांचेही मूल्यांकन केले जाईल. यात विद्यार्थी सक्रियपणे सहभागी असेल. प्रत्येक मुलाला केवळ स्वतःच्या कामगिरीचेच नव्हे, तर समवयस्कांच्या कामगिरीचेही मूल्यमापन करावे लागेल. विद्यार्थ्यांची सामर्थ्यस्थळे, सुधारणेची क्षेत्रे दाखवून त्यांच्यात आत्मसन्मान आणि आत्मभान निर्माण करण्याचे हे प्रगतिपुस्तक म्हणजे एक साधन असेल. 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) आपल्या शाळांना नव्या प्रगती पुस्तकाबाबत आधीच अवगत केले आहे. सीबीएसईच्या ७४ शाळांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून याची अंमलबजावणी सुरू आहे. हे पुस्तक म्हणजे एक बहुआयामी असा अहवालच असेल. ज्यात विद्यार्थ्यांच्या कॉग्नेटिव्ह, भावनिक आणि मानसिक अशा पैलूंचा विचार केला जाईल. यासाठी प्रोजेक्ट, मुलाखती, प्रश्नमंजूषा, टीम वर्क अशा वेगवेगळ्या माध्यमांचा विचार केला जात आहे. विद्यार्थ्याचे वर्णन आता जागरूकता, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या तीन घटकांवर आधारित असेल. शिवाय ‘स्ट्रीम’ म्हणजे झरा, ‘माउंटन’ म्हणजे पर्वत आणि ‘स्काय’ म्हणजे ‘आकाश’ अशा शब्दांतून ते पारखले जाईल. 

सीबीएसईने या प्रकारच्या मूल्यांकनासाठी एक फ्रेमवर्क तयार केले आहे. यानुसार  प्रगतीचे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याच्या डिजिलॉकरशी जोडले जाईल. ते एक व्हर्च्युअल कार्ड असेल. हे प्रगतिपुस्तक शाळांच्या मूल्यमापन पद्धतीत क्रांती आणणारे ठरेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. यात अडचण एकच आहे ती म्हणजे शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालकांना या मूल्यमापनाची जाणीवजागृतीची. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित, पालकांना जागरूक करणे आवश्यक आहे. कारण मूल्यमापनाची ही पद्धत संवेदनशीलपणे, जबाबदारीने हाताळणे आवश्यक असेल. अन्यथा आठवीपर्यंत नो डिटेन्शन पॉलिसीचे जे झाले ते ते एचपीसीबाबत होण्याची भीती आहे.

थोडक्यात पास-नापास, हजर-गैरहजरचे दिवस नोंदवणारे, निळ्या-लाल शेऱ्यांच्या पलीकडचे रंगच माहिती नसणारे दोन नीरस कार्डबोर्डचे कागद म्हणजे आपल्या मुलाचे प्रगतिपुस्तक, ही संकल्पनाच पालकांना मनातून काढून टाकावी लागणार आहे. आता ती तुमच्या मुलाच्या  व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण आढावा घेणारी छोटेखानी पुस्तिकाच असेल. ती समजून घ्यायला, पर्यायाने आपल्या मुलाविषयी जाणून घ्यायला हवे, तर वाचनाची सवय पालकांना अंगी बाणवावी लागेल. 

reshma.shivadekar@lokmat.com

Web Title: Is your child a 'spring', a 'mountain', or a 'sky'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.