इस्कोट झालं जी...
By संदीप प्रधान | Published: August 10, 2018 02:35 AM2018-08-10T02:35:57+5:302018-08-10T02:36:08+5:30
परशानं धावतपळत लोकल पकडली. गर्दीतून कसाबसा आत गेल्यावर त्यानं मोबाईलवर वृत्तपत्राची साईट ओपन केली.
परशानं धावतपळत लोकल पकडली. गर्दीतून कसाबसा आत गेल्यावर त्यानं मोबाईलवर वृत्तपत्राची साईट ओपन केली. एक बातमी त्याचं चित्त खिळवणारी होती. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण गृहिणींच्या कष्टाचे मोजमाप करणार, हे वृत्त वाचून परशा संतापला. लागलीच त्याने सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेची वेबसाईट शोधली व नंबर मिळवला. महासंचालक एम. नागराज यांनीच फोन उचलला. परशाने दिलेली माहिती ऐकून नागराज गडबडले. लागलीच परशाच्या विनंतीवरून त्यांनी त्याच्या घरात गुप्त कॅमेरे बसवले. या कॅमेºयात आर्चीच्या दिवसभरातील ‘कष्टांची’ नोंद झाली.
वेळ सकाळी ७.३०
मोबाईलवरील आर्चीचा अलार्म खणखणत आहे. झोपेतील परशा आर्चीला करवादून म्हणतो की, ए आर्चे, तुला उठायचं नाय तर कशाला अलार्म लावते. लवकर ऊठ आणि चहा टाक. आर्ची आळोखेपिळोखे देत ए परशा, ऊठ आणि टाक की चहा. मला सॉलिड कंटाळा आलाय बघ उठायचा. बराचवेळ दोघांचं पहले तुम... पहले तुम... सुरू राहतं. मग, आर्ची खर्जातला स्वर लावून ए परशा, उठतो की नाय? का घालू पेकाटात लाथ, असा ढोस देते. परशा क्षणार्धात उठतो आणि स्वयंपाकघरात शिरतो. मैत्रिणीच्या फोनच्या रिंगनी अखेर आर्ची उठते आणि गॅलरीत जाऊन फोनवर सुरू होते. इकडे पोळीभाजी करायला आलेल्या बार्इंना परशा भाजी, कणिक, मसाला वगैरे काढून देतो. अंथरूण आवरून परशा आॅफिसला जाण्याच्या तयारीला लागतो. स्वयंपाकघरातून नाश्त्याचा सुग्रास सुवास घरभर पसरतो. आर्ची आपलं व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट करणं, फेसबुक वगैरेमध्ये बिझी असते. समोर गरमागरम नाश्त्याची प्लेट येताच आपण तोंड धुतले नसल्याची तिला आठवण होते. परशा बकाबका नाश्ता कोंबून बॅग उचलून बाहेर पडतो. आर्ची नाश्ता केल्यावर बहिणीबरोबर शॉपिंगला बाहेर पडते. तब्बल दोन तास फिरून आल्यावर आर्ची जेवणासोबत टीव्ही पाहण्याचा आपला दैनंदिन कार्यक्रम सुरू करते. ‘चौथ्या लग्नाची पाचवी बायको’, ‘गोड गोजिरी सून माझी’, ‘कशात काय लफड्यात पाय’ या व अशा सिरियल्सचे रात्रीचे एपिसोड पाहिल्यावर त्याचे रिपीट टेलिकास्ट पुन्हा-पुन्हा पाहून डोळ्यांतून टिपं गाळण्यामुळं आर्चीला आत्मिक समाधान मिळतं, असं ती सांगते. दुपारी तिच्या मैत्रिणी रम्मी खेळायला येतात. त्यावेळी गॉसिप्सचा डाव रंगतो. सायंकाळी फिटनेसकरिता आर्ची अगोदर जिमला जाते. त्यानंतर, झुंबाच्या क्लासला. रात्री ८ वाजल्यापासून तिच्या पसंतीच्या अर्धा डझन सिरियल्सचा रतीब सुरू असतो. याचमध्ये किटीपार्टी, भिशीच्या ग्रुपची पार्टी, झुंबा ग्रुपची पार्टी, शाळेतील मित्रमैत्रिणींची पार्टी, कॉलेजमधील फ्रेण्ड्ससोबत पिकनिक वगैरे वगैरे भरगच्च कार्यक्रमांचे वेळापत्रक ठरलेले असते.
आपल्या वाढत्या वजनामुळं आर्ची चिंतित असून तिच्या बदललेल्या भूगोलामुळे आणि इतिहासजमा झालेल्या घरकामाच्या सवयीमुळे गावाकडील विहिरीत उडी मारून जीव द्यावा की काय, असा विचार परशाच्या मनात वरचेवर येतो. मग, परशा त्याचा जीवश्चकंठश्च मित्र प्रदीपला बोलावून घेऊन ते दोघे दु:ख बुडवतात. आर्चीच्या ‘कष्टा’चे फुटेज नागराज यांनी पाहताच इस्कोट करणारे सर्वेक्षण त्यांनी रोखले.